Sunday, November 2, 2025
Happy Diwali

आयसीसी महिला वर्ल्ड कप २०२५ : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका फायनल; जाणून घ्या भारताचे सामर्थ्य

आयसीसी महिला वर्ल्ड कप २०२५ : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका फायनल; जाणून घ्या भारताचे सामर्थ्य

आयसीसी महिला वर्ल्ड कप २०२५ मधला सर्वात मोठा सामना आज, रविवार २ नोव्हेंबर रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवला जाणार आहे. हा रोमांचक सामना नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर पार पडणार आहे. दोन्ही संघ फायनलसाठी सज्ज आहेत चला, या अंतिम लढतीआधी आपल्या भारतीय स्टार खेळाडूंबद्दल थोडं जाणून घेऊया

स्मृती मंधाना

भारतीय संघाची स्टार सलामी फलंदाज स्मृती मंधाना तिच्या जबरदस्त फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. तिच्या दमदार कामगिरीमुळेच ती ‘रन मशीन’ म्हणून ओळखली जाते. या वेळी ही ती उत्तम फॉर्ममध्ये आहे. जर फायनलमध्येही तिची बॅटिंग प्रभावी राहिली, तर भारताला विजय निश्चित मिळू शकतो. आत्तापर्यंतच्या सामन्यांमध्ये तिने ८ सामने खेळत ५५.५७ च्या सरासरीने ३८९ धावा झळकावल्या आहेत. सध्या ती सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.

हरमनप्रीत कौर

भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्याकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत. या स्पर्धेत तिची बॅटिंग सातत्यपूर्ण राहिली आहे. सेमीफायनलमध्ये सुरुवातीच्या गडबडीनंतर तिने जेमिमा रॉड्रिग्जसह डाव सावरत संघाला मजबूत स्थितीत आणलं. आता सगळ्यांच्या नजरा फायनलमध्ये तिच्या बॅटिंगकडे असतील. हरमनप्रीतने ८ सामन्यांत ७ डावांतून ३४.२८ च्या सरासरीने २४० धावा केल्या आहेत. ऋचा घोष भारतीय संघातील पावर हिटर म्हणून ऋचा घोष ओळखली जाते. तिच्या आक्रमक फलंदाजीने जगभरातील क्रिकेटप्रेमी प्रभावित झाले आहेत. जर फायनलमध्ये तिच्या बॅटमधून चौकार-षटकारांचा पाऊस पडला, तर भारताच्या विजयाची शक्यता आणखी वाढेल. तिने ७ सामन्यांत ७ डावांतून ४०.२० च्या सरासरीने २०१ धावा केल्या आहेत, आणि तिचा स्ट्राइक रेट तब्बल १३२.२३ आहे.

दीप्ती शर्मा

दीप्ती शर्मा हा भारतीय संघाचा असा एक्का आहे, जी फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीत तितकीच प्रभावी आहे. ती फॉर्ममध्ये आली, तर भारताला कोणीही रोखू शकत नाही. तिने आतापर्यंत ८ सामन्यांत ६ डावांतून २६.१६ च्या सरासरीने १५७ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत तिने ८ सामन्यांत २४.११ च्या सरासरीने १७ विकेट घेतल्या आहेत आणि सध्या ती सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंमध्ये संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहे.

श्री चरणी

भारतीय संघातील युवा फिरकीपटू श्री चरणीने या स्पर्धेत आपल्या अप्रतिम गोलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तिने ८ सामन्यांत २६.०७ च्या सरासरीने १३ विकेट घेतल्या आहेत. तिच्याकडूनही फायनलमध्ये दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. भारताच्या या पाच स्टार महिला खेळाडूंची कामगिरी आजच्या अंतिम सामन्यात निर्णायक ठरणार आहे. देशभरातील क्रिकेटप्रेमींच्या शुभेच्छा आणि अपेक्षा या ‘ब्लू क्विन्स’सोबत आहेत.

Comments
Add Comment