पंजाब : पंजाब सरकारने काढलेल्या दिवाळी बंपर लॉटरीमध्ये बठिंडा येथील एका व्यक्तीचे नशीब एका रात्रीत बदलले आहे. या तिकीटधारकाने तब्बल ११ कोटी रुपयांचे मोठे बक्षीस जिंकले आहे. मात्र, आश्चर्याची गोष्ट अशी की, एवढा मोठा जॅकपॉट लागूनही हा विजेता अजूनपर्यंत आपले बक्षीस घेण्यासाठी पुढे आलेला नाही. त्यामुळे लॉटरी एजन्सीने या भाग्यवान विजेत्याचा शोध सुरू केला आहे. हे तिकीट 'रत्न लॉटरी' एजन्सीतून विकत घेण्यात आले होते.
बठिंडा येथील रत्न लॉटरी एजन्सीचे संचालक उमेश कुमार यांनी सांगितले की, “मी विजेत्याचा शोध घेत आहे.” त्यांच्या एजन्सीमार्फत विकल्या गेलेल्या एका तिकिटावर हे मोठे बक्षीस लागले आहे. "निकाल जाहीर झाल्यावर आणि आमच्या एजन्सीच्या तिकीटाने ११ कोटी जिंकल्याचे कळताच, आम्हाला खूप आनंद झाला आहे. हे तिकीट कोणी घेतले, हे जाणून घेण्यासाठी आम्हीही उत्सुक आहोत."
उमेश कुमार यांनी सांगितले की, सामान्यतः बक्षीस लागताच विजेते लगेच संपर्क साधून पुढील औपचारिकता पूर्ण करतात, पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे. विजेत्याने आमच्याशी किंवा कंपनीशी अजून संपर्क साधलेला नाही. हा विजेता लवकरच समोर येईल आणि आपल्या आनंद सर्वांसोबत शेअर करेल, अशी आशा एजन्सीने व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, 'जर तिकीटधारकाने वेळेत येऊन बक्षिसावर दावा केला नाही, तर नशिबाने दिलेली ही सुवर्णसंधी त्याच्या हातून निसटू शकते.






