दक्षिण महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच ढगाळ झाले आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये पक्षांतर्गत वाद, छुप्या युती यामुळे राजकीय समीकरणे सतत बदलत आहेत. कधीकाळी एकत्र लढणाऱ्या नेत्यांमधील दुरावा, तर काही ठिकाणी राजकीय सोयीसाठी नवीन जोड्या तयार होत आहेत. राजकीय अस्थिरतेचे दर्शन घडवत आहेत.
कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि महायुतीचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यातील वाक्युद्ध पुन्हा तीव्र झाले आहे. कधीकाळी परस्परपूरक राजकारण करणारे हे दोन नेते आता शक्तिपीठ महामार्ग आणि स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवरून आमने-सामने आले आहेत. ३० ऑक्टोबरला सतेज पाटील यांनी क्षीरसागर यांच्यावर मुंबईत झालेल्या महामार्ग समर्थक बैठकीतील शेतकऱ्यांच्या जमिनींबाबत सवाल उपस्थित केला, तर क्षीरसागर यांनी पाटील यांच्यावर जिल्ह्याच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. या वादाने कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील राजकीय तापमान वाढले असून, येत्या महापालिका निवडणुकीत याचा परिणाम दिसण्याची शक्यता आहे.
काका-पुतण्याच्या पक्षाची अनोखी आघाडी
चंदगडमध्ये मात्र राजकीय सोयीने नवीन वळण घेतले आहे. ज्याची राज्यभर चर्चा व्हावी असे हे उदाहरण आहे. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या राष्ट्रवादी (शरद पवार गट)च्या नंदाताई बाभूळकर-पाटील यांनी राजकीय पुनरागमनासाठी महायुतीतील अजित पवार राष्ट्रवादीबरोबर जवळीक साधली. २८ ऑक्टोबरला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी यासाठी पुढाकार घेत बाभूळकर पाटील आणि त्यांच्या विधानसभेला पराभूत मंडळींना एकत्र आणले. यामुळे सावध होत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोघांचे विरोधक अप्पी पाटील यांना भाजपमध्ये सामावून घेण्याची घोषणा केली. अप्पी पाटील हे सतेज पाटील गटाचे प्रमुख समर्थक म्हणून ओळखले जातात, त्यामुळे हा प्रवेश काँग्रेसला मोठा धक्का ठरला म्हणावा की काँग्रेस आणि भाजपच्या पाटलांनी एकत्र येऊन नवा डाव टाकला म्हणावा हा प्रश्न आहे. हसन मुश्रीफ यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि भाजपमधील वाद उघडपणे दिसू लागला आहे. तिथे अजून बरेच राजकारण शिजायची शक्यता आहे. १२ तालुक्यात १२ प्रकार दिसतील!
सांगलीत गाडगीळ यांचे चंद्रकांतदादांनाआव्हान
सांगलीत भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या राजकारणाला आव्हान देणारा लेटर बॉम्ब नुकताच टाकला. काँग्रेसमधून आलेल्या जयश्री मदन पाटील यांच्या गटाचे ६ नगरसेवक भाजपमध्ये आले असताना २२ जागा त्यांच्या गटाला देण्याला आपला विरोध गाडगीळ यांनी पत्रक काढून दर्शवला. त्याला माजी मंत्री सुरेश खाडे यांनीही साथ दिली. त्यामुळे पालकमंत्री पाटील गडबडले आणि सारवासारव केली. पक्ष आपल्यापद्धतीने पुढे नेण्याचा त्यांचा मनसुबा उधळला गेला. या बंडामागे काँग्रेसमधील विशाल पाटील यांची फूस असल्याची भाजपमध्ये चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनाही स्थानिक स्वराज्य निवडणुकीत जायबंदी करून ठेवले असून दोन आजीमाजी पालकमंत्र्यांची सांगली जिल्ह्यात चांगलीच गोची झाली आहे.
जयंत पाटील-विशाल पाटलांमध्ये जुंपले
पुणे पदवीधर मतदारसंघातून सांगलीच्या राष्ट्रवादी सोडलेल्या शरद लाड यांची उमेदवारी चंद्रकांत पाटील यांनी परस्पर घोषित केली. त्याआधी कोल्हापुरातून हसन मुश्रीफ यांनी अजित पवार गटाकडून परस्पर उमेदवार जाहीर केला होता. मुश्रीफ म्हणतात, तिथे आमच्या पक्षाचा आमदार निवडून आला होता. त्यांच्या मुलाला पक्षात घेतले म्हणून उमेदवारी घोषित करायचा अधिकार चंद्रकांत पाटील यांना नाही. काय ते देवेंद्र फडणवीस ठरवतील. आपण त्यांच्याशी बोलू. महायुतीत हा वाद उफाळला. त्याचवेळी सांगलीत काँग्रेस जयंत पाटील यांच्यासोबत जायला तयार नाही. ही द्विधा अवस्था पाहता जयंत पाटील यांनी इस्लामपूर नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी (शरद पवार गट)चा उमेदवार परस्पर जाहीर केला. ३१ ऑक्टोबरला जयंत पाटील यांनी आनंदराव मुलगुंडे यांची उमेदवारी घोषित करत म्हटले, ‘महाविकास आघाडीच्या घटकांसोबत चर्चा सुरू आहे, पण तुतारी चिन्हावर लढणार.’ तिथल्या काँग्रेसनेही उमेदवार देण्याची घोषणा केली. या घटनेमुळे सांगलीतील आघाडीचे समीकरण कोलमडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांना सोबत घेऊन आघाडी करायची जयंत पाटील यांनी तयारी चालवली असून त्याला आर. आर. पाटील यांचे पुत्र आ. रोहित पाटील विरोध करत आहेत. त्यांना शिंदे शिवसेनेचे आमदार सुहास अनिल बाबर यांची साथ असल्याने तासगाव, कवठे महांकाळ, खानापूर आणि आटपाडी या चार तालुक्यात विचित्र आघाड्या लढताना दिसतील. भाजपने पुन्हा सामावून घ्यावे म्हणून संजय पाटील उपोषण, चक्का जाम असा दबाव वाढवत असून त्यांना न घेऊन होणाऱ्या नुकसानीच्या भीतीने चंद्रकांत पाटीलदेखील गडबडले आहेत. महापालिकेला पक्षाचे दोन आमदार विरोधात आणि जिल्हा परिषदेला जयंत पाटील यांच्या सोबत पक्षाचे माजी खासदार जोडले गेले, तर आपण कोणाशी हात मिळवणी करायची की विशाल पाटील, विश्वजित कदम यांच्याशी अंडर स्टॅन्डिंग करून लढायचे आणि तसे लढले, तर आपल्या सत्तेचे महत्त्व काय राहणार? हा प्रश्न मंत्री चंद्रकांत पाटील यांना चक्रावून सोडत आहे.
दक्षिण महाराष्ट्रात ठाकरे सेना गपगार!
सातारा जिल्ह्यात फलटणच्या डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाने राजकीय वाद भडकला आहे. भाजपचे माजी खासदार संजीवराजे निंबाळकर यांचा गट अडचणीत सापडला असताना, ठाकरे सेनेचे संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील यांनी चिडीचूप बसण्याची भूमिका घेतली आहे. हे माहीत झाल्यामुळे पक्षाने सुषमा अंधारे यांना बदलीवर पाठवून २९ ऑक्टोबरला पत्रकार परिषद घ्यायला लावली.
अंधारे यांनी माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप करत एसआयटी चौकशीची मागणी केली. डॉ. मुंडे यांच्या आत्महत्येत निंबाळकरांचा हात असल्याचा दावा करत अंधारे यांनी सुसाईड नोटमधील विसंगती दाखवली. संजीवराजे निंबाळकर गटाने बचाव केला असला तरी त्यांची लढत मित्रपक्षाबरोबर सुरू आहे. पण, नितीन बानुगडे पाटील यांच्या मौनाने ठाकरे सेनेत पक्षांतर्गत तणाव वाढला. राज्य सरकारने एसआयटी गठित केली असली तरी हा वाद निवडणुकांसाठी राजकीय हत्यार बनू शकतो. पण यानिमित्ताने ठाकरे सेना दक्षिण महाराष्ट्रात निपचित पडल्याचे स्पष्ट झाले आहे. कोल्हापुरात अरुण दुधवडकर आणि सांगली सातारा जिल्ह्यात बानुगडे पाटील हे दोन संपर्क प्रमुख स्वपक्षातील पदाधिकारी आणि इतरांचे खच्चीकरण करण्यात वेळ घालवत असून जिल्हा पदाधिकारी किरकोळ आंदोलने करून निवडणुकीच्या राजकारणापासूनच दूर गेले आहेत. गपगार पडलेला पक्ष आणि नगण्य अवस्था झाल्याने या सगळ्या घडामोडीत हा पक्ष कुठेच नाही. पदवीधर निवडणुकीत सतेज पाटील परिवारात तिकीट दिले, तर विरोध करून आपले उखळ पांढरे करून घ्यायचे यासाठीची रणनीती सध्या ठाकरे सेनेतील मंडळी आखत आहेत! हेच काय ते त्यांचे राजकारण !

    




