वॉशिंग्टन : अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स आणि उषा व्हान्स यांच्या वैयक्तिक आणि राजकीय आयुष्यात सध्या धर्म आणि विश्वासावरून मोठे वादळ घोंघावत आहे. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात पत्नी उषा व्हान्स यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारावा अशी इच्छा व्यक्त केल्याने देशभरात चर्चांना उधाण आले आहे. व्हान्स दाम्पत्य, जे त्यांच्या बुद्धिमत्तेसाठी आणि प्रेमासाठी ओळखले जातात, ते आता त्यांच्या आंतरधर्मीय कुटुंबातील धार्मिक निर्णयांवरून टीकेचे धनी ठरत आहेत.
जेडी व्हान्स यांनी एका विद्यापीठातील कार्यक्रमात बोलताना, “मला आशा आहे की एक दिवस ती ख्रिश्चन धर्माकडे वळेल,” असे विधान केले. या विधानामुळे अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे, तर काहींनी याला त्यांच्या श्रद्धेचा भाग मानले आहे. उषा व्हान्स, ज्या हिंदू कुटुंबातून येतात आणि स्वतः ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास इच्छुक नाहीत, त्यांनी मात्र मुलांचे संगोपन ख्रिश्चन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व घडामोडींमुळे व्हान्स कुटुंबातील नात्यांवर आणि त्यांच्या सार्वजनिक प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जेडी व्हॅन्स आणि उषा चिलुकुरी यांचे लग्न कसे झाले?
जे.डी.व्हान्स आणि उषा चिलुकुरी यांची भेट येल लॉ स्कूलमध्ये झाली. इथे दोघांची मैत्री झाली आणि मग जेडीने उषाला डेटवर जाण्यास विचारले तेव्हा ही मैत्री प्रेमात बदलली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०१४ मध्ये या दोघांची भेट झाली होती. अमेरिका केंटकी येथील एका मंदिरात हे लग्न पार पडले. हा विवाह हिंदू रितीरिवाजानुसार झाला होता, तथापि, असेही म्हटले जाते की या लग्नात पुजारी आणि पादरी असे दोघेही उपस्थित होते.
आंतरधर्मीय विवाहानंतर उषा यांनी आपले आडनाव बदलले, परंतु त्यांनी नेहमीच हिंदू धर्मावर विश्वास ठेवला आहे. अनेक मुलाखतींमध्ये त्या यावर अभिमानाने बोलताना दिसल्या आहेत. उषा एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या की, मी एका धार्मिक कुटुंबात वाढले आहे, माझे आई-वडील हिंदू आहेत आणि यामुळेच मला एक चांगली व्यक्ती बनण्यास मदत होते.
त्याच वेळी, उषा यांचे पती जेडी ख्रिश्चन धर्माचे पालन करतात. उषा देखील रविवारी जेडीबरोबर चर्चमध्ये जाते, आपल्या पत्नीचा धर्म पूर्ण करते. उषा यांनी आपल्या एका भाषणादरम्यान सांगितले होते की, ‘’जेडीनेही भारतीय संस्कृती उत्तम प्रकारे स्वीकारली आहे. लग्नानंतर त्याने मांसाहार सोडला आणि व्हेज खाण्यास सुरुवात केली. यासोबतच जेडी व्हॅन्स आपल्या सासूबाईंकडून भारतीय जेवण बनवायलाही शिकले. उषा म्हणतात की पूर्णपणे भिन्न पार्श्वभूमीतून असूनही दोघांनीही एकमेकांना स्वीकारले आणि समजून घेतले आहे.’’
अशा परिस्थितीत या समजुतीमुळे धर्म या दोघांमधील भिंत कधीच बनली नाही, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. या गोंधळानंतर जेडी यांनी हे स्पष्ट केले आहे की, त्यांच्या पत्नीचा धर्मांतर करण्याचा कोणताही हेतू नाही आणि ते त्यासाठी तिच्यावर जबरदस्ती करणार नाही. जेडी आणि उषा यांच्या लग्नाला ११ वर्ष झाली आहेत आणि त्यांना तीन मुले आहेत. दोन मुलांचे नाव इव्हान आणि विवेक असून मुलीचे नाव मीराबेल आहे.






