पुण्यातील खाऊगल्ल्या या शहराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा एक भाग आहेत. मात्र, खाऊगल्ल्यांमुळे पुणेकरांना खूप त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यांवरील कचरा आणि अस्वच्छ दृश्यांमुळे पुण्याच्या स्वच्छ आणि स्मार्ट सिटी प्रतिमेला धक्का बसत आहे. यामुळे शहराच्या सौंदर्यावर त्याचा परिणाम होताना दिसून येत आहे. त्यामुळे स्वादाच्या शोधात ‘स्वच्छ पुणे' कुठेतरी हरवताना दिसत आहे.
अनेक खाऊगल्ल्यांनी पुणेकरांच्या जिभेचे चोचले पुरवले आहेत. रात्री उशिराही परवडणाऱ्या दरात या खाऊ घालत आहेत. शहरात सध्या १०० हून अधिक खाऊगल्ल्या आहेत. यांचा व्यवसायही तेजीत सुरू असतो. पुणे शहरात किती खाऊगल्ल्या आहेत याचा आकडाही सांगू शकत नाही. कारण प्रत्येक मोठ्या रस्त्यावर खाऊगल्ली आहे. टिळक रस्ता, फर्ग्युसन रस्ता, सारसबाग अशा ठिकाणी खाऊगल्ल्या थाटल्या आहेत. रस्त्यांवर थाटलेल्या स्टॉलमधील उष्टे अन्न रस्त्यावर टाकणं, सांडपाणी तेथेच फेकणे, कचऱ्याचे ढीग होणे यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. स्टॉलधारक आपल्या मालकीचा रस्ता असल्यासारखा रस्त्यावर खुर्च्या टाकून ग्राहकांची सोय करत असतात.
खाऊगल्ल्यांचा वाढता पसारा पाहून रस्त्यावर चालणेही कठीण झाले आहे. यासोबतच दुचाकीचे बेकायदेशीर पार्किंग, वाहतुकीचा खोळंबा, अतिक्रमणामुळे अरुंद रस्ता या बेशिस्तीला यंत्रणांकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे पाठबळच मिळत आहे. या खाऊगल्ल्यांमध्ये अतिक्रमण, अनधिकृत विक्रेते आणि बेशिस्त वाहनचालक या तीन समस्या प्रामुख्याने भेडसावतात. खाद्यपदार्थ विक्रीच्या हातगाड्यांसमोर अनेकजण दुचाकी उभ्या करतात. त्यामुळे अधिक वाहतूक कोंडी होते. ठिकठिकाणी चहा विक्रेत्यांच्या टपऱ्या आहेत तिथे मोठ्या प्रमाणात नागरिक चहा घेण्यासाठी रस्त्यावर थांबलेले असतात, त्यामुळे सकाळी, सायंकाळी मध्यवस्तीत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. वाहनचालक सतत हॉर्न वाजवत असतात. त्यामुळे ध्वनी प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होते.
रुचकर आस्वाद विविध खाऊगल्ल्यांमध्ये घेता येतो. मात्र, याच खाऊगल्ल्यांच्या परिसरातील सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांकरिता ही ओळख डोकेदुखी ठरत आहे. या परिसरात होणाऱ्या अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अस्वच्छतेमुळे डास, कीटक आणि उंदरांचा प्रादुर्भाव वाढत आहे. या असुविधा दूर झाल्या पाहिजेत. फोडणी आणि दुर्गंधीचा त्रास एवढा होतो की नागरिकांना तिथे बसणेही अशक्य होते.
शहरात हॉटेल, खानावळींसह खाऊगल्ल्यांमध्ये अन्नपदार्थ विक्रेत्यांची संख्या वाढत असतानाच या विक्रेत्यांची तपासणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. परिणामी, शहरात होणाऱ्या अन्न पदार्थांची तपासणी होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एफडीएच्या अन्न निरीक्षकामार्फत तपासणी केली जाते. मात्र, अन्न निरीक्षकांची संख्या कमी असल्याने अन्न तपासणीवर मर्यादा येत आहे. एफडीएकडून परवाना घेणे बंधनकारक असते; परंतु अनेक विक्रेत्यांकडे परवाना नसल्याचे आढळून येते. अनेक अन्न पदार्थामध्ये पनीर आणि बटरचा वापर अधिक असतो. त्यातच अधिक भेसळ आढळून येते. यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असतो. त्यामुळे याची अधिक तपासणी करणे गरजेचे आहे.
फूड स्टॉलला नियोजनबद्ध परवाने देऊन त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवावी. यासाठी सुव्यवस्थित परवाना प्रणाली अमलात आणली पाहिजे. प्रत्येक स्टॉलजवळ डस्टबीन ठेवणे बंधनकारक केले पाहिजे. त्याचप्रमाणे पुणे महापालिकेनेही तिथली नियमित साफसफाई करणे, गरजेचे आहे. अशाप्रकारे स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनावर काम करणे गरजेचे आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. आरोग्यावर होणारे परिणाम पाहता आरोग्य विभागाकडून नियमित तपासणी करून स्वच्छतेचे निकष पाळले जात आहेत का, हे पहाणे गरजेचे आहे. कचरा विभाजन, पुनर्वापर याबाबत जागरूकता निर्माण करणे महत्त्वाचे आहे. प्लास्टिकऐवजी कागदी किंवा धातूचे पुन्हा वापरता येणारे साहित्य वापरावे, जेणेकरून पर्यावरणाचेही रक्षण होईल.
पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत प्रत्येकी पाच ते सहा खाऊगल्ल्या आहेत. याशिवाय बहुतांश ठिकाणी खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत. स्टॉलमुळे रस्ते आक्रसले असून, वाहतूक कोंडीतही भर पडत आहे. शहर आणखी अस्वच्छ होण्यापूर्वीच तातडीने यावर तोडगा काढणे गरजेचे आहे. खाऊगल्ल्या या पुण्याच्या खाद्यसंस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहेत. पण, योग्य व्यवस्थापन आणि स्वच्छता राखली नाहीत, तर त्या शहराच्या बकालपणाचे कारण ठरतात. नागरिक, विक्रेते आणि प्रशासन या तिन्ही घटकांनी एकत्र येऊन शिस्तबद्ध आणि स्वच्छ खाऊगल्ल्या निर्माण केल्यास पुणे अधिक सुंदर आणि आरोग्यदायी बनू शकते.






