नवी दिल्ली : प्रख्यात टीव्ही अभिनेत्रीला फेसबुकवर वारंवार अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवल्याबद्दल ऑनलाइन छळाची तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी बंगळुरु येथून एका तरुणाला अटक केली आहे.
'नवीझ' नावाच्या व्यक्तीने कन्नड आणि तेलुगू भाषिक अभिनेत्रीला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. मात्र तिने ती रिजेक्ट केली. अनेक वेळा समज देऊनही त्याने अश्लील कंटेंट पाठवणे सुरुच ठेवले. त्यामुळे अभिनेत्रीने नवीझला ब्लॉक केले. त्यानंतर मात्र छळ अधिकच वाढला. आरोपीने तीन महिन्यांच्या कालावधीत तिला लक्ष्य करण्यासाठी अनेक बनावट फेसबुक अकाउंट तयार केली.
"मी त्याला ब्लॉक केल्यानंतरही तो मला इतर अकाउंटवरुन अश्लील व्हिडिओ आणि मेसेज पाठवत राहिला. त्याने अनेक बनावट प्रोफाईल तयार केले आणि छळ सुरु ठेवला" असे अभिनेत्रीने तिच्या तक्रारीत म्हटले आहे. वारंवार येणाऱ्या मेसेजमुळे आपल्याला मानसिक त्रास होत असल्याचे तिने सांगितले.
या त्रासाला कंटाळून एक नोव्हेंबर रोजी अभिनेत्रीने नागरभावी येथील नंदन पॅलेसजवळ त्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटून जाब विचारला. मात्र या भेटीनंतरही त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नाही, असे म्हटले जाते. त्यामुळे तिने पोलिसांची मदत घेण्याचे ठरवले.
अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर अन्नपूर्णेश्वरी नगर पोलिसांनी आरोपीचा माग काढला आणि त्याला अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे ऑनलाइन छळाच्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले गेले आहे. सोशल मीडियावर व्यक्तींच्या गोपनीयतेचे उल्लंघन आणि मानसिक छळवणूक कशी केली जाऊ शकते, हे या घटनेतून समोर आले आहे.
आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. या तपासातून आणखी काय माहिती समोर येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.






