पुणे : बंडगार्डन मेट्रो स्टेशनखाली भीषण अपघात झाला. काळ्या रंगाच्या पोलो कारने भरधाव वेगात जाताना अचानक नियंत्रण गमावले आणि ती थेट मेट्रो स्टेशनच्या खांबावर जाऊन आदळली. या धडकेत कारचा चेंदामेंदा झाला असून, दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी आहे.
मृतांमध्ये यश प्रसाद भंडारी (23, थेरगाव) आणि ऋत्विक ऊर्फ ओम विनायक भंडारी (23, पिंपरीगाव) या दोघांचा समावेश असून हे दोघे चुलत भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. गंभीर जखमी झालेल्या खुशवंत टेकवाणी याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून, फूटेजमध्ये कार अतिवेगाने जाताना थेट खांबाला धडकताना दिसली . या भीषण धडकेत कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे.
मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. चालक मद्यधुंद अवस्थेत होता का, याचा तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार वाहनावरील ताबा सुटल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.






