मुंबई : देशातील सर्वात मोठा आणि सर्वात लांब शहरी बोगदा रस्ते मार्ग म्हणजे ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प अत्यंत वेगाने आकार घेत आहे. मुंबईत महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) उभारण्यात येत असलेला आणि ११.८ किमी लांबीचा बोगदा प्रकल्प ठाणे येथील घोडबंदर रोडला थेट पश्चिम द्रुतगती महामार्गाशी जोडणार आहे. या भूमिगत मार्गामुळे ठाणे ते बोरिवलीपर्यंतचा २३ किमीचा प्रवास, ज्याला सध्या ६०- ९० मिनिटे लागतात, तो अवघ्या १५ मिनिटांतच पूर्ण होणार आहे.
ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पामुळे लाखो प्रवाशांना ठाणे आणि बोरिवली दरम्यान थेट व जलद दळणवळणाची सोय मिळून त्यांच्या वेळेची मोठी बचत होणार आहे. याबरोबरच घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीत तसेच संपूर्ण परिसरातील वायू व ध्वनी प्रदूषणात लक्षणीय घट होईल व या भागाचा सर्वांगीण व शाश्वत विकास साध्य होईल. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील रस्ते प्रवासातील ही मोठी क्रांतीच घडणार आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली जाणारा हा बोगदा अत्याधुनिक टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) च्या साहाय्याने बांधला जात आहे. या तंत्रज्ञानामुळे सुरक्षित, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक बांधकाम सुनिश्चित होणार आहे. हा प्रकल्प दोन समांतर टनलचा आहे, प्रत्येक टनलमध्ये दोन लेन आणि एक आपत्कालीन लेन (एकूण ३ लेन) असतील, तसेच दर ३०० मीटरवर क्रॉस-पॅसेजेस असतील. बोगद्यात हवा खेळती रहावी यासाठी अत्याधुनिक व्हेंटिलेशन प्रणाली तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अद्ययावत अग्निशमन यंत्रणा, धूर संवेदक आणि एलईडी साईनबोर्ड्स या मार्गिकेवर लावले जाणार आहे. हा क्रांतिकारी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा कालावधी मोठ्या प्रमाणावर कमी होईल, वाहतूक कोंडी कमी होईल, प्रदूषणात घट होईल आणि नागरिकांना वेगवान, स्वच्छ व स्मार्ट प्रवासाचा अनुभव मिळेल.
भौगोलिक कामांची सद्यस्थिती
- 
ठाणे येथे टीबीएम लॉन्चिंग शाफ्टसाठीचे उत्खनन- ऑक्टोबर २०२४ पासून सुरू, आता काम अंतिम टप्प्यात.
 - 
ठाणे येथील कास्टिंग यार्ड पूर्ण आणि कार्यान्वित; बोरिवली येथील यार्डची उभारणी सुरू.
 - 
जमीन अधिग्रहण ठाण्यात जवळपास पूर्ण; बोरिवली येथे पीएपी पुनर्वसन सुरू.
 - 
‘नायक’ आणि ‘अर्जुना’ ही दोन टीबीएम यंत्रे
 - 
चेन्नईतील हेरेनकनेट कंपनीतून आणण्यात आली आहेत.
 

    




