महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे
महाराजा बली हा असूर सम्राट असून प्रल्हादाचा नातू व विरोचनाचा पुत्र होता. तो आठ चिरंजीवांपैकी एक आहे. तो एक आदर्श न्यायप्रिय प्रजावात्सल राजा म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच तो महान विष्णुभक्त असल्याचाही पुराणात उल्लेख आहे. तामिळनाडूतील महाबलीपूरम ही त्याची राजधानी असल्याचे मानले जाते.
एकदा दुर्वासमुनी फिरत असताना त्यांना विद्याधरी (पुराणात विद्याधरला अर्ध देवता मानतात त्यांची पत्नी) दिसली. तिच्या हातातील सुगंधी फुलांच्या हाराचा सुगंध सर्वत्र दळवळत होता. तिने तो हार दुर्वासांना अर्पण केला. तो हार मस्तकावर धारण करून दुर्वास ऋषी जात असताना त्यांना ऐरावतावर बसून येणारा इंद्र दिसला. त्यांनी प्रसन्नतेने तो हार इंद्राच्या अंगावर फेकला. तो हत्तीच्या मस्तकावर पडला. हत्तीने तो सोंडेने फिरवून खाली पृथ्वीवर फेकला. आपल्या देणगीचा असा झालेला अपमान पाहून दुर्वासांनी इंद्राला वैभवहीन व राज्यहीन होण्याचा श्राप दिला. यामुळे राज्यहीन व शक्तीहीन झालेला इंद्र ब्रह्मदेवासह श्री विष्णूंकडे गेले. विष्णूंनी देवांना पुन्हा ऐश्वर्या संपन्न होण्यासाठी व अमर होण्यासाठी अमृत प्राप्त करण्यासाठी समुद्रमंथन करण्याचा सल्ला दिला. हे समुद्रमंथन देव-दानव दोघांनी मिळून करावयाचे ठरविले. त्यासाठी इंद्र असूर सम्राट बलीराजाकडे गेले. देव व दानवांनी आपसात मैत्री करून समुद्रमंथन करण्याचे ठरविले. समुद्रमंथनातून निघालेल्या १४ अनमोल रत्नांची देव दानवांमध्ये वाटणी झाली. त्यातून निघालेला पांढराशुभ्र अश्व उच्चै:श्रवा असूर राजा बलीच्या वाट्याला आला. शेवटी निघालेले अमृत भगवंतांनी मोहिनी रूपाने देवांनाच पाजले. हे पाहून दैत्य खवळले. त्यांनी ताबडतोब देवांवर हल्ला चढविला. इंद्र व बलीमध्ये तुंबळ युद्ध झाले. बलीने देवांवर अग्नीचा वर्षाव केला. त्यामुळे सर्व देव होरपळू लागले. बलीने मायावी युद्ध आरंभिले. घाबरलेले देव भगवंताला शरण गेले. भगवंतांनी मायेचा नाश केला. इंद्राने आपल्या शस्त्राचा प्रहार करताच बली आपल्या वाहनासह जमिनीवर कोसळला. ब्रह्मदेवाच्या आज्ञेनी नारदाने मध्यस्थी करून युद्ध थांबवले. दैत्य मृत बलीला घेऊन शुक्राचार्यांकडे गेले. शुक्राचार्यांनी बलीच्या शरीरात पुन्हा चैतन्य निर्माण केले. बलीने पुन्हा उमेदीने स्वारी करून देवांचा पराजय केला. सर्व देव भगवान श्री विष्णूंकडे गेले. विष्णूने बली हा आपला भक्त असल्याने त्याला आपण ठार करणार नसल्याचे सांगितले. पण तरीही तुमचे संकट निवारणासाठी मी वामन अवतार घेऊन तुमचे संकट दूर करेन असे आश्वासन दिले. देवतांचे दुःख पाहून देव माता अदितीनेसुद्धा पती कश्यपाकडे देवतांचे दुःख निवारण करणारा पुत्र व्हावा अशी विनंती केली. कश्यपांनी तिला व्रताद्वारे विष्णूची आराधना करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तिने आराधना करताच प्रत्यक्ष विष्णूंनी तिला देवतांचे कष्ट निवारण्यासाठी आपण तुझ्या पोटी जन्म घेऊन देवतांचे संकट दूर करू असे सांगितले. शुक्राचार्यांनी बळीराजाला इंद्रप्रद प्राप्त करण्यासाठी १०० अश्वमेघ यज्ञ करण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे ९९ यज्ञ पूर्ण करून शंभरावा यज्ञ नर्मदेच्या किनाऱ्यावर करत असताना भगवान विष्णू एका तपस्वी बालकाच्या रूपात आले. बलीला त्यांनी दानामध्ये केवळ तीन पावले जमीन मागितली. शुक्राचार्यांनी तपस्वी बालकाच्या रूपातील विष्णूला ओळखून हे कारस्थान असल्याचे लक्षात येताच त्यांनी बलीला या कारस्थानाला बळी न पडण्याची विनंती केली. मात्र बलीने बटूची इच्छा पूर्ण करण्याचा मनोदय जाहीर केला. तेव्हा शुक्राचार्यांनी सूक्ष्म रूप घेऊन झारीतील छिद्रात लपून पाणी अडवून अडथळा निर्माण केला. मात्र बलीने झारीच्या छिद्रात काडी घालून टोचले असता शुक्राचार्य यांचा डोळा फुटला. अपमानीत झालेले शुक्राचार्य आपल्या मुलासह तिथून निघून गेले. बलीने वामनाला तीन पावले पृथ्वी दान केली. मात्र वामनाने विशाल रूप धारण करून पहिल्या पावलात पूर्ण पृथ्वी व दुसऱ्या पावलात पूर्ण आकाश व्यापले व तिसरे पाऊल कुठे ठेवू म्हणून विचारले, असता बलीने आता केवळ आपले शरीर शिल्लक आहे तेव्हा आपण माझ्या मस्तकावर पाऊल ठेवावे, अशी विनंती केली असता बटू वामनाने तिसऱ्या पावलाद्वारे बलीला पाताळात ढकलले व तेव्हापासून पाताळात असुरांचे राज्य निर्माण झाले. मात्र बलीच्या दानशूरतेवर प्रसन्न होऊन श्री विष्णूंनी त्याला कार्तिक शुद्ध प्रतिपदेला लोक तुझी पूजा करतील असे वरदान दिले. त्यामुळे दिवाळीत बलिप्रतिपदेच्या दिवशी बलीची पूजा करतात.






