Tuesday, November 4, 2025

रोहित आर्य प्रकरणात मराठी सिनेनाट्य क्षेत्रातील कलाकारांची चौकशी होणार

रोहित आर्य प्रकरणात मराठी सिनेनाट्य क्षेत्रातील कलाकारांची चौकशी होणार

मुंबई : पवईतील ओलीस नाट्य प्रकरणात गुन्हे शाखेचे अधिकारी अधिक तपासासाठी आरोपी रोहित आर्यच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी करणार आहेत. रोहितच्या एन्काऊंटर आधी चार ते पाच दिवसांमध्ये आर. ए. स्टुडिओला भेट दिलेल्या आणि रोहितने भेटायला बोलावलेल्या मराठी सिनेनाट्य क्षेत्रातील कलाकारांनाही या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. ज्यात गिरीश ओक, रुचिता जाधव यांचा समावेश आहे.

रोहित आर्य प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात येणार असल्यामुळे सर्व धागेदोरे बारकाईने तपासले जाणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. यामध्ये गिरीश ओक यांचीही चौकशी होणार आहे. आर. ए. स्टुडिओमध्ये अभिनयासाठी मुलांच्या मुलाखती सुरू असताना गिरीश ओक यांनी स्टुडिओला भेट दिली होती. तर रुचिता जाधवसह इतर काही कलाकारांना भावी प्रकल्पांसाठी रोहितने स्टुडिओत येऊन भेट देण्यासाठी संपर्क साधला होता. त्यामुळे या सर्वांची चौकशी होणार आहे.

रोहित याच्यावर गोळी झाडणाऱ्या सहाय्यक निरीक्षक अमोल वाघमारे यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. त्यांनी दिलेल्या जबाबानुसार, स्टुडिओमध्ये त्यावेळी नेमकी काय परिस्थिती होती? याची शहानिशा करण्यासाठी ओलीस असलेल्या प्रत्येकाचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून मुलांच्या पालकांचेही सविस्तर जबाब नोंदवणे बाकी असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >