मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची सलग चौथ्यांदा राज्याच्या ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी सर्वसंमतीने निवड झाली आहे. महाराष्ट्रातल्या ३१ पैकी २२ पेक्षा जास्त क्रीडा संघटनांनी अजित पवार यांच्या पॅनेलला पाठिंबा दिला. या निमित्ताने पुन्हा एकदा अजित पवारांची राजकारणासोबतच क्रीडा क्षेत्रावरील पकड पक्की झाली आहे. अजित पवार यांच्या पॅनलमधील आदिल सुमारिवाला, प्रदीप गंधे आणि प्रशांत देशपांडे यांची उपाध्यक्षपदांवर बिनविरोध निवड झाली.
राज्याच्या ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीआधी महायुतीच्या नेत्यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीअंती अजित पवारांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला. या बदल्यात मुरलीधर मोहोळ यांच्या पॅनेलला काही पदे मिळणार आहेत. या निमित्ताने महायुतीतला समन्वय पुन्हा एकदा दिसून आला.
ऑलिम्पिक संघटनेच्या नव्या कार्यकारिणीसमोर राज्यातील खेळाडू घडविणे, ग्रामीण भागातील क्रीडा पायाभूत सुविधा विकसित करणे आणि महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावर अधिक स्पर्धात्मक बनविण्याची जबाबदारी असेल.






