कथा : प्रा. देवबा पाटील
सीता व नीता ह्या दोन्ही बहिणींना वाचनाची अतिशय आवड होती. त्यांचे आई-बाबा दरमहा त्यांच्याकरिता प्रत्येकीसाठी वेगवेगळे असे एखादे संस्कारक्षम गोष्टींचे किंवा एखादे बोधप्रद कवितांचे पुस्तक हमखास विकत आणायचेच. एका वेळी एकीला बालकथांचे पुस्तक आणले, तर दुसरीला बालकवितांचे पुस्तक आणायचे. दुसऱ्या महिन्यात पहिलीला बालकवितांचे पुस्तक द्यायचे तर दुसरीला छोट्यांच्या गोष्टींचे पुस्तक द्यायचे. आपापले पुस्तक वाचून झाले म्हणजे त्या दोघी ती पुस्तके आपापसात बदलून घेत असत व ते दुसरे पुस्तक वाचत असत. म्हणजे त्यांना प्रत्येकीला दरमहा दोन-दोन पुस्तके वाचायला मिळत असत. प्रत्येक पुस्तक वाचून झाल्यानंतर त्या फावल्या वेळी त्या पुस्तकावर चर्चाही करीत असत. त्यामुळे त्यांची अभ्यासासोबत वाचनाची आवडही जोपासली जात होती.
सुवाचनामुळे त्यांच्या विचारांना चालना मिळून त्यांची आकलनशक्ती वाढत होती. त्यामुळे त्यांच्या स्मरणशक्तीचासुद्धा विकास होत होता. त्यांच्यातील जिज्ञासूवृत्ती जागृत होऊन बुद्धी वृद्धिंगत होत होती. वैचारिक शक्ती विकसित होत होती. त्यांचे घरी त्यांची प्राध्यापिका मावशी आलेली होती. ह्या त्या मावशीला दररोज शाळा सुटल्यावर विविध प्रश्न विचारीत असत. आजही त्यांची चर्चा सुरू झाली.
“तुम्हाला रेणू म्हणजे काय हे तर आता माहीतच आहे.” मावशीने विचारले. “हो मावशी, काणत्याही पदार्थाचा छोटासा कण म्हणजे रेणू.” नीताने उत्तर दिले. बरोबर आहे. मावशी सांगू लागली, थोडे विस्ताराने म्हणायचे तर पदार्थाचा लहानात लहान, स्वतंत्रपणे सुटा राहू शकणारा व ज्याची रचना आणि गुणधर्म हे अगदी जसेच्या तसे त्या पदार्थासारखेच आहेत अशा कणास रेणू म्हणतात. ज्या पदार्थाचे रेणू हे एका विशिष्ट अवस्थेत व ठरावीक रचनेत एकमेकांच्या अगदी पक्के जवळ असतात, ज्यांमध्ये किंचितसेही अंतर नसते म्हणजे ते एकमेकांना इतक घट्ट चिकटून असतात, त्यांमधून प्रकाश मुळीच जाऊ शकत नाही म्हणून ते अपारदर्शक असतात. पण ज्या पदार्थांचे रेणू एकमेकांपासून किंचितसेही अलग अलग असतात, ज्यांमध्ये सूक्ष्मसे अंतर असते त्यांमधून प्रकाश किरणांना जायला सूक्ष्मशी जागा मिळते व प्रकाश त्यांमधून आरपार जातो. त्याला पारदर्शक पदार्थ असे म्हणतात. हवेला रंग, रूप आणि आकार नसल्यामुळे ती जरी आपणास दिसत नाही तरीही हवेला रेणू असतात. हवेचे रेणू हे एकमेकांपासून वेगवेगळे व सुटे असतात. त्यांच्यामध्ये असलेल्या अंतरामुळे ते हवेत सतत इतस्तत: फिरत असतात. त्यामुळे सूर्यप्रकाश त्यांच्यातून आरपार जातो. म्हणूनच हवा आपणास दिसत नाही. पण हवेत हे रेणू कोठून येतात मावशी? सीताने प्रश्न केला. पदार्थासारखेच हवेलासुद्धा रेणू असतात. कारण हवेत अनेक घटक असतात. तुम्हाला माहीत आहेत का हवेचे घटक? मावशीने विचारले. हो मावशी, हवेत प्राणवायू असतो. सीताने सांगितले व पुढे म्हणाली, त्याच्यामुळेच आपण जगू शकतो. म्हणूनच त्याला प्राणवायू म्हणतात ना मावशी? हो. प्राणवायूशिवाय आपण जगूच शकत नाही. तो नसला तर आपला प्राण म्हणजे जीव कासावीस होतो. म्हणूनच त्याला प्राणवायू म्हणतात. मावशी म्हणाली. आणि हवेत धूळही असते ना मावशी? ही धूळ आपल्या जमिनीवरून आकाशात वर उडत जाते काय मावशी? नीताने बाळबोधपणे विचारले. मावशी सांगू लागली, धूळीबद्दल सांगायचे झाल्यास आपल्या पृथ्वीभोवतीच्या वातावरणात खूप धूळ असते. वादळवाऱ्यासोबत पृथ्वीवरील धूळ तर वर आकाशात जातेच पण ज्वालामुखींच्या स्फोटांतून राख आकाशात खूप उंच वर उडते. आकाशातून नेहमी पडणाऱ्या व जळून खाक होणाऱ्या लाखो उल्कांची राख वातावरणात असते. ही राख म्हणजे एकप्रकारची धूळच असते. पृथ्वीवरील असंख्य गिरण्यांचा, कारखान्यांचा व घरोघरच्या जळणातून उत्पन्न होणारा धूर वरतीच जातो. अशा तऱ्हेने वातावरणात धुळीचे सूक्ष्म कण इतस्तत: सतत फिरत असतात. या धूलिकणांवरूनच सूर्यप्रकाशाचे परावर्तन होऊन तो चोहीकडे उधळला जातो, पसरतो त्यालाच प्रकाशाचे विकिरण किंवा विखुरणे म्हणतात. इतक्यात त्यांचे बाबा घरी आले. त्यामुळे त्यांची त्या दिवशीची ज्ञानार्जनाची चर्चा थांबली.






