प्रतिनिधी: सकाळी एकदम सुरूवातीला रुपया विक्रमी नीचांकी पातळीवरून परतला असून रूपयाने डॉलरच्या तुलनेत विक्रमी वाढ नोंदवली आहे. सुरूवातीच्या आंतरराष्ट्रीय चलनाच्या खरेदी विक्रीत रूपया थेट २१ पैशांनी वधारून ८८.५६ प्रति डॉलरवर पोहोचला. विशेषतः परदेशात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया २१ पैशांनी वधारला आणि भांडवली बाजारातून परदेशी निधी बाहेर गेल्याने भारतीय चलनावर दबाव राहिला असे परकीय चलन व्यापाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
आंतरबँक परकीय चलन बाजारात, रुपया ८८.५५ वर उघडला आणि नंतर सुरुवातीच्या व्यवहारांमध्ये डॉलरच्या तुलनेत ८८.५६ वर व्यवहार करत होता, जो त्याच्या मागील बंद पातळीपेक्षा २१ पैशांनी जास्त पातळीवर खुला झाला आहे. सोमवारी, सलग तिसऱ्या सत्रात घसरण होत असलेला देशांतर्गत युनिट अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ७ पैशांनी कमी होऊन ८८.७७ वर बंद झाला, जो त्याच्या सर्वकालीन बंद पातळीजवळ होता.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, १४ ऑक्टोबर रोजी डॉलरच्या तुलनेत रुपयाने ८८.८१ ही आतापर्यंतची सर्वात कमी बंद पातळी नोंदवली होती.दरम्यान, सहा चलनांच्या तुलनेत डॉलरच्या ताकदीचे मोजमाप करणारा डॉलर निर्देशांक ०.०४% वाढून ९९.७५ वर पोहोचला. आज सकाळी जागतिक तेल बेंचमार्क, ब्रेंट क्रूड, फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये ०.३२% घसरून $६४.६८ प्रति बॅरलवर पोहोचला होता.
देशांतर्गत शेअर बाजारात सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ५५ अंकांनी घसरून ८३,९२३.४८ वर पोहोचला तर निफ्टी ४०.९५ अंकांनी घसरून २५,७२२.४० वर पोहोचला होता. एक्सचेंज प्रोविजनल डेटानुसार, सोमवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १८८३.७८ कोटी किमतीच्या शेअर्सची विक्री केली.
सोमवारी प्रसिद्ध झालेल्या मासिक सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की वस्तू आणि सेवा करात सवलत, उत्पादकता वाढ आणि तंत्रज्ञान गुंतवणुकीमुळे ऑक्टोबरमध्ये भारताच्या उत्पादन क्षेत्रातील क्रियाकलाप (Activity) मजबूत झाले आहेत. जरी आंतरराष्ट्रीय विक्री कमकुवत वेगाने वाढली असली तरीही ही वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले.
कालच प्रकाशित झालेल्या हंगामी समायोजित एचएसबीसी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (PMI) सप्टेंबरमध्ये ५७.७ वरून ऑक्टोबरमध्ये ५९.२ वर पोहोचला होता.

    




