क्राइम : अॅड. रिया करंजकर
लग्न ही अशी एक व्यवस्था आहे, निभावली तर चांगल्या प्रकारे निभावता येते अन्यथा लग्न संपणार असेल तर ते कोणत्याही प्रकारे संपतेच. लग्न म्हणजे एक पुरुष आणि स्त्री याचे नातेसंबंध नसतात, तर त्यामध्ये दोन कुटुंबांच्या विचारांची देवाण-घेवाण असते. अनेक नाती बांधली जातात. काही नात्यांमध्ये हा समझोता शेवटपर्यंत जुळतच नाही.
रेश्मा आणि समीर यांचा प्रेमविवाह झाला होता. दोघे धर्माने जरी हिंदू असले तरी जातीने वेगवेगळे होते. दोघांच्या घरांत खाण्यापिण्यापासून ते बोलण्या- सांगण्यापर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये तफावत होती. रेश्माने समीरवर प्रेम आहे म्हणून लग्न केलं होतं, पण आपल्या पुढ्यात पुढच्या आयुष्यात काय वाढून ठेवलेलं आहे याची तिला जराही कल्पना नव्हती. रेश्मा सुशिक्षित आणि सदन कुटुंबात वाढलेली मुलगी होती. आचार विचारांचे तिला स्वातंत्र्य होते, तर याच्या विरुद्ध समीर याच्या घरामध्ये वातावरण होते, आचारा विचारांमध्ये सुशिक्षितपणा नव्हता. रेश्माला प्रथम वाटलं की बदल होईल; परंतु माणसांचे स्वभाव कधीही बदलत नसतात या गोष्टीची तिला कल्पनाच नव्हती. ती नोकरी करणारी महिला असल्यामुळे कामावर जाताना तीची धावपळ होत असे. कारण ती नवऱ्यासोबत गावामध्ये राहत होती. नोकरीसाठी ती गावामधून शहरात जात असे. लग्नानंतर काही वर्षांनी अशा प्रकारे प्रवास केला. पण गावचे विचार वेगळेच असतात. नोकरी केली म्हणून काय झालं घरी येऊनही तिने काम केलं पाहिजे अशा विचारांची सासू तिच्या घरात होती. मुलगी झाल्यानंतर तिची अधिक धावपळ वाढली म्हणून ती जास्त करून शहरात राहणाऱ्या आपल्या आई-वडिलांकडे राहू लागली.
मुलीला गावाकडे आणि शहराकडे ठेवू लागली. यात रेश्माची आणि मुलीची कसरत होऊ लागली. ती जशी मोठी होऊ लागली, तसा तिच्या शाळेचा विचार मनात येऊ लागला. गावाकडील आता सर्वजण शाळेमध्ये मुलांना शहरात इंग्लिश मीडियमला टाकत असल्यामुळे आपण कमावते पालक आहोत आणि आपल्याही मुलीला इंग्लिश मीडियमलाच घातलं पाहिजे या विचाराने रेश्मा आणि समीरने आपल्या मुलीला शहरामध्ये शाळेत घालण्याचं ठरवलं; परंतु कोणत्या शाळेत घालायचं या गोष्टीवरून त्यांच्या मनात अनेक दिवस वाद चालला. शेवटी रेश्माने जिथे सांगितलं त्या शाळेत मुलीला प्रवेश घेण्यात आला आणि त्यासाठी दोघांनी शहरात राहण्याचा विचार केला. दोघे भाड्याने शहरामध्ये राहू लागले; परंतु समीर सतत आपल्या गावाकडच्या घरी जाऊ लागला आणि त्यामुळे पुन्हा रेश्माला मुलीला सांभाळून नोकरी करताना ओढाताण होऊ लागली. समीर बोलू लागला, आपण मुलीला आपल्या गावाकडूनच शाळेत घेऊन जाऊया आणि तिथे आपण दोघेही नोकरीला पुढे जाऊ. पण रेशमाची नोकरी ही जरा कष्टाची होती तसं समीरचं नव्हतं. म्हणून तो मुलीला जबरदस्तीने आपल्या गावाकडेच घेऊन जात असे आणि तिथूनच दररोज शाळेतही घेऊन येत असे. यामुळे रेश्मा आणि मुलीमध्ये अंतर निर्माण होऊ लागलं होतं.
गावाकडे चांगलं खेळायला मिळतं, मजा करायला मिळते, कोण अभ्यास विचारत नाही म्हणून मुलगी आपण गावाकडेच राहू. या विचाराची होऊ लागली होती. पण दररोज ही मुलगी ४० किलोमीटर प्रवास करत होती. मोठी माणसं थांबतात तिथे लहान मुलांचं काय. पण समीर ही गोष्ट स्वीकारायलाच तयार नव्हता. आपल्या मुलीला कोणता त्रास होत नाही. ती व्यवस्थित आहे. व्यवस्थित शाळेत जाते आणि व्यवस्थित येते. मुलगी ज्या स्टॉपला उतरायची त्या स्टॉपच्या अगोदरच समीर तिला उचलून घेऊन घरी घेऊन जाऊ लागला. या सर्व गोष्टींमुळे रेश्मा आणि समीरमध्ये वाद होऊ लागले. रेश्मा अधून- मधून आपल्या गावाकडच्या घरी जात-येत होती. रेश्मा ही आता आपल्या आई-वडिलांकडे राहू लागली होती. त्यांच्यात अनेक प्रकारे समझोता करण्याचा प्रयत्न केला, पण होत नव्हता. कायद्याने बघायला गेलं, तर मुलगी १८ वर्षे होईपर्यंत आपल्या आईच्या ताब्यात असते, पण ही गोष्ट समीर मानायला तयार नव्हता. ज्या मुलीसाठी त्यांनी शहरात राहणं ठरवलं होतं त्याच मुलीवरून आता त्यांच्यामध्ये वाद होऊ लागले होते. ज्या मुलीच्या भविष्याचा विचार करून त्यांनी शहरातल्या शाळेत टाकलं होतं त्या मुलीच्या भविष्याबरोबर रेश्मा आणि समीरचं भविष्य धोक्यात आलं होतं. मुलगी आपल्याकडे राहणार आणि आपण तिचं बघणार असं रेश्मा सांगत होती, तर समीर आपल्या मुलीला आईकडे सोडायला तयार नव्हता. मी मुलीचं सर्व करतो आणि करेन, हा त्याचा हेका चालू होता. जर मुलीला आपल्याकडे जबरदस्तीने ठेवलं, तर आपली पत्नी आपल्याकडे राहायला येईल हा त्याचा गोड गैरसमज झालेला होता. तो सर्व लोकांना सांगत सुटला होता, बायको कोर्टात गेली तर मी स्वतःला संपवेन. बायको आपल्या सोबत राहत नाही म्हणून तो मानसिकरीत्या कमजोर झाला होता.
मुलीच्या भविष्याचा विचार करून दोघांनीही शहरात राहण्याचा विचार केला होता आणि आता समीर परत आपल्या गावाकडेच राहायला लागला होता. शहरात वाढलेल्या रेश्माने लग्न झाल्यानंतर कसं तरी तोडजोड करत गावाकडच्या घरी राहणं पसंत केलं होतं. नोकरी आणि घर या कामाच्या गराड्यात रेश्मा मनाने आणि शरीराने थकत होती. शहरातून गावाकडे प्रवास करणे आणि गावाकडून शहराकडे प्रवास करणे हे शारीरिकरीत्या आता तिला जमत नव्हतं. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या रेश्माने आपण टिकवत असलेल्या लग्नाचं नातं संपवायचा विचार केला, कारण या नात्यामध्ये मुलीचं कुठेतरी नुकसान होतंय आणि याला जबाबदार आपण आहोत असं तिला वाटू लागलं. समीरचं वागणं तिला पटत नव्हतं. दोघांचंही आपल्या मुलीवर जीवापाड प्रेम होतं. त्या मुलीवरच्या प्रेमाखातर नातं टिकवलं तरी पण ते नवरा-बायकोच नातं राहणार नव्हतं. कारण रेश्मा मुळातच सुशिक्षित घराण्यात जन्माला आल्यामुळे तिचे विचारही वेगळ्या पद्धतीचे होते आणि त्या विचारांमध्ये तफावत असल्यामुळे रेश्मा आणि समीरचे सतत वाद होत होते.
अजूनही दोघं नवरा-बायको असल्यामुळे मुलगी काही दिवस आईकडे तर काही दिवस वडिलांकडे राहत असल्यामुळे तिच्याही मनावर वेगळ्या पद्धतीने परिणाम होत होते. कोर्टात गेल्यावर कायदेशीररीत्या एका पालकाकडे आपल्या मुलीचा ताबा येईल आणि तणावात जगत असलेलं आयुष्यात कुठेतरी मोकळा श्वास घेता येईल असा रेश्मा विचार करू लागली. समीरला सर्वांनी समजावून बघितलं पण काहीच फरक पडत नव्हता म्हणून शेवटी रेश्मानेच हा प्रेमाचा त्रिकोण संपवायचा विचार केला.
रेश्माचं म्हणणं होतं गाव आणि शहर जवळ आहे हा सतत गावाकडे जातो. जर हा मुंबईला नोकरीला असता तर काय केलं असतं. समीरच म्हणणं होतं मी गाव सोडणार नाही आणि रेशमाचं म्हणणं होतं गावासाठी माझी नोकरी आणि माझं करिअर संपवणार नाही.
हे त्रिकोणी कुटुंब वैचारिक पातळी वेगळी असल्यामुळे संपण्याच्या मार्गावर आलेलं आहे. समीरने मुलगी माझ्यापासून वेगळी केली, तर मी स्वतःला आणि मुलीलाही संपवेल अशी धमकी रेश्माला दिली होती. रेश्माने ठरवलं होतं की जे काही होईल ते होऊन जाऊ दे. कारण धमकी देऊनच समीरने रेश्माशी लग्न केलं होतं. मी धमकीला फसले आहे पण आता माझी मुलगी धमक्यांना फसणार नाही हा निर्धारच तिने केला होता.
(सत्यघटनेवर आधारित)






