अमेरिका : अमेरिकेतील लुईसव्हिल मुहम्मद अली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेताच यूपीएस कंपनीचे एक कार्गो विमान कोसळून भीषण दुर्घटना घडली. तीन क्रू मेंबर्ससह उड्डाण केलेले हे मालवाहू विमान काही वेळातच कोसळले. विमान जमिनीवर येताच मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर भीषण आग लागली. या आगीत परिसर काळ्या धुराने व्यापला होता आणि आसपासच्या घरांनाही आग लागल्याने अनेक घरं जळून खाक झाली. ही घटना मंगळवारी संध्याकाळी घडल्याची माहिती असून, तीन जणांचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी असल्याचे वृत्त आहे.
फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशननुसार, हवाईला जाणारे मॅकडोनेल डग्लस एमडी-११ विमान स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ५:१५ वाजता (भारतीय वेळेनुसार पहाटे ३:४५) कोसळले. अपघाताचे कारण शोधण्यासाठी राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाने चौकशी सुरू केली आहे.
केंटकीचे गव्हर्नर अँडी बेशियर यांनी सांगितले की, अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लुईसव्हिलचे मेयर क्रेग ग्रीनबर्ग यांनी सांगितले की, आग अजूनही पूर्णपणे विझलेली नाही आणि सर्व आपत्कालीन सेवा घटनास्थळी तैनात आहेत. विमानात मोठ्या प्रमाणात जेट इंधन असल्यामुळे आगीचा भडका उडाल्याचे ते म्हणाले. विमानात सुमारे २,८०,८०० गॅलन इंधन होते.
यूपीएस कंपनीने विमानात तीन क्रू मेंबर्स असल्याची पुष्टी केली आहे. अद्याप कोणत्याही जखमी किंवा मृत्यूबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही आणि अधिकाऱ्यांसोबत मिळून तपास सुरू आहे.
स्थानिक प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, उड्डाणाच्या वेळी विमानाच्या डाव्या इंजिनाला आग लागल्याचे दिसून आले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल होऊन आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
लुईसव्हिल हे यूपीएसचे मुख्य अमेरिकन हवाई केंद्र असून दररोज २०० हून अधिक उड्डाणे येथे होत असतात. कंपनीकडे एकूण ५१६ विमानांचा ताफा आहे, ज्यातील २९४ विमाने कंपनीच्या मालकीची आहेत, तर उर्वरित भाडेपट्ट्यावर किंवा चार्टर स्वरूपात वापरली जातात.






