नवी मुंबई : भारतीय महिला संघाने आयसीसी महिला वर्ल्ड कप जिंकत इतिहास रचला आणि भारतीय क्रिकेटचा नवा अध्याय लिहिला. या विजयाने महिला क्रिकेटचे संपूर्ण चित्रच बदलून गेले आहे. भारताने हा किताब पहिल्यांदाच पटकावला असून, कपिल देव आणि महेंद्रसिंह धोनीनंतर हरमनप्रीत कौर ही विश्वचषक जिंकणारी तिसरी भारतीय कर्णधार ठरली आहे. या कामगिरीनंतर भारतीय महिला संघाचं देशातच नव्हे तर जगभरातून कौतुक होत आहे.
या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर हरमनप्रीत कौरने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत सर्वांचं लक्ष वेधलं. तिच्या या पोस्टनंतर ती काही क्षणातच व्हायरल झाली. हरमनप्रीतने इंस्टाग्रामवर ट्रॉफी हातात घेतलेला फोटो शेअर करत लिहिलं, "क्रिकेट हा केवळ पुरुषांचा खेळ नाही, तर सर्वांचा खेळ आहे." आज महिला खेळाडू अशा टप्प्यावर पोहोचल्या आहेत जिथे त्यांना समान आदर आणि मान्यता मिळणं आवश्यक आहे. क्रिकेट अनेक वर्षं पुरुषप्रधान खेळ मानला जात होता, पण आता हा खेळ महिलांचाही तितकाच आहे."
तिच्या या पोस्टला लाखो लोकांनी पसंती दिली आणि हजारो चाहत्यांनी तिच्या आत्मविश्वासाचे कौतुक केले. वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर ५२ धावांनी विजय मिळवत विजेतेपद पटकावलं. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ७ बाद २९८ धावा केल्या. शफाली वर्माने ८७, दीप्ती शर्माने ५८, स्मृती मानधनाने ४५ आणि रिचा घोषने २४ चेंडूत ३४ धावा करून संघाचा पाया मजबूत केला. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्डने शतक झळकावले, मात्र दक्षिण आफ्रिकेचा संघ ४५.३ षटकांत २४६ धावांत गारद झाला.
या विजयासह हरमनप्रीत कौर आयसीसी महिला वर्ल्ड कप जिंकणारी पहिली भारतीय कर्णधार ठरली आहे आणि तिचं नाव भारतीय क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं आहे.

    




