मेक ओव्हर

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर


आज संध्याकाळी टेलिव्हिजनवर जुन्या गाण्याच्या कार्यक्रमात एक गाणं ऐकलं-पाहिलं. सगीना नावाच्या चित्रपटासाठी किशोर कुमारने गायलेलं ते गाणं तुम्हालाही कदाचित आठवत असेल. गाण्याचे शब्द आहेत...
साला मै तो साहब बन गया । साहब बनके कैसा तन गया । ये सूट मेरा देखो । ये बूट मेरा देखो । जैसे गोरा कोई लंडन का ।।
हे गाणं दिलीप कुमार या अभिनेत्यावर चित्रित झालेलं आहे. एक खेडवळ युवक अंगावर शहरी पोशाख चढवतो. शर्ट-पँट घालतो. अंगावर सूट, पायात बूट, डोक्यावर कॅप आणि हातात छडी घेऊन येतो. स्वतः गोरा इंग्रज असल्यागत नाचतो.


हे गाणं बघताना मला खूप मजाही वाटली अन् त्याचबरोबर मी थोडा अंतर्मुखही झालो. अंतर्मुख एवढ्यासाठी की त्या गाण्यात दिलीपकुमारनं शहरी कपडे चढवून जे रूपांतरण केलंय तसाच किंबहुना त्याहून अधिक भारी प्रकार अलीकडे टीव्हीवरच्या अनेक कलाकारांच्या बाबतीत सर्रास पाहायला मिळतो. कोणतीही गाण्याची, नाचाची स्पर्धा घ्या. त्या स्पर्धेच्या पहिल्या दोन-चार राऊंडमध्ये सामान्य दिसणारे स्पर्धक जसजसे पुढच्या पुढच्या राऊंडमध्ये सरकतात तसतसा त्यांच्या केशभूषेत-वेषभूषेत लक्षणीय बदल होत जातो. त्यांना अधिकाधिक ‘प्रेझेंटेबल’ बनवण्यात येतं. या बदलाला मेक ओव्हर असं म्हणतात.


मेक ओव्हर आणि मेक-अपमध्ये फार फरक आहे. नाटका-सिनेमातील अभिनेत्यांचा मेक-अप ही त्यांच्या भूमिकेची मागणी असते. शिवाजी महाराजांची भूमिका करणाऱ्या नटाचं नाक बसकं असलं तर चालणार नाही. त्यासाठी मेक-अपच्या सह्याय्यानं ते धारदार दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला नकली दाढी-मिशा लावल्या जातात. डोक्यावर जिरेटोप घातला जातो. तशा प्रकारचे कपडे आणि मेक-अप ही त्या भूमिकेची गरज असते. पण....


पण अलीकडे अनेक सिलेब्रिटी कलाकार मेक-अपच्या पुढं जाऊन स्वतःचा मेक-ओव्हर करून घेतात. हल्ली हल्ली तर हे मेक ओव्हरचं फॅड केवळ पडद्यावरच्या कलाकारांपुरतं किंवा उच्चभ्रू वर्गातल्या स्त्री-पुरुषांपुरतं मर्यादित न राहाता तुम्हा-आम्हासारख्या मध्यमवर्गीयांच्याही घरात शिरलंय.


मूळचे कुरळे केस सरळ करून घेणं. ते वेगवेगळ्या रंगानं हायलाईट करून रंगवणं हा तर अगदी सर्रास आढळणारा प्रकार. त्याच्या पुढचा प्रकार म्हणजे डोळ्यांना रंगीत लेन्स लावून डोळ्यांचा रंग बदलायचा. कॉस्मेटिकच्या सहाय्याने नाकाची, गालांची ठेवण बदलायची. लिप लायनरने ओठ कोरून त्यांचा आकार बदलायचा. इत्यादी इत्यादी.


काही जण तर याच्याही एक पायरी पुढे जाऊन शस्त्रक्रियेने आपल्या चेहऱ्या-मोहऱ्याची ठेवणच बदलतात. अपरं नाक धारदार करतात. बोटेक्सची इंजेक्शनं घेऊन चेहऱ्याची त्वचा तुकतुकीत करतात...
‘हा सगळा खटाटोप कशासाठी?’
या प्रश्नाचं उत्तर आहे, ‘चांगलं दिसण्यासाठी. चांगलं दिसून इतरांवर आपली छाप पाडण्यासाठी.’
आपण सुंदर दिसावं, इतरांवर आपली चांगली छाप पडावी अशी इच्छा बाळगण्यात काहीही गैर नाही. तरीदेखील निव्वळ सुंदर दिसण्यापेक्षा सुंदर असणं अधिक महत्त्वाचं आहे असं मला वाटतं.


केवळ मेक ओव्हर करून बाह्यरूपात केलेला बदल हा कितीही चांगला असला तरी तो तात्पुरत्या स्वरूपाचाच असतो. मुख्य म्हणजे तो केवळ वरवरचाच असतो. मेकअप काय किंवा मेक ओव्हर काय असलं काहीतरी करून माणसाचं बाह्य रूप बदललं तरी त्यामागचा माणूस मात्र तोच असतो.


इथे मला इसापनीतीमधली एक गोष्ट आठवते.
एका गाढवाला सिंहाचं कातडं सापडलं. त्यानं ते कातडं अंगावर पांघरून गावातल्या बाया-बापड्यांना, पोरा-टोरांना घाबरवायला सुरुवात केली. त्याचे भाईबंध म्हणजेच इतर गाढवंही त्याच्या या नव्या रूपाला फसली. भ्यायली. त्याला पाहून सर्व प्राणी दूर दूर पळू लागले. आपल्याला बघून सर्वांची घाबरगुंडी उडालीये हे पाहून त्या गाढवाला मोठी गंमत वाटली आणि त्याने त्या उन्मादाच्या भरात आपले पुढचे दोन्ही पाय उचलून नाचायला सुरुवात केली. पण शेवटी कितीही झालं तरी गाढव ते गाढवच. त्याला सिंहासारखी गर्जना कशी करता येणार? तो नेहमीप्रमाणे रेकला, खिंकाळला. त्याचं सोंग उघडं पडलं. गाढवाचं भेसूर ओरडणं ऐकून गावकऱ्यांनी त्याला ओळखला आणि बदडून काढला.
इसापनीतीमधली ही गोष्ट तुम्हालाही ठाऊक असेल.
अलीकडच्या भाषेत सांगायचं झालं तर त्या गाढवाने मेक-ओव्हर करून सिंह होण्याचा प्रयत्न केला होता.
याच मेकओव्हरबद्दल बोलताना संस्कृत
सुभाषितकार म्हणतात,
काकस्य गात्रम् यदि कांचनस्य । माणिक्य रत्नम् यदि चंचूदेशे । एकेक पक्षे ग्रथितम् मणीनाम् । तथापि काको न तु राजहंसः ।।
अर्थ : कावळ्याचं अंग जरी सोन्याने मढवलं, चोचीवर माणिक बसवलं, एकेका पंखावर मोती जडवले तरीही कावळा कधीही राजहंस होत नाही.
मेक-अप आणि मेक-ओव्हरच्या सहाय्यानं बाह्य सौंदर्य खुलवू नका असं माझं म्हणणं नाहीये. पण निव्वळ बाह्य सौंदर्य खुलवण्यापेक्षा आंतरिक सौंदर्याचा विकास करणं अधिक महत्वाचं.


मेक ओव्हरच्या सहाय्यानं बाह्य सौंदर्य वाढवणं ही अत्यंत सोप्पी गोष्ट आहे. पण आंतरिक सौंदर्य वाढविण्यासाठी फार कष्ट करावे लागतात.
व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी केवळ कपडे आणि बाह्य उपचार पुरेसे नसतात. कपड्याच्या आतलं शरीर सुंदर आणि निरोगी राखण्यासाठी नियमित व्यायाम करावा लागतो, तसंच जीभेवर ताबाही ठेवावा लागतो.


ज्ञानात सतत भर घालून अधिकाधिक ज्ञानसंपन्न होण्यासाठी उत्तमोत्तम ग्रंथांचं वाचन करावं लागतं, ज्ञानी माणसांच्या सहवासात राहून त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण करावं लागतं. सतत अभ्यास करावा लागतो.


मेकओव्हर करून लोकांवर प्रथमदर्शनी छाप पडली तरी लोकांमध्ये प्रिय होण्यासाठी आपले विचार आणि आचार चांगले ठेवावे लागतात. सद्वर्तनासाठी मोहाचे अनेक पाश निग्रहपूर्वक तोडावे लागतात.


शारीरिक व्यंग डोळ्यांना दिसतात. ती व्यंग कपड्यांच्या आणि प्रसाधनांच्या सहाय्यानं लपवता येतात. शस्त्रक्रिया करून सुधारता येतात. पण स्वभावातली व्यंग मुळातूनच निपटून काढावी लागतात. स्वभावातली ही व्यंग सहजासहजी दिसत नाहीत, ती दिसण्यासाठी कठोर आत्मपरीक्षण करावं लागतं. आपल्या स्वभावातले दोष ओळखून ते जाणीवपूर्वक दूर करावे लागतात...


आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी कष्टपूर्वक प्रयत्न करावे लागतात, अशाप्रकारे ज्यांनी वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर आपल्या आयुष्याची उंची गाठलेली असते त्यांना बाह्य उपचारांनी मेक ओव्हर करण्याची गरजच नसते.


सिंधुताई सकपाळ, डॉक्टर प्रकाश आमटे, डॉक्टर अनिल अवचट, मेधा पाटकर, डॉक्टर अभय आणि राणी बंग... कोणत्याही प्रकारच्या सौंदर्य प्रसाधनाशिवायही त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं सत्शीलतेचं तेज पाहा.


गान सरस्वती किशोरीताई आमोणकर, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, विख्यात शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्यासारख्या ज्ञानतपस्वी माणसांच्या चेहऱ्यावरच्या ज्ञानतेजाला कोणत्याही बाह्य उपचारांची गरज भासत नाही. म्हणूनच मला वाटतं की, मेक ओव्हर करायचा असेल तर तो केवळ बाहेरून न करता आतूनही व्हायला हवा. त्यासाठी काय काय करायला हवं हेही आपलं आपणच ठरवायला हवं...

Comments
Add Comment

परमेश्वरी भावगंधर्व

विशेष : अभिजीत भूपाल कुलकर्णी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी २६ ऑक्टोबर २०२५ रोजी वयाच्या नव्वदीमध्ये प्रवेश केला.

मुंबई ते लंडन व्हाया वस्त्रहरण!

कुमार कदम गंगाराम गवाणकर यांनी जागतिक रंगमंचावरून नुकतीच एक्झिट घेतली. कालचक्र कोणाला थांबविता येत नाही.

‘राणीची वाव’ एक अद्वितीय जलमंदिर

विशेष : लता गुठे भारतातील प्रत्येक राज्यात काही ना काही ऐतिहासिक स्मारके आहेत ज्यामुळे त्या त्या राज्याचा

सुलेखनकार अच्युत पालव

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर गेली सुमारे तीन दशके कॅलिग्राफीच्या क्षेत्रात सतत नवेनवे प्रयोग करत, सिंधुदुर्गचे

“आज चांदणे उन्हात हसले...”

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे कालीमातेच्या मंदिरात जसे शाक्तपंथीय पुजारी असतात तसे शांत सात्त्विक

विष्णुभक्त बलीराजाची कथा

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे महाराजा बली हा असूर सम्राट असून प्रल्हादाचा नातू व विरोचनाचा पुत्र होता. तो