सुलेखनकार अच्युत पालव

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर


गेली सुमारे तीन दशके कॅलिग्राफीच्या क्षेत्रात सतत नवेनवे प्रयोग करत, सिंधुदुर्गचे सुपुत्र अच्युत रामचंद्र पालव यांनी एक प्रयोगशील सुलेखनकार म्हणून आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. पालव यांचे शालेय शिक्षण गिरणगावात, परळच्या डॉ. शिरोडकर हायस्कूलमध्ये झाले. देवनागरीने आजवर जो विकास साधला आहे, त्याचा शोध घेण्याचा ध्यास त्यांनी घेतला तो १९८२ मध्ये सर जे. जे. इिन्स्टट्यूट ऑफ अप्लाइड ऑर्टमधून पदविका घेतल्यानंतर. दोनच वर्षांत त्यांनी पंधराव्या ते सतराव्या शतकातील मोडीच्या विकासावर प्रबंध लिहिला. त्यांना यासाठी ‘उल्का अ‍ॅड्व्हर्टायझिंग’ या संस्थेची संशोधन शिष्यवृती मिळाली होती. उल्काचे तत्कालीन कला संचालक र. कृ. जोशी हेच पालव यांचे सुलेखनातले पहिले वहिले गुरू होत. र. कृं.नी कवितेच्या मांडणीत काही प्रयोग केले. काव्यातला आशय व्यक्त करण्यासाठी त्यांनी पारंपरिक मांडणी बदलून प्रत्येक कवितेची दृश्यात्मक रचना केली. रकृंमध्ये कवी आणि कॅलिग्राफर यांचे दुर्मीळ रसायन होते. त्यामुळे समीक्षकांनी त्यांच्या प्रयोगांना दाद दिली.


पालवांनी कॅलिग्राफीला लोकांपर्यंत नेणे हेच आपले ध्येय ठरविले. साधी, सोपी कविता सामान्य रसिकांच्या मनात घर करून राहते, हे पालव जाणून होते. अभिजात मराठी काव्यात गणना होणारे संतकाव्य घराघरांत पोहोचविण्याचा त्यांनी प्रथम प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी ‘सुलेखन रोजनिशी’ हा आगळावेगळा प्रयोग केला. या अभिनव उपक्रमात त्यांनी १९९० साली संत ज्ञानेश्वरांच्या काव्याच्या आधारे पहिली-वहिली ‘सुलेखन रोजनिशी’ बनविली आणि प्रकाशितही केली. नंतर १९९४ आणि १९९५ मध्ये अनुक्रमे संत तुकाराम आणि रामदास स्वामी यांच्यावर त्यांनी रोजनिश्या तयार केल्या. ‘शब्दपुराण’ ही सुलेखन दिनदर्शिका त्यांनी १९९६ मध्ये बनविली. हे त्यांचे प्रयोग यशस्वी झाले. कॅलिग्राफी लोकांच्या रोजच्या कामकाजात गेली, घरांतल्या भिंतींवर जाऊन बसली.


त्यांनी केलेले ‘ॐ’ आणि ‘अल्लाह’ हे पेंटिंग तर एका वेगळ्या स्तरावर घेऊन गेले. सुलेखनाचे सौंदर्यमूल्य जाणून पालवांनी सुलेखनाला चित्रकलेची जोड दिली. सुलेखनातील दृश्यात्मकता आणि श्रवणमूल्य यांची ओळख पटवून देण्यासाठी त्यांनी वादन, गायन आणि नृत्यकलांसोबत सुलेखन सादरीकरणाचे जाहीर प्रयोग केले. सुलेखन एक चळवळ व्हावी हाच त्यांचा ध्यास होता, तो त्यांनी अशा प्रयोगांतून साध्य केला.


ही चळवळ देशव्यापी करण्यासाठी त्यांनी २००७ ते २००८ दरम्यान काश्मीर ते कन्याकुमारी असा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी अनेक ठिकाणी सामान्य लोकांसाठी जाहीर प्रात्यक्षिके सादर केली, महाविद्यालयांमधून त्यांनी विद्यार्थ्यांनाही कॅलिग्राफीचा परिचय करून दिला.


अनेक भाषांतील सुलेखनकारांसोबत कामही केलं. त्यांना प्रसिद्ध जर्मन कॅलिग्राफर प्रा. वर्नर श्नायडर (Werner Schneider) यांचंही मोलाचं मार्गदर्शन लाभलं. आतापर्यंत अच्युत पालवांनी केलेल्या कामांची २६ हून अधिक प्रदर्शनं झाली. मॉस्को, बर्लिन या युरोपिअन शहरांतील म्युझिअममध्येही त्यांच्या कलाकृती ठेवलेल्या आहेत. आशा भोसले, गुलज़ार, अनिल अंबानी, सोनिया गांधी, जॅकी श्रॉफ अशा अनेक मान्यवरांकडे अच्युत पालव यांनी केलेल्या कलाकृती आहेत. सुलेखनावरची विविध आशयाची पुस्तकं प्रकाशित केली. अनेक पुस्तकांची मुखपृष्ठं त्यांनी केली आहेत. त्यात ख्यातनाम कवी, दिग्दर्शक व लेखक गुलज़ारांच्या पुस्तकांचाही समावेश आहे. कॅलिग्राफीची ओळख करून देणाऱ्या ‘काना, मात्रा, वेलांटी’ या महत्त्वाच्या पुस्तकाची निर्मिती त्यांनी केली आहे. कॅलिग्राफीचा अभ्यास आणि कला यांचा मेळ साधणारी अनेक पुस्तकंही त्यांनी लिहिली. केवळ इतकंच नव्हे तर जाहिरात, फॅशन्स, फर्निचर, इंटेरियर आणि इंटरनेट या विविध माध्यमांतूनही कॅलिग्राफीचा व्यावसायिक स्वरूपाचा वापर होऊ शकतो, हे त्यांनी त्यांच्या कलाकृतीतून दाखवून दिलं.


‘जन गण मन’ या राष्ट्रगीतावरही सुलेखन आणि संगीत अशा साथीनं ‘एक मुल्क, एक आवाज, अनेक लिखावट...’ अशा वेगळ्याच कलाकृतीची निर्मिती त्यांनी केली. सुलेखनाच्या साहाय्यानं भाषीय आणि विविध धर्मीय मेळ साधण्यासाठी अरेबिक कॅलिग्राफर सलवा रसूल यांच्यासोबत ‘ईश्वर अल्ला तेरो नाम…’ हे प्रदर्शनही केलं. फक्त कॅलिग्राफेर्सच नव्हे, तर अनेक आर्ट फॉर्म्स विशेषतः संगीत, वादक आणि नृत्यांगना यांच्यासोबत कॅलिग्राफीचं फ्युजनही साधलं.


सुलेखनाचा वापर करून, त्यांत नवनवीन प्रयोग करून स्वतःची कलानिर्मिती करण्यासोबतच सुलेखन ही कला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी त्यांनी केलेलं योगदान मोलाचं आहे. त्यासाठी त्यांनी अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफीची स्थापना करून त्यामार्फत कॅलिग्राफीचे कोर्सेस डिझाईन केले. कॅलिफेस्टसारखे उपक्रम सुरू करून अनेक नवीन कॅलिग्राफर्सच्या कलेला उत्तेजन देण्याचा उपक्रम सुरू केला. भारतातील पहिल्या महिला कॅलिग्राफर्सचं ‘आदिशक्ती... अक्षरशक्ती’ या प्रदर्शनाची आखणी केली. अम्ब्रेला पेंटिंग्जच्या माध्यमातून अनेक नव्या लहान-थोर कॅलिग्राफर्संना एकत्र आणून एका नवीन उपक्रमांत सहभागी केलेलं आहे.


भारतातील बहुविध भाषा, लिप्या यातील मूळ स्वरूपाचा, डिझाईन्सचा, आकाराचा सौंदर्यशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करून, त्यांत अनेकविध प्रयोग करून ते सुलेखनाच्या माध्यमातून जगासमोर आणण्याचं त्यांचं योगदान उल्लेखनीय आहे.


(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)

Comments
Add Comment

परमेश्वरी भावगंधर्व

विशेष : अभिजीत भूपाल कुलकर्णी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी २६ ऑक्टोबर २०२५ रोजी वयाच्या नव्वदीमध्ये प्रवेश केला.

मुंबई ते लंडन व्हाया वस्त्रहरण!

कुमार कदम गंगाराम गवाणकर यांनी जागतिक रंगमंचावरून नुकतीच एक्झिट घेतली. कालचक्र कोणाला थांबविता येत नाही.

‘राणीची वाव’ एक अद्वितीय जलमंदिर

विशेष : लता गुठे भारतातील प्रत्येक राज्यात काही ना काही ऐतिहासिक स्मारके आहेत ज्यामुळे त्या त्या राज्याचा

“आज चांदणे उन्हात हसले...”

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे कालीमातेच्या मंदिरात जसे शाक्तपंथीय पुजारी असतात तसे शांत सात्त्विक

मेक ओव्हर

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर आज संध्याकाळी टेलिव्हिजनवर जुन्या गाण्याच्या कार्यक्रमात एक गाणं ऐकलं-पाहिलं. सगीना

विष्णुभक्त बलीराजाची कथा

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे महाराजा बली हा असूर सम्राट असून प्रल्हादाचा नातू व विरोचनाचा पुत्र होता. तो