मुंबई : टी-२० वर्ल्डकप २०२६ जवळ येत असतानाच न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विल्यमसन (३५) याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारत आणि श्रीलंका संयुक्तरित्या टी-२० वर्ल्डकप २०२६ चे आयोजन करणार आहेत. या महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी विल्यमसनने घेतलेला निर्णय न्यूझीलंड संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
विल्यमसनने आतापर्यंत ९३ टी-२० सामने खेळत २५७५ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सरासरी ३३ इतकी आहे. तो न्यूझीलंडच्या वतीने सर्वाधिक धावा करणारा टी-२० खेळाडू ठरला आहे. त्याच्या नावावर १८ अर्धशतक आणि ९५ ही सर्वोच्च धावसंख्या आहे. टी-२० क्रिकेटध्ये २०११ मध्ये पदार्पण करणाऱ्या विल्यमसनने ७५ सामन्यांमध्ये न्यूझीलंडचे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वात संघाने दोनदा टी-२० विश्वचषकाची उपांत्य फेरी (२०१६, २०२२) आणि एकदा अंतिम फेरी (२०२१) गाठली होती.
विल्यमसनने सांगितले की, “हा फॉरमॅट सोडण्याची ही योग्य वेळ आहे. आता पुढील पिढीतील खेळाडूंना जागा देणं आणि त्यांना मोठ्या स्पर्धांसाठी तयार करणं गरजेचं आहे.” त्याने पुढे डेरील मिचेलचे कौतुक करत सांगितले की, “तो एक उत्कृष्ट कर्णधार आहे.”
विल्यमसन आता डिसेंबरमध्ये होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेवर लक्ष केंद्रीत करणार आहे. तो एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी मेहनत घेणार आहे.






