विशेष : लता गुठे
भारतातील प्रत्येक राज्यात काही ना काही ऐतिहासिक स्मारके आहेत ज्यामुळे त्या त्या राज्याचा सांस्कृतिक आणि कलात्मक वारसा जिवंत ठेवतात. गुजरात राज्यातील ‘राणी की वाव’ म्हणजेच राणीने आपल्या पतीच्या स्मरणार्थ कायमस्वरूपी पाण्याचा केलेला वैशिष्ट्यपूर्ण जलस्रोत! ही ‘वाव ‘असेच एक अप्रतिम पुरातन जलकुंड आहे. जे दिसायला उलट्या मंदिरासारखे बांधलेले आहे.
पाटण शहरात असलेली ही ‘वाव’ भारतीय वास्तुकलेचा अद्वितीय नमुना असून, तिच्या कलात्मक रचनेमुळे युनेस्कोने २०१४ साली तिला “जागतिक वारसा स्थळ” (वर्ल्ड हेरिटेज साइट) म्हणून मान्यता दिली. चला तर फेरफटका मारून येऊया या ऐतिहासिक वारसा असलेल्या ‘राणीची वाव’ वास्तुकलेला.
‘राणीची वाव’ गुजरात राज्यातील पाटण या प्राचीन नगरात, सरस्वती नदीच्या काठावर वसलेली आहे. ही वास्तू म्हणजे, पुरातन वैशिष्ट्यपूर्ण वास्तूकलेचा अप्रतिम नमुना आहे. एकेकाळी पाटण ही सोलंकी राजवंशाची राजधानी होती. त्या काळामध्ये पाटण शहरांमध्ये अनेक कलात्मक व सांस्कृतिक समृद्धीचा उत्कर्ष झाला होता.
‘वाव’ म्हणजे विहीर किंवा पायऱ्यांनी बनवलेला जलाशय. गुजरात, राजस्थान या प्रदेशात पाण्याची खूप टंचाई होती. ज्या काळात पाण्याची टंचाई निर्माण होत असे त्या काळात या जलाशयाचा वापर जनतेसाठी केला जात असे. पाणी साठविण्याची व उपयोग करण्याची उत्कृष्ट शास्त्रीय पद्धत म्हणजे ही विहीर. ही विहीर केवळ पाण्याचा साठा करण्यासाठी नव्हे तर धार्मिक आणि सामाजिक कारणांसाठीही वापरली जात असे. प्राचीन काळात ‘वाव म्हणजेच ‘स्टेपवेल’ हा जलस्रोत जतन करण्याचा एक उत्कृष्ट मार्ग होता. पण ‘राणी की वाव’ने या संकल्पनेला एक कलात्मक आणि धार्मिक रूप दिले आणि जलदेवतेला ही वास्तू अर्पण केली.
पाटण शहर त्या काळी ‘अनहिलवाड पाटण’ म्हणून ओळखले जाई. हे सोलंकी साम्राज्याचे सांस्कृतिक केंद्र होते. येथील मातृदेवता, कला आणि धर्म यांचा संगम ‘राणी की वाव’मध्ये स्पष्ट दिसतो. ‘राणी की वाव’ ही वाव इ.स. ११ व्या शतकात सोलंकी वंशातील राजा भीमदेव पहिला (Bhimdev I) यांच्या स्मरणार्थ त्यांच्या राणी उदयामती हिने बांधली. पाटण हे त्याकाळी सोलंकी साम्राज्याची राजधानी होते. या वास्तूचे बांधकाम अंदाजे इ.स. १०५० ते १०६० दरम्यान पूर्ण झाले.
‘राणी की वाव’ ही साधी जलवाव नसून, ती एक भव्य भूमिगत महालासारखी वाटते. अंदाजे ६५ मीटर लांब, २० मीटर रुंद आणि २७ मीटर खोल अशी ही वाव सात मजली इमारत आहे. प्रत्येक स्तरावर सुंदर कोरीव स्तंभ, मंडप आणि देवतांच्या मूर्ती कोरल्या आहेत.
वावेत जाण्यासाठी जिने आहेत आणि प्रत्येक पायरीबरोबर वास्तू अधिक खोल व अधिक भव्य होत जाते. वावेत एकूण ५०० हून अधिक कोरीव मूर्ती आहेत, ज्यामध्ये विष्णूच्या विविध अवतारांचे (दशावतार), गणेश, पार्वती, ब्रह्मा, लक्ष्मी, सूर्य, आणि इतर अनेक देव-देवतांचे अप्रतिम शिल्प कोरलेले आहेत ते पाहताना थक्क व्हायला होतं. वावेत जलसंचयासाठी तळाशी एक विशाल जलकुंड आहे. पावसाळ्यात नद्यांना पूर येतात त्या वेळी पुराच्या पाण्याने ही वाव भरली जाई आणि तेथील लोकांना वर्षभर पाणी मिळत असे.
पहिल्या स्तरावर प्रवेशद्वाराजवळ रुंद पायऱ्या आणि आकर्षक कमानी आहेत. दुसऱ्या व तिसऱ्या स्तरावर विष्णू, गणेश, पार्वती आणि सूर्यदेव यांच्या मूर्ती आहेत. चौथ्या ते सहाव्या स्तरावर विविध अप्सरा, दैवी स्त्रिया, नृत्यांगना, गंधर्व, योगिनी, नागकन्या अशा पौराणिक कथांची दृष्यरूपं सौंदर्याची प्रतीकं म्हणून साकार केली आहेत आणि सातव्या म्हणजे शेवटच्या कालच्या स्तरावर जलकुंड आणि मध्यभागी भगवान विष्णूचे ‘शेषशायी’ रूपातील भव्य शिल्प कोरलेले आहेत.
त्या काळात पाणी ही जीवनाची सर्वात मोठी गरज असल्याने वाव बांधण्यामागे केवळ सौंदर्य नव्हते, तर वैज्ञानिक हेतूही होता. पावसाळ्यात नदीचे पाणी या वावेत साठवले जाई, तापमान नियंत्रित ठेवण्याची शास्त्रीय रचना यात होती आणि उन्हाळ्यातही त्यात थंड पाणी राहात असे. कारण या दगडांनी बांधलेल्या खालच्या जळतळात पाणी नैसर्गिकरीत्या थंडगार राहत असे.
या वावेत सुमारे ५०० प्रमुख मूर्ती आणि लहान-मोठ्या मिळून १००० पेक्षा जास्त अलंकारिक शिल्पं कोरलेली आहेत. त्यातील काही उल्लेखनीय शिल्पे आहेत. शिल्पांतील सूक्ष्म भावभावना, अंगविक्षेप आणि अलंकारांची नजाकत पाहून थक्क व्हायला होते.
भिंतींवरील कोरीव काम इतके सूक्ष्म आहे की प्रत्येक देवतेच्या भावभावना, वस्त्र, अलंकार आणि मुद्रांमध्ये प्राण ओतलेला दिसतो. विशेष म्हणजे येथे विष्णू भगवानाचे शेषशायी स्वरूप अत्यंत सुंदररीत्या कोरले आहे. तसेच कामशास्त्र, नृत्य, संगीत, लोकजीवन यांचे दृश्यरूप दाखवणारी अनेक शिल्पे देखील येथे आढळतात, त्यामुळे शिल्पकलेचा सुरेख संगम जाणवतो. ही वाव एकप्रकारे त्या काळच्या शिल्पकारांच्या कल्पकतेचा व सौंदर्यदृष्टीचा सर्वोच्च नमुना आहे.
आज भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग (एएसआय) या वास्तूचे संवर्धन करत आहे. वाव परिसर स्वच्छ, सुशोभित आणि पर्यटकांसाठी खुला ठेवण्यात आला आहे. येथे वार्षिक ‘राणी की वाव फेस्टिव्हल’ आयोजित केला जातो ज्यामध्ये लोककला, हस्तकला आणि गुजराती संस्कृतीचा उत्सव साजरा होतो.