मुंबई : कार्तिकी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी साजरी होणारी वैकुंठ चतुर्दशी यंदा ४ नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. शिवपुराणानुसार भगवान विष्णूंनी भगवान शंकरांना हजार कमळे अर्पण केली होती, त्यानंतर प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्यांना सुदर्शन चक्र बहाल केले. म्हणूनच हा दिवस विष्णू आणि शिव या दोन्ही देवतांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी केलेले काही उपाय जीवनात सुख, शांती आणि प्रगती आणतात असे सांगतात.
सकाळी लवकर स्नान आणि पूजन करा
या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. नंतर गंगाजल मिसळलेल्या पाण्याने भगवान विष्णू आणि भगवान शिव यांचा अभिषेक करा आणि विधिवत पूजा करा. विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण केल्यास विशेष शुभ फळ लाभते.
देवघरात तुपाचा दिवा लावा
वैकुंठ चतुर्दशीला घरातील देवघरात तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. शक्य असल्यास भगवान विष्णूंना हजार कमळांची फुले अर्पण करा. या दिवशी ‘ॐ नमः शिवाय’ आणि ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ हे मंत्र किमान हजार वेळा जपल्यास दोन्ही देवतांचे कृपाशिर्वाद मिळतात.
बेल आणि तुळशी अर्पण करण्याची परंपरा
या दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा एकमेव दिवस आहे जेव्हा भगवान विष्णूंना बेलाची पाने आणि भगवान शिवांना तुळशीची पाने अर्पण केली जातात. त्यामुळे तुम्हीही या दिवशी भगवान विष्णूंना बेलाची आणि भगवान महादेवांना तुळशीची पाने अर्पण करावीत. असे केल्याने प्रगतीचे मार्ग खुलतात असे सांगतात.
उपवास आणि दीपदानाचे महत्व
वैकुंठ चतुर्दशीला उपवास केल्याने पुण्य प्राप्त होते. संध्याकाळी नदीकाठी किंवा तलावाजवळ १४ दिवे लावल्यास भगवान विष्णू आणि महादेव दोघांचेही आशीर्वाद लाभतात. या विशेष दिवशी केलेली ही उपासना जीवनात सकारात्मकता आणि समृद्धी घेऊन येते.

    




