भारत देशातील गावांमध्ये हस्त उद्योगांचा ऱ्हास झाल्याने गावांचा विकास खुंटला. त्यामुळे रोजगाराच्या निमित्ताने लोक गाव सोडून शहरात जाऊ लागले. तेव्हा शहरात जाणाऱ्या नागरिकांना थांबविण्यासाठी गावात पायाभूत सुविधा असणे आवश्यक आहेत. देशाचा विकास व्हायचा असेल, तर देशातील प्रत्येक गावाचा कायापालट व्हायला हवा. त्यासाठी शासकीय योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी झाल्यास देशाचा सर्वांगीण विकास व्हायला वेळ लागणार नाही. तेव्हा देशाच्या विकासासाठी गावांचा कायापालट होणे गरजेचे आहे. तरच आपला देश अधिकाधिक विकसित होईल. त्यासाठी आपल्या देशात राजकीय इच्छाशक्तीची खरी गरज आहे.
आपला भारत देश आजही तिसऱ्या जगातील राष्ट्र म्हणून ओळखला जातो. कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशातील गावांच्या कायापालटवर अवलंबून असतो. गाव, पंचक्रोशी, तालुका, जिल्हा, राज्य आणि देश असा विकासाचा आलेख असतो. तेव्हा देशातील गावांचा कायापालट होणे गरजेचे असते. आपल्या देशात २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश आहेत. सध्याची आकडेवारी उपलब्ध नसली तरी देशात सन २०११ च्या आकडेवारीनुसार ६,४९,४८१ गावे होती. त्यातील सुमारे ४१,००० गावे महाराष्ट्रात आहेत. म्हणजे आपल्या राज्यातील एकूण लोकसंख्येचा विचार केल्यास ५४.७८% लोक ग्रामीण भागात आजही राहतात ही वस्तुस्थिती आहे. खरे म्हणजे सन २००१ च्या शासकीय आकडेवारीनुसार आपल्या महाराष्ट्रात ४३,७२० गावे होती. राज्यातील सहा विभागांपैकी कोकण विभागामध्ये ३,१८३ गावे होती. ही आकडेवारी फारच जुनी असली तरी आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. त्यासाठी नियमित जनगणना होणे गरजेचे आहे. जनगणना केल्याने वस्तुस्थिती लक्षात येऊन विकासाची दिशा ठरविणे सोपे जाते. तेव्हा दरवर्षी वर्षाच्या शेवटी विकासकामे व राज्याची वस्तुस्थितीची आकडेवारी प्रकाशित करणे आवश्यक आहे. यातूनच प्रगती कशी साधू शकतो याचा विचारविनिमय होऊ शकतो. केवळ शंभर टक्के विकास निधी खर्च केला म्हणजे विकास झाला असे म्हणता येणार नाही, तर गाव अथवा जिल्ह्यातील गरीबातील गरीब नागरिकाला त्याचा किती फायदा झाला हे जास्त महत्त्वाचे आहे. तेव्हा विकास निधी जरी वितरीत केला तरी तो योग्य कामासाठी केला आहे की नाही त्यावर सुजाण नागरीकांचे लक्ष असायला हवे. तसेच जो निधी वितरीत केलेला असेल त्याची नोंद गावातील ग्रामपंचायतीतील फलकावर ठळक अक्षरात लिहिण्यात यावी. म्हणजे आपल्या गावात किती शासकीय निधी आला त्याचा विनियोग कोणत्या कामासाठी खर्च करण्यात आला याची माहिती गावातील प्रत्येक नागरिकाला मिळेल. यातून खऱ्या अर्थाने गावात सामाजिक एकता निर्माण होण्याला मदत होते.
कोणत्याही देशाच्या विकासासाठी त्या देशातील गावांचा कायापालट अतिशय महत्त्वाचा असतो. त्यासाठी गावात पायाभूत सुविधा असणे आवश्यक आहे. आजही गावामध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा अभाव दिसून येतो. तेव्हा नागरिकांना स्वच्छ पाणी, आरोग्याच्या सुविधा, शौचालये, शिक्षण, स्वच्छता, लाईट व्यवस्था, रस्ते, दुकाने, लघु उद्योग, पारंपरिक उद्योग, सामूहिक शेती करणे, कुक्कुट पालन, वराह पालन व व्यावसायिक शिक्षण अशा सुविधा असणे गरजेचे आहे. म्हणजे नागरिक गाव सोडून शहरात जाणार नाहीत. महत्त्वाचे म्हणजे गावात विविध राजकीय पक्ष आपल्या पक्षाचे काम करीत असले तरी गावाच्या विकासासाठी राजकारण बाजूला करून एकत्रित काम केले पाहिजे. आपला देश हा शेतीप्रधान असल्याने शेतीचे उत्पन्न कसे वाढेल त्यापद्धतीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच स्थानिक महिलांचे नोंदणीकृत महिलामंडळ स्थापन करून महिला मंडळाच्या माध्यमातून विकासात्मक शासकीय विविध योजना राबविणे. त्यासाठी महिलांना योग्य प्रशिक्षण देण्यात यावे. केवळ आश्वासने देऊन गावाचा विकास होणार नाही तर आश्वासनांची पूर्तता केल्यास गावाचा विकास होईल. यासाठी गावातील नागरिकांच्या मनातील जातीचे उच्चाटन व्हायला हवे. शेतीला पूरक जोडधंदे निर्माण केले पाहिजेत. त्यामुळे शेतकरी राज्याला आर्थिक बळ मिळेल. निसर्गाचे संतुलन साधण्यासाठी प्रत्येक वर्षी पावसाळ्यात झाडे लावली पाहिजेत. त्याचप्रमाणे त्यांचे संगोपन करण्यात यावे. पावसाचे पाणी जमिनीत जिरवायला पाहिजे. त्यासाठी ठिकठिकाणी बांध घालायला हवे. यातूनच गावांचा कायापालट होतो. गावातील आजच्या परिस्थितीचा अभ्यास केल्यास काही गावांमध्ये आजही पायाभूत सुविधांचा अभाव दिसून येतो. थोडक्यात सांगायचे तर गावातील रावांमुळे गावातील वाड्या पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत, मग सांगा गावांचा विकास होणार कसा? तेव्हा अंतर्गत वाद बाजूला सारून गावांचा कायापालट होणे गरजेचे आहे. त्यासाठी गावच्या ग्रामसेवकांनी आपली भूमिका नि:पक्षपातीपणे पार पाडली पाहिजे. कारण ग्रामसेवक हा त्या गावचा ग्रामविकास अधिकारी असून गावच्या प्रशासनात महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागते.
पुरामुळे शेतकरीराजा संकटात आहेत. तेव्हा गावातील शेतकरी राजाला सामूहिक शेती करण्यासाठी प्रोत्साहित करावे. तसेच त्यांना शेतीला पूरक असे जोडधंदे सुरू करून देण्यात यावेत. आजही शेतीचे नुकसान झाले तरी जोडधंद्यामुळे तेवढा आर्थिक आधार मिळू शकतो. त्यात सरकारी मदत मिळाल्याने शेतकरी राजा संकटाला सामोरा जाऊ शकतो. याचा परिणाम गावातील नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होऊन त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल. त्यासाठी देशातील प्रत्येक गावात पायाभूत सुविधा झाल्याच पाहिजेत तरच गावांचा कायापालट होऊन देशाचा सर्वांगीण विकास होईल.
- रवींद्र तांबे