३२ अतिरिक्त डबे खरेदीसाठी निविदा काढण्याची तयारी सुरू
मुंबई : मुंबईकरांचा मेट्रो प्रवास आता लवकरच गर्दीमुक्त होणार आहे. घाटकोपर- वर्सोवा मेट्रो-१ ही सहा डब्यांची होणार आहे. मेट्रो-१ मार्गिकेसाठी ३२ अतिरिक्त डब्यांच्या खरेदीसाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहे. मेट्रोचे संचलन करणाऱ्या मुंबई मेट्रो- वनने त्यासाठी ही निविदा काढण्याची तयारी सुरू केली असून येत्या काही महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
मुंबई मेट्रोच्या घाटकोपर- वर्सोवा या मेट्रो मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची संख्या जास्त आहे. ही प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रवाशांकडून मेट्रो प्रवासाला मिळाणारा प्रतिसाद आणि वाढती गर्दी लक्षात घेता आता मुंबई मेट्रोने घाटकोपर- वर्सोवा मार्गावर धावणाऱ्या मेट्रोच्या डब्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मेट्रो- १ मार्गावर सध्या ४ डब्यांच्या १६ मेट्रो धावत आहेत. या सर्व मेट्रो ६ डब्यांच्या करण्यासाठी ३२ अतिरिक्त डबे लागणार आहेत. मुंबई मेट्रो- १ ने मेट्रोच्या डब्यांची संख्या ६ करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात केली आहे. या ३२ अतिरिक्त डब्यांच्या खेरदीसाठी इंडिया डेब्ट रिझोल्यूशन कंपनीमार्फत नॅशनल एसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीकडे प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाला कंपनीने हिरवा झेंडा दाखवल्यानंतर हे ३२ अतिरिक्त डबे खरेदी केले जाणार आहे. जर ३२ डबे खरेदी झाले तर मुंबई मेट्रो १ मार्गावर चारऐवजी सहा डब्यांची मेट्रो धावेल.
मुंबई मेट्रो- १ मार्गावर धावणाऱ्या मेट्रो चारऐवजी सहा डब्यांची झाली तर प्रवाशांची वाहतूक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल. आता सध्या धावणाऱ्या ४ डब्यांच्या मेट्रोमधून एकावेळी १,७५० प्रवाशांची वाहतूक केली जाते. जर मेट्रोच्या डब्यांची संख्या ६ झाल्यावर यामधून एकावेळी २,२५० प्रवासी एकावेळी प्रवास करू शकतील. त्यानुसार मेट्रो १ वरून दिवसाला १० लाख प्रवासी प्रवास करू शकतील. त्यामुळे मेट्रो- १ मार्गावरील गर्दी देखील कमी होण्यास मदत होईल. सध्या मेट्रो- १ च्या मार्गीचे लांबी ही ११.४ किलो मीटर इतकी आहे. या मेट्रो मार्गावर १२ स्थानके आहेत. या मेट्रो मार्गावर सध्या दिवसाला १६ मेट्रो धावतात. दिवसाला या मार्गावर लोकलच्या ४८६ फेऱ्या होतात. या मार्गावरून गर्दीच्यावेळी धावणाऱ्या २ मेट्रो गाड्यांमधील वेळ ३.२० मिनिटे इतका आहे. तर इतर वेळी दोन मेट्रोमधील वेळ ६ मिनिटे असते.






