पंढरपूर: कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त परंपरेनुसार आज पहाटे विठ्ठलाची शासकीय पूजा पार पडली. यावर्षी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून हा मान एकनाथ शिंदे यांना मिळाला. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्नीसह पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पूजा केली. उपमुख्यमंत्र्यांसोबतच रामराव बसाजी वालेगावकर व सुशिलाबाई रामराव वालेगावकर (रा. हिमायतनगर जि. नांदेड) या वारकरी दाम्पत्यांला यावर्षी पूजा करण्याचा मान मिळाला.
यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, गृह राज्यमंत्री योगेश कदम, मंत्री भरत गोगावले, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज, खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासकीय महापूजेनंतर पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यास सुरुवात झाली आहे. भागवत एकादशीनिमित्त मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पंढरपूरात दाखल झाले असून त्यांच्या मुखात हरी नामाचा जयघोष असल्याचे दिसून येत आहे.






