मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सहायक आयुक्तपदांच्या अनेक जागा रिक्त असून अनेक ठिकाणी प्रभारी सहायक आयुक्त पदाचा भार कार्यकारी अभियंत्यांवर सोपवण्यात आलेला आहे. त्यामुळे अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून निवड झालेल्या आणि प्रशिक्षण पूर्ण झालेल्या दोन आणखी सहायक आयुक्तांची नियुक्ती विभागांत करण्यात आली आहे. यातील प्रफुल दिनेश तांबे यांची बोरीवली आर/मध्य प्रशासकीय विभाग आणि अनिरुध्द गोपाळकृष्ण कुलकर्णी यांची गोरेगाव पी/दक्षिण प्रशासकीय विभागाच्या सहायक आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या आणि महापालिकेचे प्रशिक्षण कालावधी पूर्ण केलेल्या दुसऱ्या टप्प्यात चार सहाय्यक आयुक्तांची यापूर्वी नियुक्ती करण्यात आली होती. त्यात योगेश देसाई (बी विभाग ) संतोष साळुंखे (सी विभाग), आरती गोळेकर ( आर / दक्षिण) आणि वृषाली इंगुले ( एफ/दक्षिण) यांच्या सहायक आयुक्तांच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या. परंतु महापालिकेच्या बोरीवली आर / मध्य आणि गोरेगाव पी/ दक्षिण सहाय्यक आयुक्त पदावरील नियुक्ती करण्यात आली नव्हती. त्यामुळे कागदपत्रांची सर्व पुतर्ता आणि प्रशिक्षण कालावधी पूर्ण केलेल्या प्रफुल्ल तांबे आणि अनिरुध्द कुलकर्णी यांची अखेर महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ भूषण गगराणी यांनी यांच्या आदेशानुसार नियुक्ती करण्यात आली आहे. आर मध्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांना उपायुक्त पदी बढती मिळाली, पण त्यांच्याकडे या विभागासह मध्यवर्ती खरेदी खात्याची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली होती. पण या पदावर कायम सहायक आयुक्त नियुक्त करण्यात आल्याने नांदेडकर या आता पूर्णवेळ उपायुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते)पदी नियुक्ती झाली आहे. तर पी दक्षिण विभागाच्या प्रभारी पदभार अजय पाटणे यांच्याकडे होता, त्यांच्याजागी प्रफुल्ल तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.






