छत्रपती संभाजीनगर : फक्त २८० किलो वजन, चमकदार शरीर, मजबूत बांधा, वेगवान चाल यामुळे संपूर्ण मराठवाड्यात लोकप्रिय असलेल्या हिंदकेसरी कॅप्टन बैलाची १६ लाख ५१ हजार रुपयांमध्ये विक्री झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील वाकी या गावातील कॅप्टन नावाच्या बैलाची खरेदी मध्य प्रदेशमधील बैतुलच्या पशूप्रेमीने केली आहे.
कन्नड तालुक्यातील आदर्श गाव अशी वाकी गावाची ओळख आहे. या वाकी गावात राहणाऱ्या बाजीराव जंजाळ यांनी त्यांच्याकडे असलेल्या कॅप्टन बैलाची १६ लाख ५१ हजार रुपयांमध्ये विक्री केली. काही वर्षांपूर्वीच बाजीराव जंजाळ यांनी कॅप्टनची खरेदी केली होती. कॅप्टन हा मैसूर ठीलारी जातीचा बैल आहे. या बैलाला संतुलित आहार आणि प्रशिक्षण देण्यासाठी तसेच त्याची नियमित देखभाल करण्यासाठी त्यांनी दोन कर्मचारी नियुक्त केले होते. दुधासाठी दोन गायी खरेदी केल्या होत्या. दोन गायी सकाळ-संध्याकाळ पाच पाच लिटर दूध देत. हे दूध कॅप्टनला नियमित दिले जात होते. कॅप्टनला नियमित आंघोळ घातली जात होती. त्याला जमिनीवर चटई अंथरुन कायम त्यावर बसवले जात होते. कॅप्टनचे वजन २८० किलो आणि उंची पाच फूट सहा इंच होती. या सौंदर्यामुळे कॅप्टनची ओळख एक आदर्श बैल म्हणून झाली होती.
काही दिवसांपूर्वी हरिदास जंजाळ एका स्पर्धेसाठी कॅप्टन बैलाला घेऊन गेले होते. या स्पर्धेच्या निमित्ताने उत्तर प्रदेश येथील रामप्रसाद राठोड या पशूप्रेमीची नजर कॅप्टन वर पडली. यानंतर रामप्रसाद राठोड यांनी कॅप्टन बैल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि हरिदास जंजाळ यांच्याशी चर्चा केली. चर्चेअंती सौदा निश्चित झाला. अखेर रामप्रसाद राठोड यांनी कॅप्टन बैलाची खरेदी केली.






