मुंबई: निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि मतदार यादीतील मोठ्या गोंधळावर आक्षेप घेत, आज (दि. १) मुंबईत महाविकास आघाडी (MVA) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) वतीने 'सत्याचा मोर्चा' काढण्यात आला. या मोर्चाला प्रतिउत्तर देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) त्याचवेळी गिरगाव चौपाटी येथे ‘मूक आंदोलन’ (Silent Protest) केले. त्यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसले.
विरोधकांच्या ‘सत्याच्या मोर्चात’ एकवटले दिग्गज
निवडणूक आयोगाच्या निर्णयांविरोधात आयोजित या मोर्चात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे नेते शरद पवार, काँग्रेसचे वरिष्ठ नेते, तसेच युवा नेते आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज सहभागी झाले. शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे या चार प्रमुख पक्षांचे नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याने या मोर्चाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले गेले होते.
भाजपचे ‘मूक’ प्रत्युत्तर
विरोधकांच्या या शक्तीप्रदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून भाजपने गिरगाव चौपाटीवर ‘मूक आंदोलन’ केले. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. त्यांच्यासोबत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार, आमदार योगेश सागर, आमदार विद्या ठाकूर आणि प्रवक्ते नवनाथ बन यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले.
भाजपने हे आंदोलन "महाविकास आघाडीच्या दुटप्पी राजकारणाविरोधात" असल्याचे स्पष्ट केले. दुपारी १ वाजता सुरू झालेले हे आंदोलन शांत आणि मूक स्वरूपात पार पडले.
"तीच ती स्ट्रॅटेजी आता चालणार नाही" – मंगलप्रभात लोढा
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मूक आंदोलनादरम्यान विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. "एकदा अशी रणनिती चालते, पण वारंवार तीच तीच ‘स्ट्रॅटेजी’ (Strategy) आता चालणार नाही," असे ते म्हणाले. लोकांचा पाठिंबा आता विरोधकांच्या बाजूने नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या बाजूने आहे, असे लोढा म्हणाले.
लोढा यांनी दावा केला की, केवळ मुंबई महापालिकाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात विरोधकांचा सुपडा साफ होईल.
"काही मोर्चे स्वार्थासाठी असतात" – राहुल नार्वेकर
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही या मोर्चावर प्रतिक्रिया दिली. "लोकशाहीमध्ये आंदोलनाचा अधिकार सगळ्यांनाच आहे. पण काही मोर्चे जनहितासाठी असतात, तर काही स्वार्थासाठी. आजचा मोर्चा हा हेतूपुरस्कर आहे आणि यातून जनतेचा काहीही फायदा होणार नाही," असे नार्वेकर म्हणाले.
"लोकसभा निवडणुकीत विरोधकांना विजय मिळाला, तेव्हा निवडणूक आयोग योग्य होता, पण पराभवानंतरच शंका का? हा प्रश्न जनता विचारणारच," असा टोला त्यांनी लगावला. संविधानिक संस्थांवर आरोप करून ‘खोटा नरेटिव्ह’ (False Narrative) तयार करण्याचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.






