जीवनगंध : पूनम राणे
राजू नावाचा एक मुलगा होता. त्याचे पशुपक्ष्यांवर प्रचंड प्रेम होते. दिवाळीची सुट्टी लागली होती. तो आपल्या मामाच्या घरी चार दिवस राहायला गेला होता. विशेष म्हणजे मामाच्या बिल्डिंगच्या समोर एक मोठे कंपाउंड होते. त्या कंपाउंडमध्ये बरीच झाडे होती. भले मोठे वडाचे झाड होते. त्या वडाच्या झाडावर भरपूर पक्षी किलबिलाट करत असायचे. त्यामध्ये विविध प्रकारची झाडे होती.त्या झाडांवर विविध प्रकारचे पक्षी यायचे. त्यांचा किलबिलाट राजूला फार आवडायचा. म्हणून कधी एकदा दिवाळीची सुट्टी लागते आणि आपण मामाच्या घरी जातो, असे त्याला व्हायचे.
मामाच्या घरी ज्या गोष्टीसाठी तो आला होता, ती गोष्ट तिथे नव्हतीच, कारण एका बिल्डरने जागा विकत घेऊन सगळी झाडे जमीनसपाट केली होती आणि तिथे बिल्डिंगचा सांगाडा उभा करण्यात आला होता. बिल्डिंगचे मोठ्या प्रमाणावर काम चालू होते. विशेष म्हणजे मामाच्या गॅलरीमध्ये पक्ष्यांनी घरटं बांधलं होतं. त्या घरट्याकडे राजूचे लक्ष गेले. त्याला अत्यंत आनंद झाला. रोज ते पक्षी त्या घरट्यापाशी येत असताना त्याने पाहिले. पक्ष्यांना पाहण्यासाठीच तो सकाळी लवकर उठून गॅलरीत जाऊन बसायचा. मामाने त्याला घरटे एक महिन्यापासून बांधले गेले आहे, असे सांगितले. तुला जो पक्षी छोटासा दिसतो आहे, तो रोज आठ दिवस मेहनत करत होता. आपल्या चोचीतून एक एक गवताची काडी आणून त्याने ते घरटं तयार केले आहे.
राजू तासनतास त्या घरट्याकडे पाहत बसला होता. घरटे बांधून साधारणता एक महिना उलटला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच दोन-तीन पक्ष्यांचा जोरजोरात आवाज राजूला ऐकू आला.
तो नेहमीच्या वेळेपेक्षा आज लवकरच उठून गॅलरीत जाऊन बसला. पाहतो तर काय,” दोन-तीन पक्षी सारखे घिरट्या घालत होते. जोरजोरात त्यांचा चिवचिवाट चालू होता. हे पाहून राजूने मामाला झोपेतून जागे केले. “मामा... मामा.... बघ ना, ते दोन पक्षी त्या घरट्याभोवती फिरून चिवचिवाट करत आहेत. त्यांना काय झाले माहीत नाही .” मामा म्हणाला,” थांब, मी आंघोळ करतो. देवपूजा करतो. त्यानंतर आपण पाहूया काय झालं ते!” राजूचे मन कशातच लागत नव्हते. त्याचे खाण्याकडे सुद्धा लक्ष नव्हते. त्या पक्ष्यांचा चिवचिवाट पाहून त्याचे मन भरून येत होते. कारण त्याचे पक्ष्यांवर प्रचंड प्रेम होते. मामाने सुद्धा ताबडतोब आंघोळ व देवपूजा करून घेतली.
राजूला म्हणाला,‘चल ,पाहूया, काय झाले ते!’ राजू अधीरतेने मामा काय करतोय ते पाहू लागला. मामाने गॅलरीत बांधलेले घरटे हलकेच आपल्या हाताने खाली घेतले. हळूहळू वरचे गवत त्यांनी बाजूला केले. एक महिन्यापूर्वी हिरवगार असणारं ते गवत पूर्णपणे उष्णतेने वाळून गेलं होतं. गवत बाजूला सारल्यानंतर मामाच्या तोंडातून अरेरे ! असे उद्गार निघाले.
राजू म्हणाला, ‘काय झाले पक्ष्यांची अंडी फोडून तयार झालेले पक्षी उंदराने खाऊन टाकले होते. घरट्यात केवळ पिसे व अंड्याचे फुटलेले कवच होते. ते पाहून राजूला फारच वाईट वाटले. त्याहीपेक्षा मामालाही. राजू प्रचंड रागावला आणि म्हणाला, “मामा आपल्यासमोर जंगल होतं. दाट झाडी होती, ती या बिल्डरने तोडली. त्यामुळेच या चिमुकल्या जीवांना प्राणाला मुकावं लागलं. बिल्डरने त्यांच्या निवाऱ्यावर हल्ला केला. यावर मामा म्हणाला, “लोकसंख्या फारच वाढली असल्याने मिळेल त्या ठिकाणी मानव आपला निवारा शोधतो आहे. त्यामुळे पक्ष्यांना आपल्या जीवाला मुकावे लागत आहे.” पक्ष्यांचा निवारा बिल्डरने वाढत्या लोकसंख्येअभावी छाटून टाकला. बिचारी चिमणी आणि तिची पिल्ले जीवाला मुकले होते आणि राजू दुःखी मनाने त्या फुटलेल्या अंड्याचे कवच आणि पिसांकडे पाहत होता.
तात्पर्य :- निसर्ग वाचवला पाहिजे. पक्ष्यांचा निवारा त्यांचा त्यांना मिळायला हवा.






