१९८३ साली भारताच्या पुरूष संघाने एकदिवसीय विश्वचषक जिंकला. १९८३ साली त्या वेळी बहुतेकांकडे टीव्ही नव्हते. पण तो क्षण भारतीय महिलांनी पुन्हा काल देशवासीयांना अनुभवाला आणून दिला. असंख्य भारतीयांनी हा थरार ‘याचि देही याचि डोळा’ पाहिला. महिला क्रिकेटने आता बरीच कात टाकली आहे. महिला क्रिकेटमध्ये अनेक सुपरस्टार महिला तयार झाल्या आहेत. त्यात हरमतप्रीत कौर, शफाली वर्मा, दीप्ती वर्मा आणि अमनज्योत कौर यांनी आपापले योगदान दिले आणि २०२५ चा विश्वचषक भारताच्या नावावर कोरला. भारताची फिरकीपटू दीप्ती वर्माने पाच विकेट घेतल्या, तर शफाली शर्माने तडाखेबंद ८७ धावांची खेळी करत भारताला २९९ धावांचे लक्ष्य गाठून दिले. भारतात काही ठिकाणी महिलांना कमी लेखले जाते. अशावेळी महिलांनी केलेली कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरते. क्रिकेटच नव्हे तर बुद्धिबळपटू दीप्ती देशमुख, पी. टी. उषा आणि अश्निनी नाचप्पा आणि मेरी कोम अशा कित्येक रणरागिणींनी यापूर्वीच ‘छोरियां छोरो से कम नही है’ हे वारंवार सिद्ध केले आहे. भारतीय महिला क्रिकेटपटूंनी तेच पुन्हा सिद्ध केले. पूर्वी अनेकदा असा प्रश्न विचारला जायचा की, पुरुषांच्या सामन्यात जितका उत्साह दिसत असे तितका तो महिलांच्या सामन्यात का दिसत नाही. पण रविवारचा नवी मुंबईत डी. वाय. पाटील स्टेडियममधला जल्लोष बघून हा प्रश्न पुन्हा कुणालाही पडणार नाही याची खात्रीच झाली आहे.
भारतीय महिलांना अनेकदा दुर्लक्षित केलेले आहे. तो इतिहास आता इतिहासजमा झाला आहे आणि पुरुषांइतक्याच सामर्थ्याने त्या आता देशाची धुरा प्रत्येक क्षेत्रात वाहून नेण्यास समर्थ आहेत हाच तो अर्थ आहे. या संघात सहभागी असलेल्या प्रत्येक खेळाडूची वेगळी अशी कहाणी आहे. प्रतीका रावलच्या दुखापतीमुळे ऐन वेळेला संघात स्थान मिळवलेल्या शफाली वर्माने तडाखेबंद ८७ धावांची खेळी करून इतिहास घडवला. हरमनप्रीत असो की स्मृती मानधना असो, यांची कथा अशीच आहे. पण दुर्दैव हे आहे की, यांच्या कथांना आजही लोक तितके महत्त्व देत नाहीत. सचिन तेंडुलकर किंवा कपिल देव यांच्या किस्से-कहाण्यांना जितके प्रेरणादायी मानले जाते तितके महिला खेळाडूंच्या प्रेरणादायी कहाण्यांना महत्त्व दिले जात नाही. विशेष म्हणजे या सर्व खेळाडू ग्रामीण भारतातून आल्या आहेत. कुणी हरियाणाची आहे, तर कुणी हिमाचल प्रदेशची आहे. तेथून यांच्या प्रेरक कहाणीला प्रारंभ होतो आणि आता विश्वचषक घेऊनच त्या एका टप्प्यावर आल्या आहेत.
तसे तर आता पुरुष खेळाडूंनीही आता ग्रामीण भागातून देशात क्रिकेटला उंचीवर नेऊन ठेवले आहे. जे हरभजनसिंग आणि युवराज सिंग यांनी केले तेच हरमनप्रीत आणि शफाली वर्मा यांनी केले. भारतीय महिला विश्वचषक संघ हा भारताचेच विश्वरूप आहे. जेमिमा रॉड्रिक्सने भारताला अंतिम फेरीत पोहोचवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. प्रत्येक खेळाडूने आपला वाटा उचलला आहे. या विजयामुळे बीसीसीआयचा महिला संघाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धेदरम्यान भारतीय खेळाडूंनी ज्या प्रकारे आपला खेळ उंचावला आणि इतरांना प्रेरणा दिली ती कित्येक वर्षे स्मृतीत राहील. ८३ नंतर भारतीय क्रिकेटचे स्वरूप बदलून गेले. तेच आता महिलांच्या बाबतीत होणार आहे. आताच भारतीय लहान मुली हातात बॅट घेऊन दिसू लागल्या आहेत. जे पूर्वी टेनिसच्या बाबतीत इंग्लंड आणि फ्रान्समध्ये व्हायचे तेच आता क्रिकेटच्या बाबतीत भारतात घडत आहे. हे निश्चितच चांगले आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली मोठ्या धावांचा पाठलाग या विश्वषकात अंतिम सामन्याअगोदर भारतीय संघाने पूर्ण करून दाखवला. ही एक भारतीय महिलांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल होत असल्याची बाब पटवून देते. रॉड्रिक्स असो की हरमनप्रीत असो की शफाली वर्मा असो की रिचा घोष या सर्वांनी भारतीयांना विश्वचषक जिंकल्याचा पुन्हा एकदा परमानंद दिला आहे. यात दक्षिण आफ्रिका हरले याचा आनंद नाही, तर भारतीय महिला आज जगज्जेत्या आहेत आणि त्या कुणालाही हरवू शकतात याचा आनंद मोठा आहे. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, आयसीसी वर्ल्डकप अंतिम सामन्यात भारतीय महिलांची कामगिरी महान कौशल्य आणि आत्मविश्वासाची फलित होते. संघाने अपवादात्मक सांघिक टीमवर्क आणि दृढता दाखवली. आता भारतीय महिलांना चांगले दिवस आले आहेत. बीसीसीआयने त्यांना भरघोस पारितोषिके प्रदान करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भारतीय महिला आता चांगले प्रशिक्षण घेऊ शकतील आणि भारतीय खेळाडूंचा दर्जा आणखी वाढेल. हा या विजयाचा आणखी एक सुपरिणाम आहे. ठिकठिकाणच्या ग्रामीण भागातून आलेल्या महिलांना आता क्रिकेटच्या सुविधा प्राप्त होतील यात काही शंका नाही. पूर्वी त्या उत्तम परिस्थितीत असलेल्या खेळाडूनाच उपलब्ध होत होत्या. आता त्या सर्वसामान्य खेळाडूंनाही प्राप्त होतील निदान याची सुरुवात तरी होईल. क्रिकेट म्हणजे साहेबांचा खेळ असा समज होता. तो समज आता भारतीय पुरुषांनी घालवला आणि आता तर भारतीय स्त्रियांनीही पुसून टाकला आहे, त्यामुळे इंग्लंडपेक्षा आपण या खेळात पुढे आहोत हे सिद्ध झाले आहे.