सिडनी : भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर गेल्या काही दिवसांपासून सिडनीमधील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता. पण आता त्याला जवळपास आठवड्याभरानंतर शनिवारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने माहिती दिली आहे. बीसीसीआयने त्याच्या प्रकृतीबाबतही अपडेट्स दिले आहेत. श्रेयस अय्यर गेल्या शनिवारी (२५ ऑक्टोबर) सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वनडेत खेळताना हर्षित राणाच्या गोलंदाजीवर ऍलेक्स कॅरीचा झेल घेताना डाव्या अंगावर पडला होता. त्यामुळे त्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार तो पडल्यामुळे त्याची प्लीहा फुटली होती आणि अंतर्गत रक्तस्त्राव झाला होता. त्याची ही दुखापत लवकर ओळखण्यात आली आणि एका छोट्या शस्त्रक्रियेद्वारे त्याचा रक्तस्त्राव तात्काळ थांबवण्यात आला होता. त्यानंतर त्याच्यावर आवश्यक उपचार करण्यात आले.
बीसीसीआयने पुढे सांगितले आहे की श्रेयस अय्यरची प्रकृती आता स्थिर असून तो बरा होत आहे. याशिवाय बीसीसीआयची मेडिकल टीम, सिडनी आणि भारतातील वैद्यकिय तज्ञ त्याच्या प्रकृतीत झालेल्या सुधारणेबाबत आनंदी आहेत.
याशिवाय बीसीसीआयने सिडनीमधील डॉक्टर कौरोश हंघिगी आणि त्यांच्या टीमचे आभार मानले आहे. तसेच भारतातील डॉक्टर दिनशॉ परडीवाला यांचेही आभार मानले आहेत. या सर्वांनी श्रेयस अय्यरला सर्वोत्तम उपचार मिळतील याची काळजी घेतली असल्याचे बीसीसीआयने म्हटले. याशिवाय श्रेयस अद्यापही काही दिवस सिडनीतच थांबेल. ज्यावेळी त्याला प्रवासासाठी डॉक्टरांकडून परवानगी मिळेल, त्यावेळी तो भारतात परतेल, असंही बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. दरम्यान, यामुळे आता श्रेयस अय्यर आगमी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर होण्याची शक्यता वाढली आहे. ही मालिका ३० नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे. श्रेयस आता वन-डे संघाचा उपकर्णधार आहे.






