नवी मुंबई : अखेर भारताचे स्वप्न साकार झाले. भारताच्या महिला संघाने आयसीसी वर्ल्डकप पहिल्यांदाच जिंकला. नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय दक्षिण आफ्रिकेला भोवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने ५० षटकांत २९९ धावा करण्याचे आव्हान दक्षिण आफ्रिकेला दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव ४५.३ षटकांत २४६ धावांत आटोपला. भारताने फायनल मॅच ५२ धावांनी जिंकली.
दक्षिण आफ्रिकेकडून ताझमीन ब्रिट्स २३ धावा करुन धावचीत झाली. अँनेके बॉश शून्य धावा करुन श्री चरणीच्या चेंडूवर पायचीत झाली. सुने लुस २५ धावा करुन शफाली वर्माच्या चेंडूवर तिच्याच हाती झेल देऊन परतली. मॅरिझॅन कॅप चार धावा करुन शफाली वर्माच्या चेंडूवर रिचा घोषकडे झेल देऊन परतली. सिनालो जाफ्ता १६ धावा करुन दीप्ती शर्माच्या चेंडूवर राधा यादवकडे झेल देऊन तंबूत परतली. अँनेरी डर्कसेन ३५ धावा करुन दीप्ती शर्माच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाले. लॉरा वोल्वार्ड १०१ धावा करुन दीप्ती शर्माच्या चेंडूवर अमनजोत कौरकडे झेल देऊन परतली. क्लो ट्रायॉन नऊ धावा करुन दीप्ती शर्माच्याच चेंडूवर पायचीत झाली. अयाबोंगा खाका एक धाव करुन धावचीत झाली तर नॅडिन डी क्लार्क १८ धावा करुन दीप्ती शर्माच्या चेंडूवर हरमनप्रीतकडे झेल देऊन परतली. क्लार्क बाद झाला आणि भारताच्या विजयावर औपचारिक शिक्कामोर्तब झाले. भारताकडून दीप्ती शर्माने पाच, शफाली वर्माने दोन तर श्री चरणी एक विकेट घेतली. दक्षिण आफ्रिकेचे दोन खेळाडू धावचीत झाले.
याआधी प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने ५० षटकांत सात बाद २९८ धावा केल्या. भारताकडून स्मृती मंधानाने ४५ धावा, शफाली वर्माने ८७ धावा, जेमिमा रॉड्रिग्जने २४ धावा, हरमनप्रीत कौरने २० धावा, दीप्ती शर्माने ५८ धावा, अमनजोत कौरने १२ धावा, रिचा घोषने ३४ धावा, राधा यादवने नाबाद ३ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून अयाबोंगा खाकाने ३ तर नॉनकुलुलेको म्लाबा, नॅडिन डी क्लार्क आणि क्लो ट्रायॉन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.






