मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारकडून एक मोठा दिलासा देण्यात आला आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी करणं अनिवार्य ठरवण्यात आलं आहे. साधारण दोन महिन्यांपूर्वी महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांना ई-केवायसी पूर्ण करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, अद्याप अनेक महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नव्हती. काहींना तांत्रिक अडचणींमुळे हे शक्य झालं नव्हतं.
या पार्श्वभूमीवर सरकारने ई-केवायसीसाठीची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता लाभार्थींना १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करता येणार आहे. २८ ऑक्टोबर रोजी झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे लाडक्या बहिणींना आणखी काही दिवसांची मुभा मिळाली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये लवकरच १५०० रुपयांचा निधी जमा होणार आहे.
अनेक महिलांना ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः ज्या महिलांकडे पती किंवा वडिलांचं आधार कार्ड नाही, त्यांच्यासाठी ही प्रक्रिया अधिक कठीण ठरत आहे. त्यामुळे सरकारकडून अशा महिलांसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू असल्याची माहिती मिळते.






