Monday, November 3, 2025

'पप्पू, टप्पू आणि अप्पू' - महाआघाडी म्हणजे गांधीजींची तीन माकडं!

'पप्पू, टप्पू आणि अप्पू' - महाआघाडी म्हणजे गांधीजींची तीन माकडं!

योगी आदित्यनाथ यांचा बिहारमधून राहुल, तेजस्वी, अखिलेशवर हल्लाबोल

दरभंगा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाआघाडीच्या नेत्यांवर थेट हल्ला चढवला आहे. दरभंगा येथील जाहीर सभेत बोलताना योगींनी काँग्रेस नेते राहुल गांधी (पप्पू), राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव (टप्पू) आणि समाजवादी पक्षाचे (SP) अध्यक्ष अखिलेश यादव (अप्पू) या तिघांची तुलना थेट महात्मा गांधींच्या तीन माकडांशी केली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, "तुम्ही महात्मा गांधी यांच्या तीन माकडांबद्दल ऐकले असेलच, जी 'वाईट बोलू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट पाहू नका' हा संदेश देतात. तशीच तीन माकडे आता महाआघाडीत सामील झाली आहेत."

योगींनी या तिन्ही नेत्यांची खिल्ली उडवत त्यांचे वर्णन केले...

पप्पू (राहुल गांधी): "चांगले बोलू शकत नाही."

टप्पू (तेजस्वी यादव): "चांगले पाहू शकत नाही."

अप्पू (अखिलेश यादव): "सत्य ऐकू शकत नाही."

या तिघांकडून बिहारमध्ये झालेल्या विकासकामांकडे सर्रास दुर्लक्ष करून अपप्रचार केला जात असल्याचा आरोप योगींनी केला.

विकासकामांवर दुर्लक्ष आणि माफियांच्या बाजूने उभे राहण्याचा आरोप

योगी आदित्यनाथ यांनी महाआघाडीवर माफियांसोबत हातमिळवणी करणे आणि राज्यात जातीय तेढ निर्माण केल्याचा गंभीर आरोप केला. त्यांनी म्हटले की, "भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने बिहारमध्ये अनेक विकासकामे केली असतानाही विरोधी महाआघाडीचे नेते माफियांना मिठी मारून राज्याची सुरक्षा बिघडवण्याचा प्रयत्न करीत आहेत."

ते पुढे म्हणाले, "बंदुका आणि पिस्तुलांनी यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था कलंकित केली आहे. हेच लोक तुमच्यामध्ये जातीच्या आधारावर विभाजन करतात, घुसखोरांच्या पाठीमागे उभे राहतात आणि राष्ट्रीय सुरक्षेशी छेडछाड करतात."

राहुल गांधींवर टीका करताना योगी म्हणाले की, "राहुल गांधी जिथे जातात, तिथे भारताविरुद्ध बोलतात. काँग्रेस आणि आरजेडीचे सरकार आले की राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडते."

केंद्र सरकारच्या निर्णयांचे समर्थन, घुसखोरांना हाकलण्याचा इशारा

केंद्र सरकारने कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमधून पाकिस्तानी घटक काढून टाकले, त्याचप्रमाणे सीमावर्ती भागांमधून घुसखोरांना हाकलून लावू, असा इशाराही योगींनी दिला. त्यांनी 'डबल इंजिन' (नितीश कुमार आणि भाजपाचे) सरकार कोणत्याही भेदभावाशिवाय सर्व घटकांना योजनांचा लाभ देत असल्याचे स्पष्ट केले.

आरजेडीच्या कार्यकाळावर टीका करताना ते म्हणाले, त्यांच्या काळात गरिबांचे रेशन हडपले गेले. आज तब्बल आठ कोटी लोकांना मोफत रेशन मिळत आहे. "जर मतदानात फूट पडली, तर आपले तुकडे होतील," असा धोक्याचा इशाराही योगींनी मतदारांना दिला.

काँग्रेसकडून 'हनुमानाचा अपमान' म्हणत पलटवार

योगी आदित्यनाथ यांच्या या टीकेला काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी योगींच्या वक्तव्याला 'हनुमानाचा अपमान' असल्याचे म्हटले आहे. "स्वत:ला योगी म्हणवणारे व्यक्ती आपल्या विधानांमधून हनुमानजींचा अपमान करीत आहेत. यावर आम्ही काही बोलणार नाही, बिहारमधील जनता सर्वकाही पाहत आहेत," असे पवन खेरा म्हणाले.

बिहारमधील २४३ विधानसभा जागांसाठी ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यांत मतदान होणार असून, १४ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होईल.

योगी आदित्यनाथ, बिहार निवडणूक, राहुल गांधी, तेजस्वी यादव, अखिलेश यादव, महाआघाडी, भाजप प्रचार, दरभंगा सभा, Yogi Adityanath, Bihar Election, Pappu, Tappu, Appu, Marathi News, Rahul Gandhi, Tejashwi Yadav, Political News, Yogi Adityanath on Bihar Election 2025, Bihar Election 2025

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >