Saturday, November 1, 2025
Happy Diwali

राज्यात लवकरच निवडणुकांच्या रणधुमाळीची घोषणा होणार, या दिवसापर्यंत आचारसंहिता लागू होणार

राज्यात लवकरच निवडणुकांच्या रणधुमाळीची घोषणा होणार, या दिवसापर्यंत आचारसंहिता लागू होणार

मुंबई: राज्यात सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच हालचाली सुरू असून नेत्यांपासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनाच निवडणुकीच्या तारखांचे वेध लागले आहे. राज्यात २० जानेवारीपूर्वी निवडणुकीची रणधुमाळी पूर्ण होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रभाग रचना, इतर मागासवर्गांचे आरक्षण यांसारख्या विविध मुद्द्यांवरून गेली अनेक वर्षे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका, नगरपंचायत यांच्या निवडणुका अडकल्या होत्या.

महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती आदींच्या निवडणुका तीन टप्प्यांत पार पाडण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायत, दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती, तर तिसऱ्या टप्प्यात महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी ३१ जानेवारी २०२६ची मुदत दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे १९ ते २३ जानेवारी २०२६दरम्यान दावोस येथे जागतिक आर्थिक परिषद होत आहे. ज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर राहणार आहेत. त्यामुळे २० जानेवारीपूर्वी राज्यात निवडणुका होण्याची दाट शक्यता होत आहे.

नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी नोव्हेंबरमध्ये मतदान होईल. नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना किंवा मतदानानंतर लगेच जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. तर जिल्हा परिषद निवडणुकांची प्रक्रिया सुरू असताना महापालिका निवडणुकांची घोषणा होऊ शकते. तिन्ही टप्प्यांत पार पडणाऱ्या या निवडणुकांतील मतांची मोजणी एकत्रित होणे शक्य नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या प्रत्येक टप्प्यातील मतांची मोजणी निवडणूकीच्या दुसऱ्या दिवशी होईल. राज्यात एकूण ३३६ स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. ज्यात २९ महापालिका, २४६ नगरपंचायती, ४२ जिल्हा परिषद, ३२ पंचायत समितींचा समावेश आहे.

आचारसंहिता कधी लागणार ?

नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्यासाठी राज्यात १० नोव्हेंबरच्या आधीच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. यानंतर ज्या ज्या भागात निवडणुका आहेत तिथे... या पद्धतीने सर्व निवडणुका घेण्यासाठी राज्यात टप्प्याटप्प्याने आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >