प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ
दिवाळीमध्ये घरी भेटायला आलेल्या एका जवळच्या कुटुंबीयांनी अतिशय सुंदर रंगीत वेष्टनात एक चौकोनी डबा मुलीच्या हातात दिला. चहा, फराळ झाल्यावर गप्पागोष्टी करून ते गेले. साहजिकच ते गेल्यावर मुलीने रंगीत वेष्टन बाजूला करून डबा उघडला. मी तिच्या हालचाली निरखत होते. ज्या तऱ्हेने तिने रंगीत वेष्टन फाडले आणि हाताने चुरगळून टीपाॅयवर ठेवले, ते पाहून वाईट वाटले. आता त्या डब्यात काय होते हे फार महत्त्वाचे नाही तर महत्त्वाचे हे आहे की हेच वेष्टन मी उघडले असते (इथे मी ‘उघडले’ हा शब्द वापरला आहे ‘फाडले’ हा वापरलेला नाही.) तर हलक्या हाताने चिकटपट्टी काढून संपूर्ण कागद हाताने सपाट करून त्याला घडी घालून घरात कुठेतरी ठेवला असता!
आता तुम्ही असेही विचारू शकता की असेच जमा केलेले कागद तुम्ही दुसऱ्या माणसांच्या गिफ्ट पॅकसाठी वापरता का? तर तसे अजिबात नाही कारण प्रत्येक वेळेस आपल्याकडे असलेले कागद दुसऱ्या भेटवस्तू बांधण्यासाठी वापरण्यायोग्य राहतातच असे नाही. पण इतका सुंदर रंगीत चकचकीत कागद असा सरळ चुरगळून त्याला कचऱ्याची बादली दाखवणे मला तरी शक्य होत नाही.
मग तुम्ही कचरा जमा करून ठेवता का, असाही प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो. तर असे अजिबात नाही; परंतु त्याचा एकदा तरी उपयोग मी करतेच! त्याच्या झिरमिऱ्या किंवा पताका बनवून सणासुदीच्या वेळेस घराच्या ग्रीलला लावण्यासाठी त्याचा उपयोग करता येतो. मुलांच्या वहीत चिकटवण्याच्या प्रोजेक्टमधील ‘कोलाज’ किंवा सायन्स प्रोजेक्ट इत्यादीसाठी हे रंगीत चकचकीत कागद खूप उपयोगी पडतात.भेटवस्तू गुंडाळण्यासाठी वापरलेल्या सजावटीच्या कागदाशी निगडित माझ्या बऱ्याच जुन्या आठवणी आहेत.
आमच्या लहानपणी अलीकडे मिळतो तसा पातळ फारसा न चुरगळणारा आणि इतका चकचकीत कागद मिळत नव्हता. तो कागद तर पटकन फाटणारा आणि अतिशय चुरगळणारा असा असायचा. त्याच्यावरच्या चिकटपट्ट्या काढतानाच तो कागद फाटायचा. तरी त्यातला अधलामधला वापरण्यायोग्य भाग काढून आम्ही साठवून ठेवायचो. आई-बाबांच्या, आजी-आजोबांच्या, बहीण-भावांच्या तसेच मित्र-मैत्रिणींच्या वाढदिवसाला याच पेपरमध्ये आम्ही त्यांना भेटवस्तू बांधून द्यायचो. नवीन कागद आणणे ही गोष्ट सहजशक्य नसायची. तो विकत घेण्यासाठी आई-वडिलांकडे पैसे मागावे लागायचे किंवा घरात कागद आहे तर परत पैसे खर्च कशाला करायचे, असाही विचार त्या काळात मनामध्ये असायचा. जुने कागद अशा तऱ्हेने पुन्हा वापरताना अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळायच्या. आता अलीकडे आपण ज्या दुकानातून भेटवस्तू घेतो तिथेच आपल्याला अतिशय सुंदर प्रकारे चकचकीत कागद गुंडाळून रिबीन, बो वगैरे लावून, देणाऱ्या-घेणाऱ्याचे नाव लिहिता येईल असे कार्ड लावूनच हातात दिले जातात किंवा जे दुकानदार रॅपिंग पेपर विकतात तेच आपल्या भेटवस्तू व्यवस्थित गुंडाळून आपल्या हातात देतात. त्यामुळे अलीकडच्या मुलांना मी गिफ्ट पॅक करताना पाहिलेले नाही.
रॅपिंग पेपर हा उत्कृष्ट रंगांनी सजवलेला, लॅमिनेटेड असतो. शिवाय त्यात सोनेरी आणि चांदीच्या रंगाचे आकार, ग्लिटर, प्लास्टिक अशाही काही वेगवेगळ्या गोष्टी वापरलेल्या असू शकतात. तो पेपर आकर्षक बनवण्यासाठी घेतलेला खर्च हा ग्राहकाकडूनच शेवटी वसूल केला जातो. म्हणजे म्हणतात ना ‘मीया मूठभर दाढी हातभर!’ त्याप्रमाणेच अलीकडे पन्नास रुपयाच्या वस्तूसाठी रॅपिंग पेपर आणि ते बांधण्यासाठी दिलेले पैसे कदाचित पन्नास रुपयांपेक्षा जास्त असू शकतात.
मित्रपरिवाराकडून दिवाळीच्या निमित्ताने घरी आलेल्या भेटवस्तूंमध्ये अतिशय उत्कृष्ट कॉलिटीचे बॉक्स होते, ज्याच्या आत असलेली मिठाई किंवा ड्रायफ्रूट्स साधारण शंभर दीडशे किमतीच्या आसपासचे होते; परंतु बॉक्सवर पाचशे, सहाशे, सातशे अशा रकमा दिसत होत्या. याचाच अर्थ या खाण्याच्या वस्तू ठेवलेल्या उत्कृष्ट प्रकारच्या आकर्षक बॉक्सच्या किमती दोनशे रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
असो! या बेगडी दुनियेत अस्सल गाभ्यापेक्षा दिखाऊवृत्ती वाढलेली दिसत आहे. या गोष्टीला पर्याय नाही. साखरेत घोळल्याशिवाय, तुपात लोळल्याशिवाय कारले असो की मिठाई गोड आणि खाण्यायोग्य बनतच नाही.मुलगी सहज म्हणाली, “प्रत्येक वेळेस तुम्ही त्या काळात काय करत होतात हे इतरांना सांगण्यापेक्षा या काळातील मुले काय करतात, हे लक्षात घेणे जास्त महत्त्वाचे आहे!”खरंच आहे. जर आपल्याला आजच्या काळात जगायचे असेल तर परत परत आपण पूर्वी काय करत होतो हे नुसते आठवण्यापेक्षा कधीतरी या मुलांप्रमाणे जगून बघूया, असे वाटते. या गोष्टीने कदाचित आपले आर्थिक नुकसान (उदाहरणार्थ स्वतः गिफ्ट पॅक न करता दुकानदारांकडून करून घेणे इत्यादी) होऊ शकते; परंतु त्या बदल्यात आपल्या मुलांना झालेला आनंद आणि ज्याला ही वस्तू देऊ त्याला झालेला आनंद पाहून आपल्याला खूप मानसिक समाधान लाभू शकते!
शेवटी मथितार्थ काय तर भेटवस्तूचा कागद नुसता चकचकीत असून उपयोगाचा नाही, तर भेटवस्तू देण्या-घेण्याच्या व्यवहारात त्याची चमक आपल्याही चेहऱ्यावर परावर्तित झाली पाहिजे, याची काळजी आपणच घेतली पाहिजे!
pratibha.saraph@ gmail.com