परमेश्वरी भावगंधर्व

विशेष : अभिजीत भूपाल कुलकर्णी


पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी २६ ऑक्टोबर २०२५ रोजी वयाच्या नव्वदीमध्ये प्रवेश केला. त्यानिमित्ताने पंडितजींबद्दल विशेष लेख -


कितीही लिहिले जरी श्रेय शब्दातीत आहे
स्वरार्त वारीयाचे आरूप स्वरांकित आहे
कोण हा वारीया? स्वर ज्याचे आप्त आहे
दीनानाथी दैवी आत्मज ज्यास प्राप्त आहे.


वयाची अठ्ठ्याऐंशी वर्षे पूर्ण होऊन एकोणनव्वदीत प्रवेश करणारे पं. हृदयनाथजी आता कसे जाणवतात? साक्षात परमेश्वरी गोव्याच्या श्री मंगेशाच्या दैवी सप्तसुरांचे आशीर्वाद लाभलेले घराणे म्हणजेच मंगेशकर घराणे.


त्यांच्या आयुष्याचा आयाम रसिकांच्या नजरेच्या वर्तुळाकार दुर्बिणीतून पाहताना, परिघावर मास्टर दीनानाथांचे व्यक्तिमत्त्व पसरलेले दिसते. अवकाशात क्षितिजाचे रंग प्रहराप्रमाणे बदलत असले तरी मूळ अंतरंगाचा गाभा कसा बदलणार? तसे संगीताच्या माध्यमातून हृदयनाथांचे व्यक्तिमत्त्व हे संपूर्णतः दीनानाथांचेच विराट रूप आहे
असे जाणवते.
दीनानाथी स्वर हृदयी,
स्मृती त्यांची मृण्मयी
प्रत्येक सुरावटीत गोवलीत,
त्यांची सच्चाई
दीनानाथी सुरांत गवसे,
हृदयी दडलेली धिटाई


मा. दीनानाथांच्या बंदिशींचे स्वर पं. हृदयनाथांनी गीतात गोवले, नवथर सुंदर शीतल निर्झर असा नवा स्वरऋतुराज निर्माण केला. हृदयनाथांचे जगणे जसे... “ सूर जगावा मंगेशाच्या प्रतिभेने, स्पष्ट तरळावी त्यातून निरागस अनुकंपने’’ पं. हृदयनाथांचा संगीताविष्कार असाच सहज उमटलेला नाही... त्यांची बाबांवरची अपार श्रद्धा, जागवलेल्या रात्री, गवसलेल्या स्वरांच्या सावल्या, अनवट गीतांतून गुंतवल्या, साऱ्या जगाला त्या भावल्या, अन् चिरकाल अनंत त्या जाहल्या...’ म्हणून मला वाटते, स्वरांवर असते का कुणाची मालकी? दीनानाथांचे स्वर कधी होतात हृदयनाथांचे, कधी रसिकांचे अन् मग साऱ्या विश्वाचे... म्हणून म्हणावेसे वाटते, साऱ्या हृदयांचा तू नाथ, मास्टर दीनानाथांचे तू रूप विराट...


प्रथम पुरुष नारायणातून येते... गगन सदन तेजोमय, रसूल-अल्लाह बंदिशीतून उमटते दयाघना...भाली चंद्र असे धरीला नाट्यगीतातून अवतरते... सूर येती विरून जाती... मैं एक सदीसे बैठी हूं... सुरमयी शाम असो वा स्पर्श सांगेल सारी कहाणी अशी अनवट तरीही अवीट, चिरंजीवी गाणी काय सांगतात? हृदयनाथजी या सुरावटींसारखे आहेत...म्हणजे कसे? स्वभावाने मुलायम तरीही चिवट, जिद्दी, हट्टी, बंडखोर, निग्रही, आग्रही... किती विरोधाभासी स्वभाव संयोजन नाही का? सगळं काही तुटून, बुडून करायचं... स्वरांवर, कवींवर, कवितेवर जीव जडवायचा, तोडायचा अन् सांभाळायचाही. अतिशय मनस्वी ! मास्टर दीनानाथही असेच असावेत स्वछंदी !


२६ ऑक्टोबर पं. हृदयनाथ मंगेशकर या भारतीय संगीतातील क्षितीजाचा जन्मदिवस! १९३७ ते २०२५ एकूण अठ्ठ्याऐंशी वर्षे भारतीय संगीत परंपरेत देदीप्यमान स्वरांची अग्नीशाखा शिलगावून स्वरहोत्र तप्त ठेवत भारतीय संगीतास सातत्यपूर्ण स्वसंवेदी द्रष्टेपणाची झळाळी देण्याचं कर्तृत्व ज्या अवलियानं आजन्म केलं ते म्हणजे पं. हृदयनाथ मंगेशकर. त्यांची गाणी, त्यांचे संगीत याबद्दल जगभरातील रसिकांचे शब्दघन ओथंबून बरसतात, रसिक त्यांच्यावर निस्सीम प्रेम करतात. हृदयनाथ नव्वदीच्या उंबरठ्यावर पोहोचले असले तरी चिरतरुण आहेत. ते नवनिर्मिती करत राहतात आजही, अजूनही, दररोज... ‘अमृताचा घनु’, ‘दीदी आणि मी’, ‘सारे काही अभिजात’, ‘मी लता दीनानाथ’ अशा कितीतरी कार्यक्रमांची निर्मिती त्यांनी केलीय आणि गेल्या काही वर्षांपासून ते अखंड साहित्य निर्मिती करत आहेत.


आपल्याकडे अष्टपैलू, बहुआयामी, उत्तुंग असे शब्द त्यांच्या व्यक्तिमत्त्वापुढे थिटे वाटतात. कारण कला, विद्या, कर्तव्य, कर्तृत्व, मनस्वीता, भिडस्त, खास शैलीदार, बाणेदार, काटेकोर, चित्तचोर, क्लीष्ठ, गुणगंभीर, गंभीर, गुणग्राही, सत्यशोधक, स्वराधीस्त, स्वराधिकारी असे अमर्याद गुण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसतात. अगदी बालपणी बालगायक म्हणून सुरू झालेला त्यांचा संगीत प्रवास हा डोळ्यांना दिसतो म्हणून तिथून कारकीर्द सुरू झाली असे आपण मानतो. पण त्यांचा स्वरसहवास अनादी आहे, जसे हे विश्व अखंडित.


‘हे हिंदू नृसिंह... प्रभो शिवाजी राजा, उषःकाल होता होता अशी गाणी म्हणजे त्यांच्या तरुणपणातील स्वर झंझावाताची साक्ष काळाच्या क्षितिजास ओलांडून पुढे झेप टाकणाऱ्या त्यांच्या अशा गाण्यांतून पटते. संगीत मुक्त आहे. नियमांची बंधने घालून तुम्ही स्वरांवर अधिराज्य कसे गाजवू शकणार? असा सवाल करत त्यांनी चौकटी बाहेरील रचना केल्या, गाजवल्या, लोकप्रिय केल्या. समईच्या शुभ्र कळ्या, कशी काळ नागीण, काजळ रातीन ओढून नेला, मी काट्यातून चालून थकले, हे शाम सुंदर, जाईन विचारत रानफुला... बाई माझा लवताय डावा डोळा, उजाडल्यावरी सख्या... विविध आशयाची, विविध प्रकारची अगदी शास्त्रीय बंदीशींपासून, नाट्यगीत, लोकगीत, चित्रपटगीत, अभंग, भावगीत, गजल, देशभक्तीपर अशा सगळ्या प्रकारातील त्यांची शेकडो गाणी स्वरांचा स्वतंत्र सुगंध निर्माण करतात.


संगीतकारांची वैयक्तिक आयुष्यातील दुःखाची पडछाया गाण्यांत उमटत असते असे म्हणतात. हृदयनाथांच्याही काही निर्मितीत असे अनपेक्षित धक्के डोकावतात. आधी सरळ वाटणाऱ्या गाण्यात मध्येच ब्लाईंड टर्न येतो. कधी स्केल बदलते, कधी रिदम पॅटर्न बदलतो, कधी रागरंग बदलतो... अधिकाधिक क्लिष्ठता असतानाही गाणं आत्मिक आनंद देतं. सहज न सापडणाऱ्या गुढतेकडे घेऊन जातं. काहीतरी समजल्यासारखं वाटत असताना काहीच सापडलेलं नसल्याची उद्विग्नता देतं. त्यांनी आयुष्यात खाल्लेले अगणित धक्केच जणू या सुरावटीत जाणवतात. लहानपणीच वडील गेले, त्यात एक पाय बोन टीबीग्रस्त त्यामुळे शारीरिक आगतिकता. लतादीदींसारखी मोठी बहीण तीच त्यांची आई, बाबा, गुरू झाली म्हणून आयुष्यास चांगले वळण लाभले. अन्यथा संगीताचा प्रकाश निर्माण करण्याची ही धुगधुगी त्यांच्यात कोणी शिलगावत ठेवली असती ? असेही ते कधी व्यक्त होतात.


‘असा बेभान हा वारा’ या गाण्यातील सुरावट ऐकता लक्षात येते ‘जगाच्या क्रूर शापांचे’ या स्वरांत तिचा राग दिसतो तर ‘जिव्हारी झेलले भाले’ यात हृदयात तीर घुसून रक्त बाहेर पडतांना जी वेदना होईल ती वेदना दिसते. ‘तुझे सौभाग्यल्याया हे, तुझी होऊन मी आले’ यात अतिशय करुण आर्जवता आहे. ‘तुझे तू घे उरी आता, किती मी हाक ही देऊ’ या स्वरांतून तिची आगतिकता दिसते. पॅराडाॅक्सीक, एक्झाॅटीक, हाॅन्टींग, एकस्टॅटीक ही पंडितजींच्या रचनांची वैशिष्ट्ये आहेत. मानवी मनाचा ठाव घेणारे सूर त्यांच्या प्रत्येक गाण्यातून रसिकांना प्रेमाची, वेदनेची गळ घालतात, अचंबित करतात, जिवलगा होण्याचे आवाहन करतात.


‘जिवलगा राहिले रे दूर घर माझे’ अजिबात वाद्यमेळ नसलेलं हे गीत ज्यात केवळ तानपुरा व स्वरमंडळ एवढाच नाद आहे. एका जुन्या मैफलीत हृदयनाथांनी स्वतः गायलेले ‘जिवलगा’ हे गीत ऐकले, तेव्हा माझ्या मनात शब्दतरंग उमटले...
शिस्तीत गवसावा
एक श्वास बेशिस्त
अन् स्तर त्वचेचा थरथरावा
बे-आकार ज्वानीस जसा
नाद रंध्राचा खरचटून जावा
दिनरात स्वरांच्या ध्यासी
अनवट नटखट चिवट
जिवलगा प्रकटावा
काळीज चिरत चिरत
विलसी विरही यौवनात
तुझाच जिवलगा हुरहुरावा...
श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ‘मोगरा फूलला’ अभंगातील मोगरा फुलून त्याचा वेलू गगनावेरी गेलाय तो मोगरा म्हणजे मा॓ऊलींच्या अश्रुंचीच फुले ! तशी पंडितजींनी स्वरांची जी सुंदर फुले निर्माण केली तीच त्यांच्या आसवांची साक्ष झालीत का?


विशेष आठवण व आशीर्वाद : अभिजीत कुलकर्णी / श्री षण्मुखानंद सभागृह माटुंगा येथे एका कार्यक्रमास गेलो होतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परम पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहन भागवत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पूजनीय सरसंघचालक येणार असल्याने सर्वत्र झेड प्लस कडक बंदोबस्त होता.


मी पंडितजीं ना भेटलो, गाणे रियाज बाबत बोललो असता त्यांनी प्रेमळ गुरुवर्य म्हणून सहज सल्ला दिला. परमेश्वराने तुम्हाला जो कंठ दिला तो निवेदन, निरूपण याकरिता तुमचा आवाज परफेक्ट आहे. त्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा, यशस्वी भव: असा आशीर्वाद दिला. तो सल्ला मी प्रमाण मानून पुढील वाटचाल सुरू केली. आज पत्रकारिता सह निवेदन, लेखन, मिमिक्री अभ्यासक ही माझी वाटचाल सुरू आहे. जन्मदिवसानिमित्त पंडित हृदयनाथ दीनानाथ मंगेशकर या अवलिया संगीतकारास त्रिवार अभिवादन! “जीवेत शरद शतम” हीच सदिच्छा...


(लेखक हे मुक्त पत्रकार असून निवेदक, सांस्कृतिक कला, क्रीडा, सामाजिक राजकीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे
अभ्यासक आहेत).

Comments
Add Comment

मुंबई ते लंडन व्हाया वस्त्रहरण!

कुमार कदम गंगाराम गवाणकर यांनी जागतिक रंगमंचावरून नुकतीच एक्झिट घेतली. कालचक्र कोणाला थांबविता येत नाही.

‘राणीची वाव’ एक अद्वितीय जलमंदिर

विशेष : लता गुठे भारतातील प्रत्येक राज्यात काही ना काही ऐतिहासिक स्मारके आहेत ज्यामुळे त्या त्या राज्याचा

सुलेखनकार अच्युत पालव

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर गेली सुमारे तीन दशके कॅलिग्राफीच्या क्षेत्रात सतत नवेनवे प्रयोग करत, सिंधुदुर्गचे

“आज चांदणे उन्हात हसले...”

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे कालीमातेच्या मंदिरात जसे शाक्तपंथीय पुजारी असतात तसे शांत सात्त्विक

मेक ओव्हर

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर आज संध्याकाळी टेलिव्हिजनवर जुन्या गाण्याच्या कार्यक्रमात एक गाणं ऐकलं-पाहिलं. सगीना

विष्णुभक्त बलीराजाची कथा

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे महाराजा बली हा असूर सम्राट असून प्रल्हादाचा नातू व विरोचनाचा पुत्र होता. तो