Sunday, November 2, 2025
Happy Diwali

बाजारात अजूनही दोन हजार रूपयांच्या नोटा, RBI ने दिली धक्कादायक माहिती

बाजारात अजूनही दोन हजार रूपयांच्या नोटा, RBI ने दिली धक्कादायक माहिती
नवी दिल्ली : देशभरात पुन्हा एकदा २०००च्या नोटा चर्चेचा विषय ठरत आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) नुकताच अहवाल जारी करत मोठा खुलासा केला आहे की, नोटबंदी-सदृश निर्णयाला दीड वर्ष उलटले असतानाही अजूनही तब्बल ५८१७ कोटी मूल्याच्या २०००च्या नोटा बाजारातून परत आल्या नाहीत.बहुतेक लोकांना वाटत होते की या नोटा पूर्णपणे चलनातून गायब झाल्या आहेत, मात्र आरबीआयच्या आकडेवारीने चित्र वेगळे दाखवले आहे. रिझर्व्ह बँकेने शनिवारी जाहीर केलेल्या निवेदनात सांगितले की, १९ मे २०२३ रोजी दोन हजार रूपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय जाहीर झाला तेव्हा या नोटांची एकूण किंमत ३.५६ लाख कोटी रुपयांची होती. आता ती केवळ ५८१७ कोटी रुपये इतकीच उरली आहे. म्हणजेच आरबीआयच्या मते ९८.३७ टक्के या नोटा परत बँकिंग व्यवस्थेत जमा झाल्या आहेत. आरबीआयने स्पष्ट केले आहे की दोन हजारच्या नोटा अजूनही कायदेशीर चलन आहेत आणि व्यवहारात स्वीकारल्या जाऊ शकतात. मात्र या नोटांची छपाई बंद करण्यात आली असून बँका त्या पुन्हा जारी करणार नाहीत. १९ मे २०२३ पासून आरबीआयच्या देशभरातील १९ प्रादेशिक कार्यालयांमध्ये या नोटा जमा किंवा बदलण्याची सोय करण्यात आली आहे. ९ ऑक्टोबर २०२३ पासून सामान्य जनतेसाठी ही प्रक्रिया आणखी सुलभ करण्यात आली आहे. लोक आता इंडिया पोस्ट मार्फत देखील दोन हजार रूपयाच्या नोटा कोणत्याही आरबीआय कार्यालयात पाठवून आपल्या बँक खात्यात रक्कम जमा करू शकतात. ही कार्यालये अहमदाबाद, बेंगळुरू, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पटना आणि तिरुवनंतपुरम येथे आहेत. आरबीआयने सांगितले की दोन हजारच्या नोटांच्या परतीच्या स्थितीबाबत तो वेळोवेळी अद्ययावत माहिती देत राहील. आर्थिक तज्ञांच्या मते काही नोटा अजूनही ग्रामीण भागात किंवा रोख व्यवहारांवर आधारित व्यवसायांमध्ये अडकल्या असण्याची शक्यता आहे, तर काही लोकांनी या नोटा स्मृतीचिन्ह किंवा कलेक्शन म्हणून जपून ठेवल्या आहेत.
Comments
Add Comment