Wednesday, November 26, 2025

मुन्नारला पर्यटनासाठी गेलेल्या महिलेचा टॅक्सीचालकांनी केला छळ! दोन अधिकारी निलंबित

मुन्नारला पर्यटनासाठी गेलेल्या महिलेचा टॅक्सीचालकांनी केला छळ! दोन अधिकारी निलंबित

मुंबई: मुंबईहून मुन्नारला पर्यटनासाठी गेलेल्या महिलेचा टॅक्सीचालकांनी छळ केल्याची घटना समोर येत आहे. संबंधित महिलेने मुन्नारमध्ये फिरण्यासाठी ऑनलाईन टॅक्सी बुक केल्यामुळे स्थानिक टॅक्सीचालकांनी छळ केल्याचा आरोप करत टॅक्सीचालकांच्या समुहाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणात हस्तक्षेप करणाऱ्या दोन पोलीस अधिकाऱ्यांनासुद्धा निलंबित करण्यात आले आहे.

पर्यटनासाठी गेलेल्या महिलेने ऑनलाईन टॅक्सी बुक केली होती. मात्र स्थानिक टॅक्सीचालकांनी ऑनलाईन टॅक्सी ड्रायव्हरला धमकावण्यास सुरुवात केली. याबाबत तपशील देणारा तीन मिनिटांचा व्हिडिओही महिलेने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यात पोलीसही स्थानिक टॅक्सीचालकांची बाजू घेताना दिसले. तसेच केरळच्या पर्यटन अधिकाऱ्यांनीही त्यांना सहकार्य केले नसल्याचे त्यांनी व्हिडीओद्वारे सांगितले.

महिलेने तयार केलेल्या व्हिडिओच्या आधारे आणि सीसीटीव्ही फूटेजद्वारे मुन्नार पोलिसांनी ओळख पटलेल्या टॅक्सीचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम १२६(२) (चुकीच्या पद्धतीने रोखणे), १३५(२) (धमकी) आणि ३(५) (सामान्य हेतू)अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणामुळे मुन्नार पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक जॉर्ज कुरिअन आणि सहायक उपनिरीक्षक साजू पौलोज यांना निलंबित करण्यात आले, अशी माहिती इडुक्की जिल्हा पोलिस प्रमुखांच्या कार्यालयाकडून देण्यात आली.

Comments
Add Comment