मुंबई : मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी! वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो मार्गावर आता प्रवास अधिक आरामदायी होणार आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन लवकरच या मार्गावर सहा डब्यांच्या मेट्रो गाड्या सुरू करण्याचे नियोजन आहे. मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (MMOPL) कंपनीने या डब्यांच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रियेला सुरुवात केली आहे. येत्या काही महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे.
गर्दीतून सुटका, प्रवास अधिक सहज
सध्या मेट्रो वन मार्गावर एकूण सोळा गाड्या धावत आहेत, आणि प्रत्येक गाडी चार डब्यांची आहे. सहा डब्यांच्या गाड्या सुरू करण्यासाठी 32 अतिरिक्त डबे लागणार असून, त्यासाठी एमएमओपीएलने प्रस्ताव नॅशनल अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीकडे पाठवला आहे. परवानगी मिळताच डब्यांच्या खरेदीची प्रक्रिया सुरू होईल. वेळ वाचवण्यासाठी कंपनीने निविदा मागविण्याची तयारी आधीच सुरू केली आहे.
दररोज साडेपाच लाखांहून अधिक प्रवासी
दररोज सुमारे ५.५ लाखांहून अधिक प्रवासी या मार्गावर प्रवास करतात, तर महिन्याला जवळपास १.३ कोटी प्रवासी या मेट्रोचा वापर करतात. विशेषतः कार्यालयीन वेळेत गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होते. सहा डब्यांच्या गाड्या सुरू झाल्यावर प्रवाशांना अधिक जागा मिळेल आणि प्रवास सुलभ होईल.
कर्जबाजारी प्रकल्पाला नवसंजीवनी
मेट्रो वन प्रकल्पावर सुमारे १,७११ कोटी रुपयांचे कर्ज आहे. हे कर्ज सहा बँकांनी दिले होते, मात्र एमएमओपीएलला परतफेड करण्यात अडचणी आल्या. परिणामी हे कर्ज सरकारी नॅशनल अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीकडे विकण्यात आले. त्यामुळे आता नवीन डब्यांच्या खरेदीसाठी त्या कंपनीची परवानगी आवश्यक आहे. परवानगी मिळेपर्यंत एमएमओपीएलने निविदा प्रक्रिया सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
क्षमता वाढणार, प्रवास होणार सुखदायी
सहा डब्यांच्या मेट्रो सुरू झाल्यावर एकावेळी २,२५० प्रवासी प्रवास करू शकतील, जे सध्या १,७५० आहेत. म्हणजेच प्रवासी क्षमतेत जवळपास ३० टक्क्यांनी वाढ होईल. अधिकाऱ्यांच्या मते, या बदलामुळे दररोज १० लाखांहून अधिक प्रवासी मेट्रोचा लाभ घेऊ शकतील.