मनस्विनी : पूर्णिमा शिंदे
रोज काहीतरी नव्यानं लिहावं, आठवावं अशी रोजनिशी. आयुष्यात यशस्वी व्हायचंय! मग हे करायचं !! स्वयंशिस्त, आत्मविश्वास, मेहनत, प्रयत्न या जोडीला हवं नियोजन. नियोजनात रोज उद्याच्या कामांची यादी असावी. अनुक्रम ठरवून घ्यावा, पण त्याहीपेक्षा आधी रोजच्या रोज रोजनिशीही लिहावी. रोजनिशी म्हणजे रोजच्या जीवनात आलेला अनुभव मांडणे, टिपणे त्याची नोंद ठेवणे. नवं वर्षाला जसं आपण कॅलेंडर बदलतो, तशी डायरी जवळ ठेवतो. त्या-त्या तारखेला कामांचं नियोजन असतं.मला उद्या काय करायचं आहे आणि कशाप्रकारे त्याची वेळ, अनुक्रम, ध्येय योजना ठेवतो आणि ही नोंदवहीत वेळापत्रकाप्रमाणे आपण आदल्या दिवशी लिहितो. उद्याची डायरी म्हणजे नियोजन प्लॅनिंग बुक.
अशाच प्रकारे त्या-त्या दिवशी रोज नोंद ठेवावी. संध्याकाळी अशी एक रोजनिशी आपल्याजवळ ठेवावी. त्या रोजनिशीचं महत्त्व. आपण दिवसभर केलेल्या कार्याचा लेखाजोखा टिप्पणी त्यात असावी. मी आज ही ही तीन सत्कार्य केली. अनुक्रमे एक, दोन, तीन. मी आज याप्रमाणे या-या गोष्टी केल्या. ही गोष्ट सर्वात महत्त्वाची होती व त्यात चांगली कोणती? चुकली कोणती? नवनिर्मिती कोणती, सत्कार्य कोणते? एखादी मनाला भावलेली कौटुंबिक, जिव्हाळा, कार्यालयीन अथवा बसस्टॉप, रेल्वे स्टेशन किंवा ऑफिस सहकारी यांच्यात घडलेला एखादा किस्सा. एखादा धडा किंवा अनुभव जो की पुढे जाऊन आपल्याला खूप काही शिकवून जातो. त्याचप्रमाणे प्रसन्नता, सर्जनशीलता, संवेदनशीलता, सामाजिक बांधिलकी, नैतिक मूल्य असाही यात समावेश करावा. रोज नव्याने काहीतरी शिकावे, लिहावे? उदाहरणार्थ आज कोणते पुस्तक वाचले. त्यामध्ये महत्त्वाचे ठळक वैशिष्ट्य कोणते? मुद्दे कोणते? आज कोणत्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यातून काय शिकलो! वैयक्तिक प्रसंग, आज कोणकोणते लहान-मोठे अनुभव आले? कोणी स्तुती, निंदा, कौतुक केले, याहून आपलाच दोष आपल्याला नव्याने कळला. नव्या नव्या योजना, नवी स्वप्नं नव्या भावनांना, मनोकामनांना आकार देणारी रोजनिशी साकारावी. अशी एक घटना, अनुभव घडामोडी माहिती त्या रोजनिशीत असावी. जिवंत बोलणारी, आपली कलाकृती, आरसा म्हणजे रोजनिशी! छोट्या-मोठ्या अनुभवातून आपण वेळोवेळी काहीतरी अनुभव घेत असतो. त्याचाही त्यामध्ये उल्लेख करावा. आजचा विचार, त्यातून घडणारी कृती, आयुष्याचं पान, सोनेरी क्षण सोबत असणारी ही रोजनिशी. कृतींचा आलेख असतो आणि हा उंच उंच नेण्याचा प्रयास असावा. आपले ध्येय, आपली स्वप्नं, आपला मनोरा गाठण्याचे नियोजन असावे. रोजनिशीत सुद्धा वेळापत्रक असावे. अनुक्रमे लिहावे. मुद्देसूद क्रमवार लिहिताना सहज सोपे स्वच्छ अनुभव वेचलेले असावेत. वाचनी असावेत मग काय त्याच्यामध्ये २५ पैशाच्या कोथिंबीरीपासून ते दाढी पेट्रोलच्या पैशांपर्यंत नाही, तर दिवसाच्या प्रारंभ ते संध्याकाळपर्यंत आचरणात आलेल्या सर्व निवडक महत्त्वाच्या गोष्टींची टिप्पणी असावी. त्यात त्रास, प्रेम, शाबासकी, कौतुक, स्तुती सुमने, निंदा, सुख-दुःख, बरे-वाईट, चांगले-वाईट इत्यादी अनुभव उतरावेत. खंड न पडता दररोज लिहावी, ती नोंदवही म्हणजे रोजनिशी. कुटुंब, शाळा, मित्रपरिवार, गाव, कार्यालय, संघ संस्था इत्यादीचा अनुभवी लेख, माहिती लिहावी. मानापमान, यश, अपयश यांचाही उल्लेख करावा. आपल्या त्रुटींमधून आपणच शिकावे. दोष दुरुस्त करता येतील असे लेखन असावे. त्यामुळे डिजिटल फास्टिंगही होतं. काही वेळ मोबाइलपासून दूर राहता येतं.
इतका वेळ मोबाइलमध्ये घालवण्यापेक्षा जास्तीत जास्त लिखाणाचा सराव होतो. भाषेशी जवळीक साधता येते. आपल्या भावना भाषेतून व्यक्त करता येतात. तुम्ही म्हणाल हे रोज रोज काय लिहायचे? वेळ कुठे आहे? पण हाच वेळ आपण इतर ठिकाणी घालवताच, यापेक्षा सतर्कपणे वेळीच सावध व्हावे. लेखन करावे. लेखकाच्या मनाशी संवेदना संबंध, स्नेह, भावभावना साधण्याचा हा हळूवार कप्पा रोज जपत जावा. वेळ सत्कारणी लागेल. चांगली सवय, अंगवळणी पडेल. स्वयंशिस्तीने स्वतःला उज्ज्वल यशापर्यंत पोहोचवू शकता आणि नवीन क्षितिजे गाठण्यासाठी इतके करायलाच हवे.
रोजनिशी लिहा, आनंदी राहा. कामाच्या नियोजनात थोडावेळ तरी वेळ राखून ही लिहायला हवी. ही पुंजी आहे. पाच मिनिटं तुमच्या आयुष्यात नक्कीच माेलाची प्रगतीची आणि नवनिर्मितीची असतील. ती अनमोल देणगी ठरेल. मगच उद्याची, उदयाची प्रत्येक सकाळ ही आयुष्याची नवी पानं उघडते. जी सकारात्मक प्रेम व आनंदाने भरायची जबाबदारी आपलीच असते. रोजचा दिवस नवा. त्या नव्या क्षितिजापर्यंत पोहोचण्यासाठी रोजनिशी लिहायलाच हवी.






