मुंबई : केवळ एका रात्रीत मुंबईत महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अभियंता पथकाने भांडुप ते सोनापूर (जीएमएलआर) जंक्शनवर ५६ मीटर लांबीचा आणि ४५० टन वजनाचा स्टील स्पॅन यशस्वीपणे बसवला. वडाळा ते कासारवडवली या मुंबई मेट्रो लाईन ४ च्या कामाचा हा महत्त्वपूर्ण टप्पा असून, आता प्रकल्पाची एकूण प्रगती ८४.५ टक्क्यांवर पोहोचली आहे.
अवकाळी पावसासारख्या आव्हानात्मक परिस्थितीत सुद्धा अत्यंत बारकाईने आणि अचूकपणे हे काम पार पाडण्यात आले. दोन गर्डर असलेला हा स्टील स्पॅन ९ उच्च क्षमतेच्या क्रेन्स, २ मल्टी-अॅक्सल पुलर्स आणि १०० हून अधिक कुशल तंत्रज्ञांच्या साहाय्याने बसवण्यात आला. यादरम्यान मुंबईच्या वाहतुकीत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची देखील संपूर्ण खबरदारी बाळगण्यात आली. ही रात्रीची कामगिरी म्हणजे मुंबईला वेगवान, सुरक्षित आणि स्मार्ट प्रवासाच्या आणखी एका पायरीवर नेणारी उल्लेखनीय झेप आहे.
'मेट्रो ४' मार्गिका ३२.३२ किमी, तर 'मेट्रो ४ अ' मार्गिका २.७ किमी लांबीची आहे. या मार्गिकेतील गायमुख- विजय गार्डन दरम्यानच्या ४.४ किमी लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण डिसेंबरमध्ये करून हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. 'वडाळा- ठाणे- कासारवडवली मेट्रो ४' आणि 'कासारवडवली- गायमुख मेट्रो ४ अ' मार्गिका मोघरपाडा कारशेडला जोडण्याच्या कामाला महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए) मान्यता दिली. आता एमएमआरडीएला पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाकडून यासंबंधीच्या प्रस्तावाला मान्यता घ्यावी लागणार आहे.






