अलिबाग : अलिबाग शहराजवळील जिल्हा न्यायालयाच्या पाठीमागील समुद्रकिनारी फिरायला आलेल्या चार मित्रांपैकी दोघे तरुण समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने आत ओढले जाऊन बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी घडली. या घटनेनंतर पोलीस व स्थानिक प्रशासनाकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
नवी मुंबईतील सानपाडा येथून चार मित्र अलिबागमध्ये फिरण्यासाठी आले होते. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ते जिल्हा न्यायालयाच्या पाठीमागील समुद्रकिनारी पोहोण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उतरले. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांच्यापैकी दोन तरुण शशांक सिंग (वय १९, रा. उलवे, उरण) व पलाश पखर (वय १९, रा. सानपाडा, नवी मुंबई) हे समुद्राच्या भरतीच्या प्रवाहात वाहून जात बेपत्ता झाले. या घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली. मात्र रविवारी दुपारपर्यंत या दोन्ही तरुणांचा शोध लागला नव्हता. स्थानिक मच्छीमारांची मदत पोलिसांनी घेत समुद्रात शोधमोहीम सुरू केली असून, कोस्ट गार्ड व आपत्ती व्यवस्थापन पथकांनाही माहिती देण्यात आली आहे. भरती-ओहोटीच्या परिस्थितीमुळे शोधकार्यात अडथळे येत असले, तरी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.






