स्मृती मानधना दुसऱ्या स्थानावर घसरली; जेमिमाची 'टॉप १०' मध्ये दमदार एन्ट्री
मुंबई : नुकताच महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धा संपली. या स्पर्धेचे विजेतेपद भारतीय महिला क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात भारतीय संघ या स्पर्धेचा नवा विजेता ठरला. या स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे.
या क्रमवारीनुसार आता स्मृती मानधनाला तिचा अव्वल क्रमांक गमवावा लागला आहे. खरंतर भारतासाठी स्मृती मानधनाने वर्ल्ड कप २०२५ मध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या, पण दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वुल्फार्टनेही यंदाचा वर्ल्ड कप गाजवला.
तिला दक्षिण आफ्रिकेला वर्ल्ड कप मिळवून देता आला नाही, मात्र तिने या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम केला. त्यामुळे ती आता महिला वनडे क्रमवारीत स्मृती मानधना आणि ऍश्ले गार्डनर यांना मागे टाकत अव्वल क्रमांकावर आली आहे. तिने वर्ल्ड कपमध्ये उपांत्य आणि अंतिम सामन्यांमध्ये शतक केले होते. तिने भारताला वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात शतकी खेळी करताना काही काळ दबावात टाकले होते. तिने या स्पर्धेत ५७१ धावा ठोकल्या, एका महिला वर्ल्ड कपमध्ये केलेल्या या सर्वाधिक धावा ठरल्या.
तिच्या या कामगिरीमुळे तिने कारकिर्दीतील सर्वोत्तम ८१४ रेटिंग पाँइंट्स मिळवताना अव्वल क्रमांकही मिळवला. त्यामुळे आता स्मृती दुसऱ्या आणि गार्डनर तिसऱ्या क्रमांकावर घसरली. विशेष म्हणजे वर्ल्ड कप २०२५ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्येही या तिघी पहिल्या तीन क्रमांकावर राहिल्या. वुल्फार्डपाठोपाठ स्मृतीने ९ सामन्यांत ४३४ धााव केल्या, तर गार्डनरने ३२८ धावा केल्या.
याशिवाय ऑस्ट्रेलियाची एलिस पेरीनेही आता टॉप-१० फलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे, ती आता नुकतेच निवृत्ती घेतलेल्या सोफी डिवाईनसह ७ व्या क्रमांकावर आली आहे. फलंदाजी क्रमवारीत भारताच्या जेमिमाह रोड्रिग्सने गरुडझेप घेतली आहे.
तिने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार शतकी खेळी केली होती. त्यामुळे तिने ९ स्थानांची झेप घेत आता १० वा क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे पहिल्या १० फलंदाजांमध्ये भारताच्या स्मृती आणि जेमिमा या दोघी आहेत. याशिवाय ऑस्ट्रेलियाची युवा फलंदाज फोबी लिटफिल्ड आता १३ व्या क्रमांकावर आली आहे.
गोलंदाजांमध्ये वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध ५ विकेट्स घेणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची खेळाडू मारिझान काप आता दोन स्थानांनी पुढे जात दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. पहिल्या क्रमांकावर इंग्लंडची सोफी इक्लेस्टोन आहे. कापने दुसरा क्रमांक मिळवताना ऑस्ट्रेलियाच्या ऍलना किंग आणि ऍश्ले गार्डनरला मागे टाकले आहे. या दोघी तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. भारताची दीप्ती शर्मा पाचव्या क्रमांकावर कायम आहे. पहिल्या १० गोलंदाजांमध्ये दीप्ती एकमेव भारतीय खेळाडू आहे.
ऍनाबेल सदरलँड (६ वा क्रमांक), किम गार्थ (७ वा क्रमांक) आणि हेली मॅथ्यूज (८ वा क्रमांक) यांनी एक एक स्थानाची प्रगती केली आहे. त्यामुळे मेगन शट ३ स्थानांनी खाली घसरली आहे. पाकिस्तानची नशरा संधू आणि दक्षिण आफ्रिकेची नॉनकुलुलेको एलाबा या अनुक्रमे १० व्या क्रमांकावर आहेत.दरम्यान, भारताची श्री चरणी हिनेही प्रभावी कामगिरी केली, त्यामुळे तिने ७ स्थानांची प्रगती करत २३ वा क्रमांक मिळवला.
अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत भारताची दीप्ती शर्मा ५ व्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर आली आहे. तिने ऍनाबेल सदरलँडला मागे टाकले. या क्रमवारीत ऍश्ले गार्डनर, मारिझान काप आणि हेली मॅथ्यूज या पहिल्या तीन क्रमांकावर कायम आहेत.






