Monday, November 3, 2025

Telangana Bus Accident : थरकाप उडवणारा अपघात! हायस्पीड लॉरी थेट बसमध्ये घुसली; किंचाळ्या आणि रक्ताचा सडा; २० हून अधिक लोकांचा दुर्दैवी अंत!

Telangana Bus Accident : थरकाप उडवणारा अपघात! हायस्पीड लॉरी थेट बसमध्ये घुसली; किंचाळ्या आणि रक्ताचा सडा; २० हून अधिक लोकांचा दुर्दैवी अंत!

तेलंगणा : तेलंगणा राज्याच्या रंगारेड्डी (Rangareddy) जिल्ह्यातील चेवेल्ला मंडल (Chevella Mandal) येथे झालेल्या एका भीषण बस अपघातामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. या दुर्घटनेत मृतांची संख्या वाढून २० वर पोहोचली आहे. हा भीषण अपघात हैदराबाद-विजापूर महामार्गावर (Hyderabad-Vijaypur Highway) चेवेल्ला मंडळातील मिर्झागुडा (Mirzaguda) जवळ घडला. तंदूर डेपोची आरटीसी बस आणि गिट्टीने भरलेला टिप्पर ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, टिप्पर ट्रकमध्ये भरलेली खडी बसच्या आत कोसळली. यामुळे बसमधील अनेक प्रवासी चिरडले गेले. या भीषण दुर्घटनेत टिप्पर चालकाचाही जागीच मृत्यू झाला, तर डझनभर प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बसमध्ये ७० हून अधिक प्रवासी होते. यातील २० जणांना आपले प्राण गमवावे लागले असून, जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमींवर चेवेल्ला येथील रुग्णालयात उपचार सुरू

तेलंगणामधील चेवेल्ला मंडल येथे टिप्पर आणि आरटीसी बसच्या जबर धडकेनंतर अपघातग्रस्त बसमध्ये मोठा गोंधळ उडाला. अपघातानंतर बसमध्ये आरडा-ओरडा, किंकाळ्यांनी वातावरण भरून गेले आणि अफरातफरी माजली. अनेक प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. अनेक प्रवासी चिरडले गेले होते, तर जखमींच्या किंचाळ्या, रक्ताने भरलेली सीट असे हृदयद्रावक दृश्य घटनास्थळी दिसत होते. अपघाताचे वृत्त कळताच स्थानिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत बचाव कार्य सुरू केले. बसमधील जखमींना बाहेर काढून उपचारांसाठी चेवेल्ला येथील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले असून, अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक सूचना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य जलद गतीने पूर्ण करावे आणि जखमींना सर्वोत्तम उपचार मिळावेत, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

जखमींवर हैदराबादमध्ये उपचार करा; मुख्यमंत्र्यांचे तातडीचे निर्देश

अपघातात जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला तात्काळ हैदराबादमधील (Hyderabad) रुग्णालयात हलवावे, अशा सूचना त्यांनी तेलंगणाचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक यांना दिल्या आहेत. जखमींच्या उपचारांमध्ये कोणतीही कमतरता नसावी आणि त्यांना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, याची काळजी घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना प्रत्येक स्तरावरील परिस्थितीची माहिती देण्याचे आणि अपघाताबाबत सतत अपडेट्स देण्याचीही सूचना दिली आहे. तसेच, घटनास्थळाजवळील मंत्र्यांनी तातडीने तेथे पोहोचून परिस्थितीचा आढावा घेण्याचे आणि प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या संकटाच्या काळात प्रशासन पूर्ण क्षमतेने काम करेल, अशी ग्वाही दिली आहे.

Comments
Add Comment