Tuesday, November 4, 2025

कायदेशीर नोटीसमुळे 'हक' प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात

कायदेशीर नोटीसमुळे 'हक'  प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात

मुंबई  : इमरान हाश्मी आणि यामी गौतमी यांचा आगामी चित्रपट ‘हक’ प्रदर्शित होण्यापूर्वीच कायदेशीर अडचणीत सापडला आहे. शाह बानोची मुलगी सिद्दिका बेगम हिने निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. यामध्ये चित्रपटाचे प्रमोशन आणि रिलीज तत्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. हा चित्रपट शाह बानो प्रकरणावर आधारित आहे.

नोटीसनुसार, सिद्दिका बेगम यांचा आरोप आहे की दिवंगत शाह बानो बेगम यांचे वैयक्तिक जीवन त्यांच्या कायदेशीर वारसांच्या परवानगीशिवाय चित्रित केले जात आहे. ही कायदेशीर नोटीस दिग्दर्शक सुपरन वर्मा, निर्माते जंगली पिक्चर्स आणि बावेजा स्टुडिओज तसेच सीबीएफसी यांना पाठवण्यात आली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, ‘हक’ हा चित्रपट १९८५ च्या सर्वोच्च न्यायालयातील मोहम्मद अहमद खान विरुद्ध शाह बानो बेगम या खटल्यावर आधारित आहे. हा खटला महिला हक्क आणि देखभाल कायद्यांशी संबंधित आहे. मुस्लिम महिलांच्या हक्कांचे रक्षण करण्याच्या लढाईत हा खटला एक महत्वाचा मुद्दा मानला जातो.

सुपर्ण एस. वर्मा दिग्दर्शित या चित्रपटात इमरान हाश्मी आणि यामी गौतमी यांच्यासोबत वर्तिका सिंग, दानिश हुसेन, शीबा चड्ढा आणि असीम हट्टंगडी यांच्या भूमिका आहेत. जंगली पिक्चर्सच्या बॅनरखाली निर्मित हा चित्रपट ७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Comments
Add Comment