लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर
मनुष्याला जीवनात यश, मान-सन्मान आणि कीर्ती हवी असते. पण ही कीर्ती केवळ इच्छा करून किंवा स्वप्न पाहून मिळत नाही. यशाची पहिली पायरी मेहनत आणि दुसरी पायरी सातत्य हीच असते. जीवनात मोठेपण मिळवायचे असेल, तर कठोर परिश्रम, त्याग आणि चिकाटी हा पर्याय टाळता येत नाही.
कीर्ती पाहो जाता सुख नाही। सुख पाहता कीर्ती नाही। विचारेवीण कोठेचि नाही। समाधान॥ - दासबोध
‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’ असेही समर्थांनी सांगितले आहे. मात्र फुकटची कीर्ती कठीण आहे. दु:ख सहन केल्याशिवाय, अविश्रांत परिश्रम केल्याशिवाय कीर्ती प्राप्त होत नाही. कीर्ती हे जीवनसत्त्व आहे. काही जण कीर्तीसाठी उलट अरिष्ट परिस्थिती निर्माण करतात. परिश्रम केल्याशिवाय कीर्ती प्राप्त नाही होऊ शकत. लोकमान्य टिळकांना एकाने विचारले - “मी काय केले म्हणजे लोक मलादेखील लोकमान्य म्हणतील?” त्यावर टिळकांनी त्वरित उत्तर दिले - “मला लोकांनी लोकमान्य म्हणावे ही अपेक्षा सोडून दे.” कीर्ती हे उद्दिष्ट नसावे, तो आपल्या कठोर श्रमांचा, त्यांगाचा परिणाम असावा. थोर पुरुषांची कीर्ती ही सुगंधाप्रमाणे सर्वत्र पसरते. टिळकांनी आपला देह चंदनासारखा झिजवला. शाळेत शिक्षकांची नोकरी करत असताना त्यांनी कधी पगार घेतला नाही. दोन वेळा तुरुंगवास सोसला. मंडालेच्या तुरुंगात तर त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ’गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहिला.
जरा सावरकारांचे चरित्र वाचा. त्यांना स्वातंत्र्यवीर ही पदवी उगीच मिळाली नाही. त्यांना दोन जन्मठेपेच्या शिक्षा झाल्या. अंदमान येथील काळ्या पाण्यात त्यांना जे जेवण मिळे त्याने त्यांचे पोट बिघडले. घाण्याच्या बैलाला जुंपावा तसे कोलू ओढून तेल काढण्यासाठी त्यांना जुंपले गेले. त्यांना रक्ती आव पडण्याचा त्रास सुरू झाला. तेव्हा डॉक्टरानी रोज दूध घेत जा म्हणून सांगितले. पण तुरुंगातील बारीने त्यांना दूध देण्याचे नाकारले. सावरकरांनी या विरोधी वातावरणात “कमला” नावाचे महाकाव्य लिहिले. तुरुंगातील कैद्यांसाठी साक्षरतेचे वर्ग सुरू केले. रत्नागिरी येथील तुरुंगात त्यांनी अस्पृश्यता निवारणीची मोहीम हाती घेतली. पतितपावन मंदिर हरिजनांसाठी खुले केले.’ माझी जन्मठेप’ हे सावरकरांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. पण त्यात त्यांनी कुठेही इंग्रज सरकार किंवा बारी यांच्याबद्दल एकही अक्षर वाईट लिहिले नाही. कीर्ती हवी असेल तर आपल्याला आपली सहनशक्ती, प्रेम, कळकळ वाढवावी लागते.
परिश्रम करणारा माणूसच उंच भरारी मारतो. झाडावर बसलेला पक्षी कधी उडायचं हे ठरवतो, पण उडण्यासाठी त्याला पंख हलवावेच लागतात. त्याप्रमाणे यश हवे असेल, कीर्ती हवी असेल, तर मनातील क्षमतांना, बुद्धीला आणि आत्मविश्वासाला सतत परिश्रमांची जोड देणे आवश्यक आहे. परिश्रमाशिवाय मिळालेली कीर्ती टिकत नाही; पण परिश्रमातून मिळालेली कीर्ती चिरंतन असते.
इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वांकडे पाहिले, तर एक गोष्ट स्पष्ट दिसते - लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्य लढे, सावरकरांचा त्याग, विवेकानंदांची साधना, अब्दुल कलाम यांची जिद्द, महात्मा फुले व सावित्रीबाई फुलेंची समाजसेवा - हे सर्व परिश्रम आणि ध्येयनिष्ठेमुळेच शिखरावर पोहोचले. त्यांनी संकटांपुढे हार मानली नाही, म्हणूनच जग आज त्यांना कीर्ती आणि सन्मानाने स्मरते.
कीर्ती ही वेडे धैर्य, निष्ठा आणि प्रामाणिक प्रयत्न मागते. परिश्रमामुळे माणूस घडतो, त्याचा स्वभाव परिपक्व होतो आणि त्याची कीर्ती लोकांच्या मनात घर करते. कष्टाशिवाय फळ नाही आणि घामाशिवाय यश नाही, हीच जीवनाची खरी दिशा आहे.
म्हणूनच विद्यार्थ्यांनी, तरुणांनी आणि स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने निराशेवर मात करून, सहनशीलता आणि आत्मविश्वासाने परिश्रमाची वाट चालली पाहिजे. परिश्रमाचा प्रत्येक थेंब एक दिवस यशात रूपांतरित होतो आणि त्यातून मिळते ती - सत्य, सुंदर आणि टिकणारी कीर्ती. यशाचे shortcuts नाहीत. परिश्रमच यशाचा एकमेव महामार्ग आहे आणि कीर्ती ही त्या प्रवासाची गौरवमय मंजिल आहे.”






