पत्रकार परिषद पाहून मनसे अध्यक्ष संतापले; म्हणाले, 'आयोग निष्पक्ष नाही, महाराष्ट्रातील जनतेचा हा ढळढळीत अपमान!'
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. आयोगाने २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर, राज ठाकरे चांगलेच भडकले आहेत. त्यांनी आयोगाला थेट 'सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं' असं संबोधून लोकशाहीच्या निष्पक्षतेवरच प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.
राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत आपला संताप व्यक्त करताना सांगितले की, "आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप कोणीतरी मला पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली! आणि आता शंभर टक्के खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे. प्रत्यक्षात हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे." त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण 'दुबार मतदार नोंदणी'च्या मुद्द्यावरून तापले आहे. महाविकास आघाडीसह विरोधी पक्षांनी या गंभीर अनियमिततेविरोधात आवाज उठवला असून, मुंबईत 'सत्याचा मोर्चा' काढून मतदार याद्या दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका न घेण्याची मागणी केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने विरोधकांच्या या मागणीला जुमानले नाही आणि आज निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.
राज ठाकरे यांनी आयोगाला धारेवर धरताना विचारले की, "दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय?" पुढे त्यांनी थेट विचारणा केली, "जबाबदारी तर तुम्ही केव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांचं करायचं काय?"
राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केले आहे की, "महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पहा... तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल." तसेच, त्यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाची कोंडी करणाऱ्या पत्रकारांचेही मनापासून अभिनंदन केले आहे.
राज्यात दुबार मतदार नोंदणीचा मुद्दा हिंदू-मुस्लिम नावांचा संदर्भ देत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये मोठे राजकीय युद्ध पेटवत आहे. महाविकास आघाडीच्या मोर्चाला आता राज ठाकरे यांच्या मनसेचाही पूर्ण पाठिंबा मिळाला असून, त्यांनी 'मतदार याद्या दुरुस्त केल्याशिवाय महाराष्ट्रात निवडणुका घेऊनच दाखवा', असा थेट इशाराही दिला आहे. यापूर्वी त्यांनी 'दुबार मतदार जिथे दिसेल तिथे त्याला फोडून काढा', असेही आक्रमक आवाहन केले होते. विरोधकांचा हा तीव्र विरोध असतानाही आयोगाने निवडणुकीची घोषणा केल्याने राजकीय संघर्ष आता आणखी वाढणार का, हे पहावे लागेल.






