मुंबई : मुंबईत पावसाळ्यात रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांची समस्या निकालात काढण्यासाठी महापालिकेने रस्ते अभियंता नेमल्यानंतर आता हेच रस्ते अधिक चांगल्याप्रकारे स्वच्छ राखले जावून त्याची योग्यप्रकारे देखभाल व्हावी या उद्देशाने घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कनिष्ठ पर्यवेक्षकांवर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. मुंबईतील रस्त्यांची नियमित स्वच्छता आणि देखभाल करण्याच्या उद्देशाने, महानगरपालिकेकडून ‘रस्ते दत्तक उपक्रम’ राबविण्यात येणार आहे. दत्तक वस्तींच्या धर्तीवर रस्ते दत्तक उपक्रम राबवण्यासाठी मुंबईतील ७३० हून अधिक रस्त्यांची शाश्वत देखभाल आणि जबाबदारी २४६ कनिष्ठ पर्यवेक्षकांवर सुनिश्चित करण्यात आली आहे. यासाठी प्रत्येकी किमान तीन प्रमुख रस्ते आणि मार्गांच्या दत्तकत्वाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, महापालिका अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात, उपायुक्त(घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीत मुंबईत स्वच्छतेच्या दृष्टीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरातील प्रमुख रस्ते आणि मार्गांची शाश्वत देखभाल आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी कनिष्ठ पर्यवेक्षकांच्या माध्यमातून रस्ते दत्तक उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या उपक्रम अंतर्गत, प्रत्येक कनिष्ठ पर्यवेक्षक नियमित स्वच्छता आणि देखभालीसाठी किमान तीन प्रमुख रस्ते किंवा मार्ग दत्तक घेतील. यामध्ये सुमारे ७३० हून अधिक रस्ते किंवा मार्ग समाविष्ट केले जातील. दत्तक घेतलेल्या प्रत्येक प्रमुख रस्त्यावर किंवा मार्गावर व्यापक स्वच्छता आणि परिपूर्ण देखभालीची कामे केली जातील. यामध्ये रस्त्याच्या पृष्ठभागाची संपूर्ण स्वच्छता करणे, रस्त्यावर पडलेले टाकाऊ पदार्थ, बांधकाम राडारोडा आदींचे निर्मूलन करण्यात येईल. दुभाजक, मध्यवर्ती भाग, पदपथ आणि सेवा रस्ते नियमितपणे स्वच्छ करणे, धुणे आणि त्यांची देखभाल करण्याची कामेही या अंतर्गत केली जातील. धुळीचे प्रमाण कमी करण्याकरिता रस्ते वेळोवेळी धुतले जातील आणि मिस्टिंग मशीन वापरून पाण्याने फवारणी केली जाईल. चौकातील व उड्डाणपुलांखालील भित्तीचित्रे इत्यादींची स्वच्छता केली जाईल.
सार्वजनिक ठिकाणांची दीर्घकालीन देखभाल करण्यासाठी जबाबदारी सुनिश्चित करणे आणि प्रत्यक्ष क्षेत्रावर (ऑन फील्ड) कार्यरत असणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये सक्रिय सहभाग वाढवण्याच्यादृष्टीकोनातून हा उपक्रम हाती घेण्यात आले आहे. नागरिकांचा सहभाग आणि सहकार्य यामुळे हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होईल. त्यामुळे, नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवून महानगरपालिकेच्या स्वच्छताविषयक प्रयत्नांना बळ द्यावे. - डॉ अश्विनी जोशी, महापालिका अतिरिक्त आयुक्त






