मुंबई : आयपीएल २०२६ हंगामाची तयारी आता जोरात सुरू झाली आहे. सर्व संघांनी रणनिती आखायला सुरुवात केली असून, या वेळी अनेक मोठे बदल पाहायला मिळू शकतात. काही संघांचे कर्णधारही बदलणार असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, या हंगामातील मिनी ऑक्शनविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, IPL 2026 चं मिनी ऑक्शन भारतात नव्हे, तर परदेशात होणार आहे. सध्या भारतात लग्न आणि सणांचा हंगाम सुरू असल्याने बीसीसीआय ऑक्शनचं ठिकाण गल्फ देशांमध्ये हलवण्याचा विचार करत आहे. ओमान किंवा कतार या देशांपैकी एका देशात ऑक्शनचं आयोजन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील वर्षी IPL 2025 चं मिनी ऑक्शन सौदी अरेबियातील जेद्दा शहरात पार पडलं होतं.
बीसीसीआयकडून या वेळी ऑक्शन डिसेंबर २०२५ मध्ये होण्याची शक्यता आहे. तसेच, 15 नोव्हेंबरपूर्वी ऑक्शनची अधिकृत तारीख जाहीर होईल, त्याआधी सर्व संघांना रिटेन खेळाडूंची यादी सादर करायची आहे. खेळाडूंच्या अदलाबदलीबाबत बोलायचं झालं, तर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन नव्या फ्रँचायझीत सामील होऊ शकतो, अशी माहिती आहे. तसेच के.एल. राहुल दिल्ली कॅपिटल्स सोडून KKR मध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रिपोर्टनुसार, कोलकाता संघ त्याला आपल्या टीममध्ये आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. याशिवाय मिचेल स्टार्क (DC), वानिंदु हसरंगा (RR), मयंक यादव (LSG) आणि वेंकटेश अय्यर (KKR) यांसारखे काही खेळाडू रिलीज होण्याची शक्यता आहे.






