महाराष्ट्रातील विरोधकांनी काल मुंबईच्या फॅशन स्ट्रीटवरून महापालिका कार्यालयापर्यंत सत्याचा मोर्चा काढला. मनसे, शिवसेना उबाठा गट, शेकाप, माकप आणि इतर विरोधी पक्ष असे, ज्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही किंमत नाही ते या मोर्चात सामील झाले होते. या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि अन्य नेते त्यात शरद पवार गटाचे जयंत पाटील आदी सहभागी झाले होते. मोर्चाला नाव दिले होते सत्याचा मोर्चा. पण हा खरा संधीसाधूंचा आणि असत्याचा मोर्चा होता. कारण मोर्चात जे सहभागी झाले होते त्यांनी कशा प्रकारे भाजपला फसवून आणि भाजपच्या कुबड्या घेऊन सत्ता हस्तगत केली होती, हे दिसले आहे.
राज ठाकरे यांनी तर आपल्या भाषणात ‘दुबार मतदारांना दिसताच क्षणी ठोका’ असा दिव्य संदेश दिला. पण राज हे अशा बोलण्यासाठीच प्रसिद्ध आहेत. काहीही न करता आपल्या वाडवडिलांची इस्टेट भोगत दुसऱ्यांना आपसात लढवायचे आणि स्वतः पोळी भाजून घ्यायची याशिवाय त्यांनी काहीही केले नाही. राज यांची अशी गत तर उद्धव ठाकरे यांची तर दुसरीच गत आहे. त्यांना महापालिकाही हातातील जाऊ द्यायची नाही, म्हणून त्याना ही संधी वाटली तर नवल नाही. त्यामुळे त्यांनीही राज यांच्या मदतीने महापालिका ताब्यात घेण्याचा निकराचा आणि शेवटचा प्रयत्न चालवला आहे. त्यामुळे त्यांचे भाषणही भडकाऊ झाले. पण जो माणूस मुख्यमंत्री असतानाही केवळ घरी बसून सरकार चालवत होता आणि त्यासाठी फेसबुक लाईव्ह करत होता आणि लोकांना उपदेशाचे डोस पाजत होता, त्याने लोकांना आता भडकवावे आणि लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकून त्याच्या पाठीमागे जावे यासारखा भाबडेपणा नाही. राज आणि उद्धव हे दोघेही संपलेले आहेत, किमान महापालिका तरी वाचवावी, यासाठी त्यांचे अपयशी प्रयत्न चालू आहेत.
शेकापचे सारे पदाधिकारी भाजपमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे जयंत पाटील(शेकाप) हे कशाच्या आधारे या मोर्चात सामील झाले ते त्यांनाच ठाऊक. मुख्य प्रश्न आहे तो ठाकरे बंधूंचा. उद्धव आणि राज यांच्या हातात काहीही गमावण्यासारखे उरले नाही. त्यामुळे त्यांनी हा मोर्चा काढला आणि त्याला नाव दिले सत्याचा मोर्चा. पण तो असत्याचा मोर्चा आणि आपली शेवटची पत पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न आहे हे सिद्ध झाले. फेक नरेटिव्ह सेट करण्यासाठी यावेळी विरोधकांनी मोर्चात मतचोरीचा आरोप आणला होता. दुबार मतदारांना दिसता क्षणी ठोका, असे राज यांनी आवाहन केले, तर उद्धव यांनीही जवळपास तसेच केले. पण या मोर्चात सामील झालेले राष्ट्रवादी(शरद पवार) गटाचे शरद पवार यांनी मागे एकदा माथाडी कामगारांना दोनदा मतदान करण्याचा सल्ला दिला होता. आधी एकदा साताऱ्यात मतदान करा आणि पुन्हा नवी मुंबईत मतदान करा, असा अजब सल्ला दिला होता. तेच विरोधक आता दूबार मतदारांबाबत धमकीवजा इशारा देत आहेत. त्यात मतचोरीचेही आरोप आहेत. हे आरोप करून राहुल गांधी वारंवार प्रसिद्धी मिळवत असतात. पण राहुल गांधी हे आरोप कधीही सिद्ध करू शकलेले नाहीत. तोच कित्ता उद्धव ठाकरे आणि आता तर राज यांनीही गिरवला आहे. पण यात दोघांचेही नुकसान आहे. कारण मतचोरीचा आरोप वारंवार करूनही एकदाही सिद्ध होऊ शकलेला नाही.
राज आणि उद्धव यांच्या मोर्चाला उत्तर म्हणून भाजपनेही मुंबईत प्रतिमोर्चा काढला आणि विरोधकांचा मोर्चा किती संधीसाधूंचा आहे, महापालिका वाचवण्यासाठी चालवलेले निष्फळ प्रयत्न यातून दिसतात. राज आणि उद्धव आपल्या ताकदीचा उपयोग गरीब मतदारांवर डोळे वटारण्यासाठी करत आहेत. पण याचा उपयोग होणार नाही. आता मतदार शहाणा आणि सूज्ञ आहे. त्यामुळे राज आणि उद्धव यांच्या धमकावण्याकडे आणि त्यांनी कितीही विखारी प्रचार केला आणि फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला तरी लोक आता शहाणे झाले आहेत. आता पूर्वीसारखा भाबडा मतदार राहिला नाही. या पूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी संविधानाचा फेक नरेटिव्ह सेट करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. तो फारसा यशस्वी झाला नाही. पण त्यामुळे भाजपच्या जागा कमी झाल्या. तोच कित्ता आता पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने गिरवण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. पण जनता हा फेक नरेटिव्ह हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही हे दिसतेच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि अजित पवार गट हे तिघेही विरोधकांच्या या प्रचाराच्या तंत्रास बळी न पडण्यास सक्षम तर आहेतच पण विरोधकांचा डाव त्यांच्याच अंगावर उलटवण्यासही समर्थ आहेत. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यापूर्वी सत्याचा मोर्चा काढला होता. त्यानंतर आज विरोधकांनी सत्तेचा मार्ग शोधण्यासाठी सत्याचा मोर्चा काढला आहे. पण जनता विरोधकांच्या या फेक नरेटिव्हला फसणार नाही. राज आणि उद्धव यांची भाषणे मात्र राणा भीमदेवी थाटाची झाली. पण त्यांना आता कुणीच भुलणार नाही. कारण हा मोर्चात सारे ढोंगी सामील झाले आहेत. त्यामुळे राज आणि उद्धव यांनी कितीही गर्जना केल्या तरी त्या वायाच जाणार आहेत, यात काहीही शंका नाही. मोर्चात मुंबईच्या भल्यासाठी काहीही नव्हते, तर खोटे नरेटिव्ह सेट करण्यासाठी होते. ठाकरेचीं शिवसेना तर ते वर्षानुवर्ष करत आली आहे. पूर्वी ते सारख्या मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे असा फेक नरेटिव्ह सेट करत असत. भोळे मतदार त्यांना फसतही असत. केवळ मतदाराना निवडणुकीपुरते असे भासवण्याचा प्रयत्न असे. विरोधकांचा हाही डाव यशस्वी होणार नाही आणि ही बाब वारंवार सिद्ध झाली आहे.